Viral Video Shows Tourist Offers Money To Auto Driver : ‘अतिथी देवो भव’ ही आपण भारतीयांनी जपलेली एक जुनी परंपरा आहे. ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक भारतात येत असतात. या परदेशी पाहुण्यांना मदत करणे, त्यांना न लुबाडता योग्य ती रक्कमच त्यांच्याकडून घेणे वा घेतली जातेय ना हे पाहणे, त्यांना एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करणे हे सार्वजनिक वाहतूकदार, तसेच आपले सर्वांचे कर्तव्य आहे. तर आज असेच काहीसे सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळाले आहे. रिक्षाचालकाच्या कृतीने भारतात फिरायला आलेला परदेशी महिलेचे मन जिंकले आहे.
एका परदेशी पर्यटक आणि दिल्लीतील एका रिक्षाचालकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत परदेशी पर्यटक महिलेचा रिक्षा प्रवास संपतो आणि ती रिक्षाचालकाला तिच्याकडे सुटे पैसे नसल्याचे सांगते. तेव्हा रिक्षाचालक “काही हरकत नाही. तुम्ही जा”, असे अगदी आपुलकीने म्हणतो’. या संवादादरम्यान रिक्षा रस्त्याकडेला उभी असते. त्यादरम्यान एक अज्ञात व्यक्ती त्यांचे संभाषण ऐकते आणि अनुवादकाची भूमिका बजावते.
त्यांच्या संपूर्ण दिवसाच्या कमाई दिली (Viral Video)
तसेच रिक्षाचालकाच्या या दयाळूपणाने प्रभावित होऊन परदेशी पर्यटक महिला ताराने त्या अनुवादकाला सांगितले, “कृपया माझ्या वतीने रिक्षाचालकाचे आभार माना. त्याला सांगा की, मी त्याला २००० रुपये गिफ्ट म्हणून देते आहे. कारण- मला त्याच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे”, असे म्हटल्यानंतर तारा पैसे देते आणि रिक्षाचालकाच्या चेहऱ्यावर खूप आनंद झाल्याचे भाव दिसतात. तो रिक्षाचालकसुद्धा परदेशी पर्यटकाला धन्यवाद म्हणतो. त्यानंतर रिक्षाचालक आपल्या कुटुंबाबद्दल सांगतो आणि हे पैसे तुमच्या कुटुंबासाठीही उपयोगी पडतील, असे तारा आवर्जून म्हणते.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा @taragivingjoyfully हा व्हिडीओ परदेशी पर्यटक ताराच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी रिक्षाचालकाचा नि:स्वार्थीपणा आणि पर्यटकाच्या दयाळू प्रतिसादाचे कौतुक केले आणि म्हटले, “कदाचित तुम्हाला माहीत नसेल; पण तुम्ही २००० रुपये देऊन त्यांच्या संपूर्ण दिवसाची कमाई दिली आहे”, “तुमचा दयाळूपणा आणि मोठेपणा तुमच्या सभोवतालच्या प्रत्येकाला आनंद देऊ शकतो” आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.