Video Shows Shopkeeper Found US Tourist Lost Wallet : चोरांसाठी पाकीटचोरी हा पैसे मिळविण्याचा एक सोपा मार्ग आहे, असे म्हणायला हरकत नाही. अशातच आपण रेल्वेस्थानक, ट्रेनमध्ये, बस, रिक्षा, रस्त्यावरून जाताना किंवा मॉल, मार्केट आदी गर्दीच्या ठिकाणी पाकीट आपल्याकडून हरवले, तर चोर त्या संधीचे सोने करायला मागे-पुढे बघत नाहीत किंवा मेहनत घेऊन ते पाकीट परत करण्याचा विचारसुद्धा मनात आणत नाहीत. पण, आज एका माणसाने या सगळ्यांना मागे टाकत प्रामाणिकपणा काय असतो याचे उत्तम उदाहरण सगळ्यांसमोर मांडले आहे.
गुजरात राज्यातील भुज शहरातील एका दुकानदाराने अमेरिकेतून आलेल्या एका पर्यटकाला हरवलेले पाकीट परत करण्यासाठी मेहनत घेतली. अमेरिकेतून भारतात आलेली पर्यटक स्टेफ हिचे चार दिवसांपूर्वी पाकीट ट्रेनमध्ये राहिले होते. आता तिला तिचे पाकीट कधीच मिळणार नाही, असे ती गृहीत धरून चालली होती. पण, दुकानदार चिरागला योगायोगाने हे पाकीट सापडले आणि त्याने मेहनत करून, ते पाकीट पर्यटक स्टेफपर्यंत सुखरूपपणे पोहोचवले. त्यानंतर पर्यटक महिलेने काय केले ते व्हिडीओतून बघा…
व्हिडीओ नक्की बघा
ही देवाची कृपा! (Viral Video)
पर्यटक स्टेफ अज्ञात व्यक्तीबरोबर दुकानदार चिरागकडे गुजरात राज्यातील भुज येते-जाते. दुकानात पोहोचल्यावर चिराग पर्यटक स्टेफच्या हातात पाकीट देतो. पाकीट मिळताच स्टेफने चिरागचे खूप आभार मानले. तिने या मदतीचे बक्षीस म्हणून चिरागला टिप देण्याचा प्रयत्नही केला; पण त्याने कोणतेही पैसे स्वीकारण्यास ठामपणे नकार दिला. ते पाहून पर्यटक स्टेफने व्हिडीओ बनवला आणि त्यात आवर्जून म्हटले की, “भारतातून खूप नकारात्मक बातम्या येत असतात; पण येथे खूप सकारात्मक गोष्टीसुद्धा घडतात”.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @Animuchx या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये पर्यटक स्टेफने घडलेली सर्व घटना सांगितली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा चिरागच्या प्रामाणिकपणाच्या कृतीचे वेगेवेगळ्या शब्दांत कौतुक करताना दिसत आहेत. “दुकानात उपस्थित काका, ‘ही देवाची कृपा आहे’, असे सहज म्हणून गेले हे ऐकून धन्य झालो”, “चिरागमुळे परदेशी पर्यटकाचा दृष्टिकोन एका दिवसात बदलला” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.