Wife Birthday Celebration: आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ समोर येतात. काही व्हिडीओ मनोरंजन करतात, काही आश्चर्यचकित करतात, तर काही मनाला भिडतात. सध्या असाच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका ऑटोचालकाने आपल्या पत्नीसाठी केलेला वाढदिवसाचा सोहळा लोकांच्या मनाला चांगलाच भावला आहे.
namaste_indians या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये दिसते की, एका ऑटोचालकाने उड्डाणपुलावर मोठ्या धुमधडाक्यात आपल्या पत्नीसाठी वाढदिवस साजरा केला. व्हिडीओमध्ये तो पत्नीकडून केक कापून घेतो आणि नंतर तिच्यावर पैशांची उधळण करतो. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव स्पष्ट सांगतात की, तो या क्षणाचा किती आनंद घेत आहे. पत्नीबद्दल असलेलं त्याचं प्रेम आणि आपुलकी पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलं .
या व्हिडीओमधील सर्वांत सुंदर गोष्ट म्हणजे त्यांच नातं. दोघांच्या चेहऱ्यावरून दिसतं की, त्यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे. पत्नीच्या चेहऱ्यावर आनंदाचं तेज ओसंडून वाहताना दिसतं. तिच्या गालावर लागलेला केक आणि तिचा दिलखुलास हसरा चेहरा हे सर्व पाहून लोक भारावून गेले. वापरकर्त्यांनीही त्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं,“जेव्हा दोन माणसांमध्ये खरं प्रेम असतं तेव्हा आर्थिक परिस्थितीचा त्यांच्यावर काहीही फरक पडत नाही. खरी श्रीमंती ही एकमेकांबद्दलचं प्रेम आणि आदर यातच असते.”
पाहा व्हिडिओ
हा व्हिडीओ पोस्ट होताच काही तासांतच लाखो लोकांनी पाहिला. आतापर्यंत पाच लाखांपेक्षा जास्त लोकांनी तो लाईक केला आहे. कमेंट सेक्शनमध्ये हार्ट इमोजींचा अक्षरश: पाऊस पडला आहे. अनेकांनी यांचे कौतुक करीत त्यांच्या प्रेमाला शुभेच्छा दिल्या आहेत.
एका युजरने कमेंट केली, “भाई, खरंच इमोशनल करून टाकलं.” तर दुसऱ्यानं म्हटलं, “पैसे उधळण्यापेक्षा ते जर एखाद्या अनाथाश्रमात किंवा हॉस्पिटलमधील रुग्णांच्या मदतीसाठी वापरले असते, तर अजून पुण्य लाभलं असतं.” मात्र बहुतांश युजर्सनी या जोडप्याच्या प्रेमाला दाद दिली. तिसऱ्या युजरने लिहिलं, “किती गोड प्रेम आहे दोघांमध्ये, मन एकदम आनंदून गेलं.” आणखी एकानं शुभेच्छा देताना म्हटलं, “देव नेहमी तुम्हाला आनंदी ठेवो, तुमचं प्रेम असंच टिकून राहो.”
आजच्या काळात जिथे महागडी रेस्टॉरंट्स, आलिशान ठिकाणी पार्ट्या आणि लक्झरी गिफ्ट्स हे वाढदिवस साजरे करण्याचं माध्यम बनलं आहे, तिथे एका साध्या ऑटोचालकानं पत्नीबद्दलच्या प्रेमामुळे केलेला साधा, पण भावनिक वाढदिवसाचा कार्यक्रम लोकांना खास भावला आहे.