Clever Jewellery Storage Idea: आजकाल सोशल मीडियावर नेमकं काय पाहायला मिळेल याचा काहीही नेम नाही. कधी एखादा धक्कादायक व्हिडीओ नजरेसमोर येतो, तर कधी एखादं असं दृश्य दिसतं की, हसून हसून पोट दुखायला लागतं. अशाच प्रकारचा एक भन्नाट व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असून, त्यात एक बाई सोन्याचे दागिने घरात सुरक्षित लपवण्यासाठी अनोखी ट्रिक सांगताना दिसत आहे. आजकाल चोरटे घरफोडी करण्यासाठी नवनवीन डावपेच लढवतात… पण यावेळी एका महिलेनं असा भन्नाट डाव रचला की, ते ऐकून तुम्हीही थक्कच व्हाल. सोन्याचे दागिने घरात कुठे ठेवायचे, हे सांगताना ताईंने दाखवलेली युक्ती सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.
ताईनं काय केली कमाल?
व्हिडीओमध्ये दिसते की, एका महिलेच्या टेबलावर सोनेरी चेन, अंगठी असे दागिने ठेवलेले आहेत; परंतु ती महिला अगदी शांतपणे सोफ्यावर बसली आहे. थोड्याच वेळात त्या टेबलाशेजारी ठेवलेला वायपर हातात घेतात. पाहता पाहता, त्या वायपरचा दांडा उघडतात आणि त्यात एकामागोमाग एक सोन्याचे दागिने टाकायला सुरुवात करतात. दागिने टाकून झाल्यावर तो दांडा पुन्हा घट्ट बसवतात आणि वायपर पूर्ववत ठेवून देतात.
महिलेच्या मते, “अशा जागी कोणी सोनं ठेवेल हे कोणाच्या डोक्यातही येणार नाही आणि चोर तर अशा ठिकाणी शोधायलाच जाणार नाही.”
व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
हा भन्नाट आयडिया दाखवणारा व्हिडीओ ‘chanda_and_family_vlogs’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. काही तासांतच या व्हिडीओला तब्बल एक लाख ३८ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी मजेशीर कमेंट्स करून हशा पिकवला.
एका युजरने लिहिले – “ताई, वायपरमध्ये मामीचं कडं कसा लपवू?”, तर दुसऱ्याने लिहिले – “चोरांनी हा व्हिडीओ बघितला तर? मग तर तुमचं गुपित फुटलं.”, तिसऱ्याने टोलवाटोलवी करीत लिहिले – “हे सांगून तर तुम्ही चोरांचीच कामं सोपी केलीत दीदी.”, चौथा म्हणाला – “आता तर उघडपणे चोरांना स्कीमच सांगितली.”
लोकांचे हसू आवरेना
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना ही युक्ती भन्नाट वाटली; पण त्याहून जास्त मजेशीर झाल्या त्या नेटकऱ्यांच्या कमेंट्स. कुणी गंमत करीत म्हणतेय की, आता घराघरात वायपर उचलून चोर शोध घेतील, तर कुणी खळखळून हसतंय की, दागिने लपवायचं ठिकाण दीदीनं जगजाहीर केलं.
येथे पाहा व्हिडीओ
एकूणच, घरात सोनं लपवण्याची ही जुगाडू ट्रिक सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून, लोक त्यावर भरपूर मजा घेत आहेत.