28 March 2020

News Flash

पाईक तो प्रजा राखोनियां कुळ

अल्लाउद्दीन खिलजीच्या मुलाने- मुबारिकने १३१८ मध्ये हरपालदेव यादव याला ठार मारले.

 

शिवाजीराजांचे स्वराज्यनिर्मितीचे कार्य सुरू झाले होते. तीनशे वर्षांच्या अंधारानंतर नवी पहाट क्षितिजावर दिसू लागली होती. हे सारे तुकोबांच्या नजरेसमोर घडत होते. परकी सत्तेने घडविलेले उत्पात ते पाहात होते. त्या सत्तेचे दास बनलेले येथील वतनदारही ते पाहात होते. राजसत्तेचे पाईक म्हणवून घेण्यात त्यांना भूषण वाटत होते. गेली तीन शतके महाराष्ट्र देशी हेच तर चित्र होते.

त्याची सुरुवात झाली १३१८ मध्ये. यादवांच्या साम्राज्यनाशापासून.

अल्लाउद्दीन खिलजीच्या मुलाने- मुबारिकने १३१८ मध्ये हरपालदेव यादव याला ठार मारले. जिवंतपणी अंगाची कातडी सोलून ठार मारले. तो पराभव आणि त्याचा धसका एवढा जबरदस्त होता की, त्याने एतद्देशीयांच्या मनातली स्वराज्याची प्रेरणाच गाडून टाकली. अवघा समाज तेजोहीन झाला. आधी बहमनी आणि नंतर तिच्यातून जन्मास आलेल्या शाह्य़ांचे दास हेच त्याचे भागधेय बनले.

गमावलेला आत्मविश्वास आणि स्वाभिमान, निरक्षरता, दारिद्रय़, धार्मिक कट्टरता, दास्यभावना.. सारीच हलाखी. भौतिक आणि वैचारिकही. अशा शीलभ्रष्ट समाजाला सावरीत होता तो वारकरी संप्रदाय.

हे काम केवळ धार्मिक स्वरूपाचे होते?

ते धर्मसुधारणेचे होतेच. बहुसंख्यांचे जीवन बद्ध करणाऱ्या, कर्मकांडांची वाळवी लागलेल्या सनातन वैदिक धर्माविरोधात त्यांचे बंड होते, तसेच ते इस्लामी आक्रमणाविरोधातही होते. याचा अर्थ वारकरी संत मुस्लीम राज्यकर्त्यांविरोधात उठाव करण्यासाठी लोकांस प्रवृत्त करीत होते असे नव्हे. ते शक्यही नव्हते. वारकरी संतांचे कार्य याहून वेगळे होते. ते मृतप्राय समाजात प्राणशक्ती भरण्याचे काम होते. मनाच्या मशागतीचे काम होते. ‘असत्याशी रिझलेल्या’ समाजाला सुधारून योग्य मार्गावर आणण्याचे काम होते. हे सामाजिक कार्य त्याकाळी धार्मिक स्वरूपातच होऊ  शकत होते. वारकरी संत तेच करीत होते.

संत नामदेव जेव्हा प्राण गेले तरी बेहत्तर परंतु विठ्ठलाला सोडणार नाही, धर्म बदलणार नाही, असे म्हणत किंवा संत एकनाथ-

‘रक्त वाहे भडभडा। तेंची तेल घृत जळे धडधडा। कौरव पतंग पडती गाढा।

दुर्योधन हा लक्ष्मी तुझा रेडा। शेवटीं आहुती घेसी तयासी।’

असे म्हणत ‘बया दार उघड’ अशी साद घालत होते, तेव्हा ती आत्मभान गमावलेल्या समाजाला दिलेली हाकच होती. त्या हाकेतून या महाराष्ट्र देशी स्वराज्याचे स्वप्न पाहू शकणारे वीरपुरूष निर्माण झाले होते. पण हे स्वप्न वास्तवात येण्यासाठी आवश्यक असते ते चारित्र्यशुद्ध समाजाचे पाठबळ. तुकोबांच्या शिकवणीचा हेतू याहून वेगळा काय होता?

तलवार तर सारेच गाजवत. मावळटापूतील तेव्हाची ती रीतच होती. तेथील शेतकरी हा धारकरीही होता. मोहीम असेल तेव्हा हाती ढाल-तलवार, नसेल तेव्हा नांगर. पण ती तलवार उचलायची ती कोणासाठी आणि कशासाठी, पाईक व्हायचे ते कोणाचे आणि कशासाठी, हा महत्त्वाचा प्रश्न होता. त्याच्या उत्तरार्थ तुकोबांनी पाईकपणाचा सिद्धांतच मांडला होता.

‘पाईकपणें जोतिला सिद्धांत। शूर धरी मात वचन चित्तीं।।’

‘मी येथे पाईकपणाचा सिद्धांत सांगत आहे. जो शूर असेल त्याच्या मनावर तो बिंबेल..’ पण पहिल्यांदा हे पाईकपण कशासाठी स्वीकारायचे ते समजून घेतले पाहिजे..

‘पाईकीवांचून नव्हें कधी सुख। प्रजांमध्यें दु:ख न सरे पीडा।।’

पाईक व्हायचे ते लोकांसाठी. ‘त्यांच्याशिवाय प्रजेची पीडा दूर होणार नाही. तिला सुख प्राप्त होणार नाही.’ या अशा पाईकीमध्येच खरे सुख आहे, समाधान आहे. ते ज्याचे त्यालाच कळेल.

‘तुका म्हणे एका क्षणाचा करार। पाईक अपार सुख भोगी।।..

पाईकीचे सुख पाईकासी ठावें। म्हणोनियां जीवें केली साटी।।’

या पाईकीची कर्तव्ये काय असतात?

‘स्वामीपुढें व्हावे पडतां भांडण। मग त्या मंडण शोभा दावी।।’

युद्धाच्या प्रसंगी पाईकाने स्वत:च्या जिवावर उदार होत स्वामीपुढे जाऊन ‘गोळ्या, बाण भडिमार’ सहन करायचा असतो, तरच त्याच्या शूरत्वाच्या अलंकाराला शोभा.

या पाईकाला सगळ्या चोरवाटा ठाऊक असल्या पाहिजेत. (लागबग ठाव चोरवाट।) त्याने स्वसंरक्षण करावेच, पण ते करता करता शत्रूला ठकवावे, त्याला नागवावे. (आपणां राखोनि ठकावें आणिक। घ्यावें सकळीक हिरूनियां।।) पण शत्रूला आपला माग लागू देऊ नये. (येऊं नेदी लाग लागों नेदी माग।)

तुकोबा येथे गनिमी कावा सांगत आहेत. मलिक अंबरने मराठय़ांना शिकविलेली ही युद्धपद्धती. त्याचाच वापर करून त्याने १६२४ मध्ये मुघल आणि आदिलशाहीच्या फौजेला पाणी पाजले होते. हीच ती नगरजवळच्या भातवडीची प्रसिद्ध लढाई. त्या वेळी तुकारामांचे वय सोळा, म्हणजे चांगलेच कळते होते. तेव्हा ही युद्धपद्धती त्यांच्या परिचयाची असणे शक्य होते. पाईकीच्या सिद्धांतात त्यांनी त्याच गनिमी काव्याचा समावेश केला आहे. अशा पद्धतीने लढणारे सैनिक ज्याच्याकडे आहेत, तो नाईक नक्कीच सर्वाहून बलिष्ठ ठरणार. (तुका म्हणे ऐसे जयाचे पाईक। बळिया तो नाईक त्रलोकींचा।।)

तुकोबा सांगतात, सैनिकाने प्रजेचे रक्षण करावे. शत्रूचा बीमोड करावा. (पाईक तो प्रजा राखोनियां कुळ। पारखिया मूळ छेदी दुष्टा।।) स्वामिनिष्ठा हे पाईकाचे मोठे लक्षण. त्याची आपल्या धन्यावर निष्ठा हवी. स्वामिकार्यापुढे त्याला आपला देह तृणवत वाटला पाहिजे. विश्वासावाचूनी त्याच्या देहाला काहीही मोल नाही. आपल्या कर्माने धन्याला कोणत्याही प्रकारचे उणेपण येता कामा नये याची काळजी त्याने घेतली पाहिजे. (तो एक पाईक पाईकां नाईक। भाव सकळीक स्वामिकाजीं।। तृणवत तनु सोनें ज्या पाषाण। पाईका त्या भिन्न नाहीं स्वामी।। विश्वासावांचूनि पाईकासी मोल। नाहीं मिथ्या बोललिया।। तुका म्हणे नये स्वामी उणेपण। पाईक जतन करी त्यासी।।)

आजच्या मर्सिनरी- भाडोत्री सैनिकांप्रमाणे तेव्हाच्या कित्येक मराठा लढवय्यांची, सरदारांची रीत होती. आज या शाहीत, तर उद्या दुसरीकडे. हे पोटासाठी लढणे तुकोबांना नामंजूर होते. त्यांच्या नजरेसमोरचा मराठा लढवय्या असा नव्हता. ते सांगतात –

प्रजी तो पाईक ओळीचा नाईक। पोटासाठी एक जैसे तैसे।।

आगळें पाऊल आणिकासी तारी। पळतीं माघारीं तोडिजेती।।

पाठीवरी घाय म्हणती फटमर। निधडा अंगें शूर मान पावे।।

‘तलवार परजणारा (प्रजी), युद्धकुशल असा पाईक आणि त्याचा धनी हे बरोबरीचेच. पण काही लोक पोटासाठी लष्करात भर्ती होतात, पण त्यांची किंमत तशीच असते. असे रडतराऊत शत्रू चाल करून येताच पाय लावून माघारी पळतात. मरतात. असे पाठीवर घाव खाऊन मरणारांचे मरण हे गांडूपणाचे. शत्रूवर जो निधडेपणाने मारा करतो त्या शूरालाच खरा मान मिळतो.’ यापुढच्या अभंगातही तुकोबा पुन्हा पोटासाठी लढणाऱ्यांचा निषेध करताना दिसतात. पोटासाठी जे हाती हत्यार धरतात ते सैनिक कसले? ती तर वेठीची गाढवे. (धरितील पोटासाठी हतियारें। कळती तीं खरें वेठीचींसीं।।)

पाईकाच्या या ११ अभंगांमध्ये तुकोबा वारंवार स्वामिनिष्ठा, स्वामिकार्यतत्परता (करूनि कारण स्वामी यश द्यावें।) यांचे महत्त्व सांगताना दिसतात. पाईकांनी उगाच बढाईखोरी करू नये. (प्रसंगावांचूनि आणिती अविर्भाव। पाईक तो नांव मिरवी वायां।।) कर्तव्यात कसूर करू नये. मरण सगळ्यांना येणारच आहे, पण त्याला भिऊन मागे हटू नये. निर्भयपणे जो आपले कार्य करतो तोच कीर्तिमान होतो. (तुका म्हणे मरण आहे या सकळां। भेणें अवकळा अभयें मोल।।) हा तुकोबांचा उपदेश आहे.

आता या उपदेशाला आध्यात्मिक अर्थ डकवणे काही कठीण नाही. सांप्रदायिक मंडळींनी तेच केले. त्यातून आपण तुकोबांसारख्या संतांचे अवमूल्यन करत आहोत, त्यांना डोळे असून आंधळे, भोवती काय चालले आहे याची गंधवार्ता नसलेले ठरवीत आहोत याचेही भान राहिलेले नाही. वस्तुत: तुकोबांच्या नजरेसमोरही तेव्हा एका वेगळ्याच ‘गावा’चे स्वप्न होते. –

न मिळती एका एक। जये नगरींचे लोक।।

भलीं तेथें राहू नये। क्षणे होईल न कळे काय।।

न करितां अन्याय। बळें करिती अपाय।।

नाहीं पुराणाची प्रीती। ठायीं ठायीं पंचाइती।।

भल्या बुऱ्या मारी। होतां कोणी न विचारी।।

अविचाऱ्या हातीं। देऊनि प्रजा नागविती।।

तुका म्हणे दरी। सुखें सेवावी तें बरी।।

ज्या गावातल्या लोकांचे एकमेकांशी भांडण आहे, जेथे कोणी अन्याय केला नसतानाही त्याला शिक्षा केली जाते, जेथे धर्माची चाड नाही, लोक नसत्या उचापती करतात, चांगल्याला वाईटाकडून मार मिळतो, त्याची कोणी दखलही घेत नाही, जेथे अविचारी लोकांच्या हाती कारभार आहे, जेथे असे लोक प्रजेला नागवीत आहेत, तेथे भल्या माणसाने मुळीच राहू नये. कारण तेथे कोणत्या क्षणी काय होईल काही सांगता येत नाही. अशा ठिकाणापेक्षा एखाद्या दरीत जाऊन राहिलेले चांगले.

यातून तुकोबांना कशा प्रकारचे ‘गाव’ अभिप्रेत होते ते समजते. त्यासाठी कशा प्रकारचे पाईक हवे आहेत तेच ते सांगत होते.

तीनशे वर्षांनंतर महाराष्ट्रदेशी एक नवे चित्र साकारले जात होते. त्यात तुकोबांच्या काव्याचे रंग होते हे कोणी विसरता कामा नये..

tulsi.ambile@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2016 2:04 am

Web Title: sant tukaram maharaj abhang
Next Stories
1 पाईकपणे जोतिला सिद्धांत
2 आणिकांची मात नाईकावीं कानीं!
3 देव रोकडा सज्जनी!
Just Now!
X