भारतीयांचे सार्वजनिक ठिकाणी वर्तन, वाहतूक नियम आणि कायदे याविषयीचा त्यांचा दृष्टिकोन हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. सर्वाजनिक ठिकाणई कचरा टाकणे, बेशिस्तपणामुळे होणारी वाहतूक कोंडी, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड यांसाठी भारतीयांना अनेकदा दोष दिला जातो. याच विषयावर एका सोशल मीडिया पोस्टमुळे पुन्हा चर्चा रंगली. महाराष्ट्रातील पुण्यामध्ये वाहतक कोंडीमध्ये अडकल्यानंतर एका तरुणाने व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये त्याने भारत आणि जर्मनीतील वाहनचालकांचा वाहतूक कोंडीमध्ये अडकल्यानंतरच्या वर्तनामधील फरक सांगितला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

जर्मनीशी तुलना करताना भारतीय ड्रायव्हर्सच्या शिस्तीवर प्रश्न

व्हिडिओमध्ये तो म्हणतो, “सध्या मी पुण्यात वाहतूक कोंडीत अडकलो आहे. पण काही दिवसांपूर्वी मी जर्मनीतही अशाच एका वाहतूक कोंडीत अडकलो होतो. तेव्हा मला मोठा फरक जाणवलो, तो असा की” तिथे दोन लेनच्या महामर्गावर देखील डावीकडील लेनमध्य लोक अगदी डावीकडे गाड्या लावत होते आणि उजवीकडील लेनवरील लोक अगदी उजवीकडे गाड्या लावत होते. त्यामुळे मध्यभागी एक मोकळी जागा आपोआप तयार होते, जिथून आपत्कालीन वाहने सहज जाऊ शकतात. हे करण्यासाठी वेगळ्या पायाभूत सुविधांची गरज नसते, फक्त आपत्कालीन वाहनांचा आदर करण्याची थोडीशी जाणीव असली की पुरेसे आहे.”

त्याने व्हिडिओला कॅप्शन दिलं होतं: “आपणही हा शिस्तबद्धपणा पाळू शकतो का?”

व्हिडिओ पाहा:

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटिझन्सची प्रतिक्रिया जोरात”

हा पोस्ट व्हायरल होताच नेटिझन्सकडून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या.

एका युजरने कमेंट केली – “जर आपण सार्वजनिक ठिकाणी वर्तणूकीबाबत ज्ञान विकसित केलं, तर भारतात प्रगतीसाठी अमाप क्षमता आहे.”
तर दुसरा म्हणाला – “गमतीशीर बाब अशी आहे की, ज्या लोकांमध्ये सार्वजनिक ठिकाणी वर्तणूकीचे भान नाही, तेच लोक जेव्हा परदेशात वाहन चालवतात तेव्हा नियम पाळायला शिकतात. हे दंडांच्या भीतीमुळे आहे की आपण युरोप-अमेरिकन लोकांपेक्षा कमी आहोत असं वाटून त्यांच्या देशात नियम पाळतो, खरं कारण काय आहे ते माहित नाही.”

काहींनी मात्र वेगळी बाजू मांडली. एका युजरने लिहिलं – “हो, सार्वजनिक ठिकाणी भान राखणे हा खूप मोठा प्रश्न आहे. पण असं म्हणणं की यासाठी पायाभूत सुविधा लागत नाहीत, हे थोडं जास्त होतं. रस्त्यांची रुंदी, दर्जा बघा!”
तर दुसऱ्याने भर दिला – “सहानुभूती! हाच तो शब्द आहे ज्यावर आपण काम करायला हवं.”

दरम्यान, एकाने नाराजी व्यक्त करत लिहिलं – “भारतीय कधीच सार्वजनिक ठिकाणी वर्तणूकीचे भान विकसित करू शकणार नाहीत. आपण बाकी सर्व बाबतीत उत्तम होऊ शकतो पण या मानसिकतेच्या बाबतीत आपण अजून २०० वर्षे मागेच राहू. आणि वाहतूक कोंडीमध्ये अडकल्यावर हॉर्न वाजवून काय उपयोग? उडून जाणार आहेस का? खरंच निराशाजनक आहे.”