असे म्हणतात, की मुंबईचे पाणी प्यायलेल्या कोणासही जगाच्या पाठीवर कोठेही जाण्याची, राहण्याची किंवा वावरण्याची भीती वाटत नाही. खरे म्हणजे, मुंबईचे पाणी हे मुळातच मुंबईचे नसते. मग हा आत्मविश्वास येतो कुठून हा एक प्रश्नच असतो. पण त्याचे उत्तर लोकल गाडीत, म्हणजे उपनगरी रेल्वेत दडलेले आहे. त्या प्रवासास जो रुळतो, तो खरा मुंबईकर होतो, आणि त्याच्या अंगी आत्मविश्वास आपोआपच ठासून भरला जातो, हे ते खरे कारण! असेही म्हणतात, की देशाटन केल्याने मनुष्याच्या अंगी चातुर्य येते. पण मुंबईकरास त्यासाठी देशभर भटकंती करण्याची आवश्यकताच नसते.  कारण, अवघा देश तर मुंबईतच एकवटलेला असतो. देशाच्या कानाकोपऱ्याच्या संस्कृतीचे, आणि समाजव्यवस्थेचे पूर्ण रूप मुंबईत सामावलेले असते, आणि डोळे व कान उघडे ठेवले, तर त्या रूपाचे दर्शन मुंबईच्या लोकल गाडीत, म्हणजे, उपनगरी गाडीतच घडते. मग शहाणपणा मिळविण्यासाठी ते देशाटन कशाला करावयास हवे?.. उपनगरी गाडीच्या प्रवासातून आपोआपच हे सारे पदरात पडते. याच गाडीच्या सेकंड क्लासात माणुसकीचा अनुभव  प्रत्येकासच कधी ना कधी मिळालेला           असल्याने, त्या भांडणांतून माणुसकीचाच तोडगा निघतो. मुंबईच्या गर्दीत एकमेकांस सांभाळण्याची जबाबदारी प्रत्येक सहप्रवासी घेत असतो. म्हणूनच, जेव्हा एकमेकांशी ओळखही नसलेला प्रवाशांचा एखादा घोळका वाट चुकलेल्या गाडीतून प्रवास करतो. तरीही तो अनुभव सहजपणे गाठीशी बांधून ‘लोकल किस्सा’ म्हणून साठविलेल्या आठवणींच्या कप्प्यात अलगद ठेवला जातो. मुंबईच्या ट्रान्स हार्बर मार्गावर वाशी स्थानकावर मंगळवारी अशाच एका किश्शाची प्रवाशांच्या आठवणींच्या साठवणीत भर पडली. खरे म्हणजे, मुंबईत रेल्वेच्या उद्घोषणा आणि हवामान खात्याचे अंदाज या दोन्ही गोष्टी बिनभरवशाच्याच असतात, हे अनुभवास येऊनही कधी कधी मुंबईकर प्रवासी त्यामध्ये गुरफटतोच. तसेच झाले. ठाण्यास जाणारी गाडी फलाटावर येत असल्याची उद्घोषणा सुरू असतानाच एक गाडी फलाटावर आली, आणि गर्दीस कोंबून घेऊन पुढे थेट यार्डात जाऊन थांबली. असे काही झाले, की नवखा प्रवासी भांबावतो. पण मुरलेल्या मुंबईकराने या ‘यार्ड पर्यटना’चाही आनंद लुटला असेल यात शंका नाही. तसेही, उपनगरी गाडीच्या प्रवासातूनच संपूर्ण देशाची ओळख करून घेणाऱ्या मुंबईकरास, आपल्याला वाहून नेणाऱ्या गाडीचे यार्ड म्हणजे काय हो कोठे ठाऊक असते?.. ते पाहण्याची संधी  त्याला फारशी मिळालेलीच नसते. ट्रान्स हार्बरच्या गाडीतून प्रवास करणाऱ्यांना उद्घोषणेच्या चुकीमुळे ती संधी मिळाली, आणि अनुभवांच्या शिदोरीत आणखी भर पडली.असा अनुभव घेतलेला मुंबईकर जगाच्या  पाठीवर कुठेही गेला आणि त्याची गाडी चुकून भलत्याच ठिकाणी पोहोचली, तरी तो भांबावणार नाही. परवा ‘एअर कॅनडा’च्या टोरांटोकडे जाणाऱ्या विमानातील एका प्रवासी महिलेस झोप लागली आणि जाग आल्यावर,  कुठे तरी थांबवून ठेवलेल्या विमानात अडकल्याचे लक्षात येताच ती कमालीची घाबरून गेली. तिच्या त्या थरकापाचे वर्णन समाजमाध्यमांवरून जगभर पोहोचले. मुंबईकराच्या वाटय़ास असा काही अनुभव आलाच, तर त्याचे वर्णन करताना त्याला अनुभवाचा आनंद लपविता येणार नाही, हेच खरे! कारण, मुंबईच्या उपनगरी प्रवासात एकदा तरी यार्डात जाणाऱ्या गाडीतून एकाकी प्रवास करण्याचा अनुभव कुणी ना कुणी घेतलेला असतो..