28 September 2020

News Flash

शिकवणीग्रस्तांच्या देशात ..

सकाळी ६ वाजता कराटे (किंवा तत्सम हा-हू व्यायाम प्रकार).. सकाळी १० वाजता तबला/ गिटार/ भरतनाटय़म शिकवणी..

(संग्रहित छायाचित्र)

सकाळी ७ वाजता शाळा.. दुपारी ४ वाजता गणिताची शिकवणी.. संध्याकाळी ७ वाजता मराठी/हिंदी अशा ‘अजिबात न समजणाऱ्या’ भाषांची शिकवणी!

सकाळी ६ वाजता कराटे (किंवा तत्सम हा-हू व्यायाम प्रकार).. सकाळी १० वाजता तबला/ गिटार/ भरतनाटय़म शिकवणी.. दुपारी ४ वाजता ‘फोनिक्सचे लेसन्स’.. सायंकाळी ७ वाजता फुटबॉलची सत्रे..  उपरोल्लेखित पहिली दैनंदिनी सोमवार ते शुक्रवारची. दुसरी दैनंदिनी शनिवार, रविवारची. आईबाप अधिकच चोखंदळ वगैरे असल्यास बुद्धिबळ, संस्कृत, साल्सा, जंगल ट्रेल किंवा महिन्यातून एखादा ट्रेक वगैरे. हे सगळं वाचून आपल्याला दमायला झालं असेल, तर हल्ली देशातल्या जवळपास प्रत्येक मोठय़ा शहरातले नवसमृद्ध आईबाप आपल्या अपत्यांना ज्या प्रकारे विविध शिकवण्यांनी जोखडून टाकतात, त्या पिलांचं काय होत असेल याची कल्पना करा. आता एका आंतरराष्ट्रीय पाहणीतून भारतातील मुलं ही सर्वाधिक ‘शिकवणीग्रस्त’ असल्याच्या समजुतीवर शिक्कामोर्तबच झालंय. केम्ब्रिज इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संस्थेनं केलेल्या पाहणीत भारतातली ७४ टक्के मुलं गणिताच्या शिकवणीला जातात, असं आढळून आलंय. शिक्षणेतर उपक्रमांमध्ये जवळपास ७२ टक्के मुलं सहभागी होतात; पण केवळ तीन टक्के मुलं आठवडय़ात सहा तासांपेक्षा अधिक वेळ खेळतात. ‘शाळेत गेम्स आणि योगा वगैरे असतंच ना’ असा बचाव सहसा यावर पालकांकडूनच केला जातो. शिकवण्या किंवा क्लासेसचं हे खूळ गेल्या २० वर्षांत विषवल्लीवत फोफावलंय. हल्ली आपल्या बाळाला विविध शिकवण्यांमध्ये गुरफटून टाकलं नाही, तर आपल्या ‘पेरेंटिंग’वर समाज शंका घेईल की काय, अशी धास्तीच युवा पालकांना वाटत असावी! मध्यंतरी एका अहवालात असा निष्कर्ष काढण्यात आला की, जे मूल आपल्या आईबापाकडून शिकतं, ते शाळेत कोणताही विषय चटकन आत्मसात करू शकतं. मग हे प्रत्यक्षात आणायला अडचण कसली? म्हटलं तर बरीच आहे.. सकाळी उठून चहा-नाश्ता, आंघोळी.. व्हॉट्सअ‍ॅप.. जेवण- डबे- टीव्ही- नोकरी- पीपीटी प्रेझेंटेशन- घरी परत- टीव्ही.. व्हॉट्सअ‍ॅप.. बॅडमिंटन- झुंबा- रात्रीचं जेवण.. व्हॉट्सअ‍ॅप.. वीकेंडला भल्या सकाळी ९ वाजता उठल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप.. आठवडे बाजार.. दुपारचे जेवण.. नेटफ्लिक्स.. व्हॉट्सअ‍ॅप.. संध्याकाळी टीव्ही- सिनेमा- रेस्तराँ- पार्टी.. व्हॉट्सअ‍ॅप.. परीक्षा काळात – पोराचा अभ्यास, चिडचिड, संताप, नैराश्य.. व्हॉट्सअ‍ॅप.. पर्यावरणशास्त्रातले मार्क पाहून ठरवलं जातं- इथून पुढे ‘ईव्हीएस’साठीही क्लास लावायलाच पाहिजे.. त्याशिवाय पोरगं सुधारत नाही.. नाही कसं ते बघतोच.. क्लास लावला की सुतासारखा/खी जायला लागेल..  हे आधी कसं नाही सुचलं म्हणून स्वत:लाच बोल लावायचे!  घरोघरी मातीच्याच चुली तसं आता घरोघरी सगळ्याच्याच शिकवणी, असं म्हणावीशी परिस्थिती आहे. शिकवणीग्रस्त मुलांनी उद्या खरोखरच एखादा मोर्चा काढला, तर कोणाचीही त्या मोर्चाला भिडण्याची हिंमत होणार नाही; पण मोर्चा काढण्यासाठी तरी त्या पिलांना प्रथम शिकवणीतून वेळ काढावा लागेल.. या शिकवणीग्रस्तांच्या देशात तेवढा तरी वेळ कोणी देईल?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2018 2:16 am

Web Title: article about in the country of teaching suffering
Next Stories
1 बारावा अवतार ..
2 चौथा ऋतू..
3 चला, थोडे गंभीर होऊ या!
Just Now!
X