Women Started keeping Water And Food For The Sparrows : चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. माणसाच्या अगदी जवळच राहणारा हा पक्षी म्हणून आपण चिमणीला ओळखतो. पण, सध्या सगळीकडेच हिचा वावर कमी झाल्याचे दिसून आले आहे. या चिमण्यांची संख्या वाढवायची तर त्यांना आसरा, अन्न, पाणी देणे आवश्यक आहे. तर अंगणातील, इमारतींच्या गॅलरीत घरटे बांधणाऱ्या हरवलेल्या चिऊताईचा किलबिलाट पुन्हा ऐकण्यासाठी एका इन्स्टाग्राम युजरने खास प्रयत्न केला आहे. तिने नक्की काय केलं आहे चला पाहुयात…

इन्स्टाग्राम युजरने @snehas_feathered_friends गेल्या वर्षी मार्चमध्ये तिच्या गॅलरीत काही चिमण्यांसाठी पाणी आणि अन्नाची ठेवण्यास सुरुवात केली. हे पाहिल्यावर सुरवातीला दोन चिमण्या यायला लागल्या. त्यानंतर काही दिवसांनी मात्र ५० ते ६० चिमण्या तिच्या गॅलरीत अन्न-पाण्याचे सेवन करायला यायला लागल्या. या चिमण्या पाणी प्यायच्या, अन्नाचे सेवन करायच्या आणि अगदी एकमेकांबरोबर खेळायच्या सुद्धा. त्यामुळे स्नेहाच्या गॅलरीचे त्यांनी अक्षरशः एका स्वर्गात रूपांतर केले असे ती म्हणाली.

व्हिडीओ नक्की बघा…

खरे सुख यातच आहे… (Viral Video)

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, स्नेहाने तिच्या गॅलरीत लाकडाचे बर्ड फिडर (Bird Feeder) ठेवले आहेत. तसेच प्लास्टिकच्या बरणीमध्ये काही अन्न, त्यांच्यासाठी मक्याचे कणीस तर चिमण्यांना पिण्यासाठी पाणी सुद्धा ठेवले आहे. एवढेच नाही तर त्यांना घरटे बनवण्यासाठी आवश्यक अशा गोष्टींची सोय सुद्धा युजरने केलेली दिसते आहे, ज्यामुळे बऱ्याच चिमण्या तिथे येऊन या सोयी-सुविधांचा लाभ घेताना दिसत आहेत, जे पाहून इन्स्टाग्राम युजर स्नेहाला सुद्धा प्रचंड आनंद झालेला दिसतो आहे. तसेच तिने हा अनुभव व्हिडीओ रेकॉर्ड करत सगळ्यांना खास संदेश सुद्धा दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @snehas_feathered_friends आणि @smitas_bird_gallery या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘चला, चिमण्यांचा किलबिलाट आपल्या जगात सतत असाच राहावा यासाठी प्रयत्न करूया’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि ‘खरे सुख यातच आहे’, ‘मी गेल्या ८ वर्षांपासून माझ्या बाल्कनीत बाजरी आणि पाणी ठेवत आहे. सुमारे ५० ते ५५ चिमण्या माझ्या बाल्कनीला भेट देतात आणि यामुळे मी खूप भाग्यवान आहे असे मला वाटते’ ; आदी अनेक अनुभव नेटकरी शेअर करत आहेत.