सोशल मीडियावर नवरा बायकोच्या वादाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधीकधी हे वाद हाणामारीपर्यंत पोहोचतात. यासाठी कधी नवऱ्याने दारु पिल्याचं निमित्त असतं तर कधी आणखी काही, पण कधी नवऱ्याने आपल्याच पैशांचा हिशोब मागितला म्हणून त्याला बायकोने मारहाण केल्याचं तुम्ही पाहिलं आहे का? नसेल तर आता तेदेखील पाहायला मिळणार आहे. हो कारण उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एका महिलेने तिच्या नवऱ्याने पैशाचा हिशोब मागितला म्हणून त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

संतापलेल्या बायकोने नवऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती आपल्या बहिणीच्या मदतीने नवऱ्याला दोरीने बाधून काठीने मारहाण करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये बायकोने नवऱ्याचे दोन्ही हात धरल्याचं दिसत आहे, तर तिच्या बहीणी नवऱ्याला काठीने मारहाण करताना दिसत आहेत. हे प्रकरण अकबरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बधापूर गावातील असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच कानपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपी महिलांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितलं आहे. घटनेत मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव शिवकुमार असं आहे.

हेही पाहा- कमी वेळात जास्त काम! भिंत बांधण्यासाठी मजुरांनी केला भन्नाट जुगाड, व्हिडीओ पाहून तुम्हीही कौतुक कराल

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमार बनारसमध्ये आपल्या मोठ्या भावासोबत राहतो आणि तो कुल्फीचा स्टॉल चालवतो. घरखर्चासाठी तो दर महिन्याला पत्नी सुशीला हिला पैसे पाठवतो. मात्र, यावेळी शिवकुमारने पैसे न पाठलता तो स्वतः बनारसहून कानपूरला आला होता. यावेळी शिवकुमारच्या मेहुण्यादेखील घरी आल्या होत्या. यावेळी शिवकुमारला आपल्या बायकोने घरखर्च भागवण्यासाठी ८ क्विंटल गहू विकल्याचे समजले, ज्यामुळे तो संतापला आणि त्याने पाठवलेल्या पैशांचा हिशोब बायकोला मागितला. याच कारणावरुन नवरा-बायकोमध्ये वाद झाला.

या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं, सुशीलाने तिच्या बहिणीच्या मदतीने शिवकुमारचे हात-पाय बांधून त्याला घराबाहेर आणले आणि त्याला काठ्यांनी मारहाण केली. शिवकुमारला मारहाण होत असल्याचे पाहून त्याची आई मदतीला धावून आली तरीही या महिलांनी मारहाण करणं थांबवलं नाही. ही सर्व घटना घराबाहेर उभ्या असलेल्या एका महिलेने कॅमेऱ्यात शूट केली, जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून अनेकांनी या महिलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.