Ganpati Visarjan: अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ सप्टेंबरला बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांनी संपूर्ण शहर रंगून गेले होते. ढोल-ताशांचा गजर, गुलाल-फुलांचा वर्षाव व भक्तांच्या जयघोषात गणरायाला निरोप देताना अनेक अविस्मरणीय क्षण कैद झाले. मुंबईत सर्वत्र बाप्पाच्या विसर्जनाचीच धामधूम होती. प्रत्येक चौकात, रस्त्यावर, पुलांवर आणि समुद्रकिनाऱ्यावर मिरवणुकीचा जल्लोष पाहायला मिळत होता. काही ठिकाणी हजारो भक्तांनी बाप्पावर फुलांचा वर्षाव केला, तर काही ठिकाणी ढोल-ताशांच्या गजराने वातावरण गजबजून गेले.
या उत्सवात अनेक सुंदर क्षण कैद झाले. त्यातलाच एक खास प्रसंग सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यात मुंबईची ओळख असलेली लोकल ट्रेन आणि विसर्जनासाठी निघालेला गणराय या दोन्ही गोष्टी एकत्र दिसून आल्या.
या व्हिडीओत मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल ट्रेन परळच्या महाराजाला अनोखा मान देताना दिसत आहे. बाप्पाची मूर्ती रेल्वे पुलावरून जात असताना खाली एक लोकल ट्रेन आली आणि संपूर्ण पूल पार होईपर्यंत तिने जोरदार हॉर्न वाजवून बाप्पाला मानवंदना दिली. हा क्षण पाहून उपस्थित भक्तांनीही आनंदाने टाळ्या वाजवत जयघोष केला. हा क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, मुंबईकरांच्या मनात कायमचा घर करून बसला आहे आणि आनंद दुप्पट करुन गेला. मुंबईकरांसाठी बाप्पा आणि लोकल ट्रेन हे दोन्ही जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे या दोन्हींचं एकत्रित दर्शन भक्तांच्या मनात कायमचं घर करून राहिलं आहे.
पाहा व्हिडिओ
लालबागचा राजाचे विसर्जन
लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ६ सप्टेंबरला सकाळी मंडपातून निघाली आणि नेहमीप्रमाणे संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष या मिरवणुकीकडे लागले. भायखळा, नागपाडा, दोन टाकी, गोल देऊळ व ऑपेरा हाऊस पूल अशा विविध मार्गांनी जात राजाची मिरवणूक पहाटे गिरगाव चौपाटीवर पोहोचली. दर थांब्यावर भक्तांचा प्रचंड उत्साह, रंगीबेरंगी फुलांचा वर्षाव, गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष असाच जल्लोष दिसत होता. विशेष म्हणजे या वर्षीच्या मिरवणुकीत अनंत अंबानी स्वतः सहभागी झाले आणि हजारो भाविकांसोबत बाप्पाला निरोप दिला. त्यामुळे वातावरण आणखीनच भावनिक झाले.