Viral Video: आयुष्यामध्ये एखादी गोष्ट जितकी खूप खास वाटते, एक दिवस तीच गोष्ट एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. प्रेमात पडलेले लोक म्हणतात, प्रेम खूप चांगलं आहे. प्रेम एखाद्या क्रूर माणसालाही बदलायला भाग पाडू शकते. मात्र, कधी कधी चुकीच्या व्यक्तीवर केलेलं प्रेम एखाद्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. आपण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो, त्या व्यक्तीने नेहमी आपल्या सुख-दुःखात आपल्याबरोबर राहावं, आपली सगळी स्वप्नं पूर्ण करावीत, आपली काळजी घ्यावी, आपल्याला कधीच सोडून जाऊ नये, आपल्याशीच लग्न करावं, असं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं.

पण, कधी कधी नात्यात काही कारणामुळे दुरावा निर्माण होतो, ती व्यक्ती ‘ब्रेकअप’ करून निघून जाते. अशा परिस्थितीत अनेक जण खचून जातात आणि मग त्या व्यक्तीशिवाय आपण जगूच शकणार नाही, असा विचार करून टोकाचं पाऊल उचलतात. परंतु, हे जग खूप मोठं आहे. वास्तविक जिथे आपल्या जन्मदात्या आई-वडिलांच्या निधनानंतरही लोक जगू शकतात, तिथे प्रियकर किंवा प्रेयसी धोका देऊन सोडून गेल्यानंही काही फरक पडत नाही. परंतु, या गोष्टींचा अनेक जण विचार न करता, मानसिक तणावाखाली स्वतःच्या जीवाचं बरं-वाईट करून घेण्याचा प्रयत्न करतात. सध्या अशीच एक घटना दाखविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका तरुणीचा प्रियकर तिला सोडून गेल्यानं तिला खूप मोठा धक्का बसतो. त्यामुळे ती टोकाचं पाऊल उचलण्याचा विचार करून एका रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्रिजच्या खाली लावलेल्या लोखंडावर बसलेली दिसत आहे. ती कधीही ट्रेन येताच उडी मारण्याच्या तयारीनं बसली होती. परंतु, रेल्वेस्थानकावरील अनेक जण तिला पाहतात आणि पोलिसांचं एक पथक तिला त्या ठिकाणाहून तिला खाली उतरवण्याचा प्रयत्न करते; परंतु ती कोणाचेच काहीच ऐकत नाही. शेवटी महत्प्रयासाने तिला सुखरूप पुुलावर नेलं जातं.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. त्यावर, ‘माणूस किती हतबल होतो की, स्वतःच्या जीवापेक्षा प्रेमात सोडून गेलेली व्यक्ती जास्त महत्त्वाची वाटते’, अशी ओळ लिहिण्यात आली आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @maz_man_tuzyat या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत सात दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि दोन लाख लाइक्स मिळाल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच एका युजरनं यावर लिहिलंय, “हे वय खूप खतरनाक असतं. ह्या वयातच स्वतःला सांभाळावं लागतं. नंतर आपल्यालाच लाज वाटते की, मी त्यावेळी काय वेडेपणा करत होतो…” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “यांच्यावरून कळतं की येणारी पिढी किती मूर्ख आणि किती नालायक आहे ते.” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “एका मुलाला जन्माला घालण्यासाठी, त्याला लहानाचं मोठं करायला काय कष्ट, किती यातना सहन कराव्या लागतात… किती इच्छा-स्वप्नं मागे टाकावी लागतात. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करावी लागते हे आई झाल्याशिवाय कळत नाही. मुलांनीही थोडा आई-बाबांचा विचार करायला हवा…”