Mumbai Ganpati Aagman 2025 Video : मुंबई आणि गणपती बाप्पाचं एक अदभुत नातं आहे. यंदा २७ ऑगस्ट रोजी गणरायाचं आगमन होणार आहे. पण, त्याआधीच मुंबईत अनेक मोठ्या गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाच्या आगमनास सुरुवात झाली आहे. त्यात मुंबईतील अनेक मंडळांचा समावेश आहे. दरम्यान, रविवारी (३ ऑगस्ट) मुंबईतील काळचौकीचा महागणपती, फोर्टचा राजा, खेतवाडीचा राजा, परेलचा मोरया यांसह जवळपास २० गणेशोत्सव मंडळातील भव्य गणेशमूर्ती परळ वर्कशॉपमधून ढोल-ताशांच्या गजरात, मोठ्या जल्लोषात आगमनासाठी बाहेर आल्या. यावेळी गणेशमूर्तींची पहिली झलक पाहण्यासाठी तरुणाईने मोठी गर्दी केली होती. याच गर्दीतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात महिला पोलीस एका तरुणाच्या टी-शर्टला पकडून ओढत नेताना दिसतायत. तरुणाने तिथे उपस्थित तरुणींबरोबर थिल्लरपणा केल्यामुळे पोलीस त्याच्याबरोबर असे वागले, असे म्हटले जात आहे. दरम्यान, अनेकांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.
मुंबईत सध्या गणेशोत्सवाची लगबग सुरू झालीय. यात रविवारचं निमित्त साधून अनेक मोठी गणपती मंडळे आपल्या बाप्पाला मंडळात घेऊन गेले, या गणपती आगमन मिरवणुकीत मोठ्या संख्येने तरुणाई सहभागी झाली होती. संपूर्ण परिसर गणेशभक्तांच्या अफाट गर्दीने भरून गेला होता. यावेळी लोकांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गर्दीत कुठे गैरप्रकार घडू नये म्हणून पोलीस सर्वत्र लक्ष ठेवून होते. पण, याच गर्दीत काही तरुणींबरोबर एक नशेबाज तरुण थिल्लरपणा करताना दिसला. यावेळी कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने त्याला चांगलाच धडा शिकवला.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, परळ वर्कशॉपबाहेरील रस्त्यावर गणपती बाप्पाचा आगमन सोहळा सुरू होता. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पाची मिरवणुक सुरू होती. अनेक लहान-मोठ्या मंडळांच्या गणेशमूर्ती तिथून जात होत्या, त्यामुळे हे दृश्य पाहण्यासाठी आणि ढोल-ताशांच्या गजरात नाचण्यासाठी मोठ्या संख्येने तरुणाई सहभागी झाली होती. याच गर्दीत एक नशेबाज तरुण नाचताना काही तरुणींची छेड काढत अश्लील शेरेबाजी करीत होता. त्यामुळे तिथे असलेल्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने सरळ त्याच्या टी-शर्टला पकडून तरुणींपासून दूर ओढत नेले. दरम्यान, अनेकांनी यात त्या तरुणाची चूक असल्याचे म्हटले आहे.
@lalbaugmumbaikar_ नावाच्या पेजवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर युजर्सही वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. काहींनी पोलिसांचे हे वागणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे; तर काही प्रत्यक्षदर्शींनी त्या मुलाची चूक होती, असे म्हणत पोलिसांची कारवाई योग्य असल्याचे मत दिले आहे. दरम्यान, अनेकांनी या मिरवणूक सोहळ्याबद्दलही आपले परखड मत मांडलेय.
एका युजरने लिहिले की, मी तिथेच होतो त्या मुलाची चूक आहे. पोलिसांची काही चूक नाही. तो मुलगा खूप दारू प्यायला होता आणि मुलींचे नाव घेत होता. त्यामुळे यामध्ये चूक फक्त त्या मुलाची आहे. मुंबई पोलीस ग्रेट आहेत. दुसऱ्याने लिहिले की, मीसुद्धा त्या ठिकाणी काल होतो, तो मुलगा दारू प्यायला होता आणि मुलींकडे घाणेरडे इशारे करून नाचत होता. यावेळी त्या मुलींनी लेडीज पोलिसांना त्याच्याबद्दल सांगितले. मुलींबरोबर असं कोण वागत असेल, तर त्याला मारलं पाहिजे. मुंबई पोलीस ग्रेट आहेत. मानलं पाहिजे त्यांच्या कामाला.
तिसऱ्याने लिहिले की, माणूस उभा आहे वर्दीतला म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला. दरम्यान, अनेकांनी मंडळांना ही गर्दी आवरता येत नसेल, तर आगमन सोहळा ठेवायचा कशाला, असं मत व्यक्त केलं आहे. तर काहींनी गणपती आगमन सोहळा, पाटपूजन सोहळा हे म्हणजे गणपती बाप्पाच्या नावाने इव्हेंट सोहळा करून ठेवला आहे, लोकांमध्ये श्रद्धा उरलेली नाही. लोक फक्त रील्स, व्हिडीओसाठी हे करताना दिसतात, असे म्हटले आहे.