Travel Vlogger Viral Video : व्लॉगिंग म्हणजे फक्त प्रवास दाखवणे नाही, तर प्रवासातील अनुभव आणि भावना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे एक साधन आहे. अशाच एका ट्रॅव्हल व्लॉगरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ फक्त मनोरंजनासाठी नाही, तर त्यात एक सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्दाही आहे. प्रवास करताना येणाऱ्या अडचणी आणि लोकांच्या प्रतिक्रिया या सर्व गोष्टी या व्हिडीओत स्पष्ट दिसतात.
भारतभर सायकलवरून प्रवास करणाऱ्या एका ट्रॅव्हल व्लॉगरने तमिळनाडूत अनेक मंदिरांमध्ये त्याला रात्री प्रवेश नाकारला जात असल्याचा अनुभव सांगतानाचा व्हिडीओ शेअर केला. या अनुभवामुळे व्लॉगर अतिशय निराश झाला आणि चिडला होता. त्याने म्हटले की, तो कोणत्याही स्पॉन्सरशिपशिवाय भारतभर फिरतो आणि रात्री मुक्काम करण्यासाठी महागड्या हॉटेलऐवजी मंदिरं किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी राहतो.
मात्र, तमिळनाडूत त्याला अनेक ठिकाणी प्रवेश नाकारण्यात आला, ज्यामुळे त्याचे मन खूप दुखावले गेले. व्हिडीओमध्ये तो एका मंदिराबाहेर उभा दिसतो आणि सांगतो की, त्या मंदिरात त्याला प्रवेश दिला गेला नाही. त्याचबरोबर तो सांगतो की, तमिळनाडूत त्याला असाच अनुभव १० ते १२ मंदिरांमध्ये आला.
संतप्त व्लॉगरने म्हटले,”जर मला एखाद्या राज्याला ‘सर्वांत वाईट लोकांचे राज्य’ म्हणायचे असेल, तर मी ते तमिळनाडू, असे म्हणेन. तो असेही सांगतो की, त्याला दुकानाबाहेरही झोपायची परवानगी नव्हती, जरी त्याने आधार कार्डासह ओळखीचे प्रमाण दाखवले असले तरी.
पाहा व्हिडिओ
नेटकऱ्यांची प्रतिक्रिया मात्र वेगवेगळी आहे. एका व्यक्तीने लिहिले, “अशा प्रकारे लेबल लावणे योग्य नाही. मी तमिळनाडूत राहत असल्याने यावर आक्षेप घेते. तमिळनाडूत कोणालाही मंदिरात राहण्याची परवानगी नाही. तिथली संस्कृती वेगळी आहे. कदाचित उत्तर भारतात, असे असू शकते; पण सुरक्षा आणि राज्य एचआरसीईच्या सूचनामुळे मंदिरांना लॉजमध्ये बदलता येत नाही. त्यामुळे मंदिराची पवित्रता राखली जाते.
” दुसऱ्या नेटिझनने लिहिले, “हे फक्त त्या व्यक्तीस नाही, तर अनेक ब्लॉगर्सनाही तसं अनुभवावं लागलं आहे. केरळमध्ये लोक अधिक मदत करणारे आहेत. माझ्या गावातील एका मित्रानं भारतभर प्रवास केला आणि त्याचे केरळमध्ये स्वागत केले गेले होते;पण तमिळनाडूत त्याला फारशी मदत मिळाली नाही.”
एक युजर म्हणाला, “मंदिरे अशा सुविधा देण्यासाठी नाहीत. त्यांचे निश्चित वेळापत्रक असते. बहुतेक मंदिरांमध्ये दरवाजे बंद केल्यानंतर प्रवेश मिळत नाही. थोडा अभ्यास केला असता, तर चांगले झाले असते.” काही लोक म्हणतात, “ही परिस्थिती सरकारी नियंत्रणाखालील हिंदू मंदिरांची आहे. पूर्वी मंदिरांनी गरजू लोकांना आश्रय दिला, संतांना मदत केली; पण आता ही परिस्थिती आहे.
सोशल मीडिया वर व्हायरल होणारा हा व्हिडिओ इंस्टाग्राम @WokePandemic अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. सर्वांच्या प्रतिक्रियांमुळे हा विषय सोशल मीडियावर चर्चेचा ठरला असून, तमिळनाडूत प्रवास करणाऱ्यांना मंदिरांबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे,अशी सूचनादेखील दिली जात आहे.