Women Beaten By Police: मध्य प्रदेश पोलीस दलातील एका अधिकारी महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे व यावरून पोलिसांवर प्रचंड टीका होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये महिला पोलीस एका अन्य महिलेचे केस खेचून तिला फरपटत असल्याचे पाहायला मिळतेय. कटनी जिल्ह्यातील कौरिया गावात ज्या जमिनीवर विजेचा टॉवर बसवण्यात आला होता त्या जमिनीच्या मालकिणीने सरकारकडे भरपाईची मागणी केली होती. चैनाबाई काची असे या महिलेचे नाव आहे. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये चैनाबाई हिला मारहाण करण्यात आली असून ताब्यात घेण्यात आले.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने महिलेला मारहाण झाल्याचे दावे फेटाळून लावले आहेत. तसेच पोलिसांनी नियमानुसार कारवाई केली आहे हा जुना व्हिडिओ आहे आणि यावर तारीख दिलेली नाही असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
प्रकरण काय?
आपल्या जमिनीवर विजेचा टॉवर बसवण्याची कोणतीही भरपाई मिळाली नसल्याचा आरोप चैनाबाई काची यांनी केला आहे. टॉवर उभारण्यासाठी बुलडोझर आला तेव्हा तिने आणि तिच्या नातेवाईकांनी मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी, पोलिसांनी कथितपणे तिला मारहाण केली आणि तिला आणि इतर चार जणांना ताब्यात घेतले.
पोलिसांच्या कारवाईविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी महिला आणि तिचे वकील जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा पोलिस प्रमुखांच्या कार्यालयात पोहोचले. टॉवरच्या उभारणीच्या विरोधात आपल्याला नियमानुसार कोणतीही भरपाई मिळालेली नाही. वीज कंपनी, महसूल अधिकारी आणि पोलीस कर्मचार्यांच्या मदतीने कंत्राटदारांनी तिची जमीन हिसकावून घेतली आहे असा आरोप सुद्धा चैनाबाई यांनी लावला आहे.
चैनाबाई यांच्या वकिलाने मारहाण व कारवाईचा निषेध नोंदवत कोणीही तिच्या तक्रारीकडे लक्ष देत नाही असाही दावा केला आहे. मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने संबंधित अधिकारी आणि पोलिसांवर कारवाई करण्याची विनंती सुद्धा चैनाबाई यांच्या वकिलाने केली आहे.
हे ही वाचा<< २७१ प्रवाशांसह विमान हवेत असताना पायलटचा मृत्यू; उड्डाणानंतरच्या ४० मिनिटांचा धक्कदायक घटनाक्रम उघड
पोलिसांनी काय सांगितलं?
माध्यमांना संबोधित करताना वरिष्ठ पोलीस अधिकारी मनोज केडिया म्हणाले की, ही महिला सार्वजनिक ठिकाणी गोंधळाचे वातावरण तयात करत होती आणि विजेचा टॉवर बसवण्याच्या कामात अडथळा आणत होती. त्यामुळे तिला प्रतिबंधात्मक कोठडीत घेण्यात आले. पोलिसांनी महिलेला मारहाण केलेली नाही उलट “महिला पोलिसांनी नियमानुसार काम केले,” असेही केडिया यांनी सांगितले आहे. अधिकारी म्हणाले.