भाजप हा इतिहास उगाळणाऱ्यांचा पक्ष नसून या देशाचे भविष्य घडविणाऱ्यांचा पक्ष आहे, हे अनेकांना माहीत आहेच. देशात गेल्या साठ वर्षांत काहीच झाले नाही, असे सांगणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्षांनीच पक्षाची इतिहासविषयक भूमिका अवघ्या तीन आठवडय़ांपूर्वी पुरेशी स्पष्ट केलेली आहे. इतिहास उगाळण्यातून केवळ आणि केवळ नकारात्मकताच फैलावणार असेल, तर तो इतिहास काय कामाचा? शिवाय अच्छे दिन आणण्याचे, त्यासाठी आधी देश काँग्रेसमुक्त करण्याचे कार्य पक्षाने अंगीकारले आहेच आणि त्या सकारात्मक भविष्यासाठी पक्षाचा सत्तासूर्य पुढील २५ वर्षे तळपत राहणार, असे भाकीत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीच दोन वर्षांपूर्वी केले असल्यामुळे त्याला आजही जितका अर्थ आहे तितकाच उद्याही राहील. मात्र वरुण गांधी यांना हा भविष्यकाळ बहुधा माहीत नसावा. त्यांचे c. नकारात्मक वृत्ती हा आपल्या भविष्याचा सर्वात मोठा शत्रू. वरुण गांधींनी तिचा फैलाव केला आहे. तेव्हा वरुण यांचे काय काय चुकले, हे खुलासेवार समजून घेणे इष्ट ठरेल. स्वत:च्या पणजोबांची आठवण काढण्याची संधी गणेशोत्सवानंतर काही दिवसांनी- म्हणजे नजीकच्याच भविष्यात- मिळणार असतानाही वरुण यांनी गेल्या शनिवारीच, म्हणजे गणेशाच्या आगमनाआधीच त्यांच्या पणजोबांची आठवण काढली, तीही जाहीरपणे. हे पणजोबा काँग्रेसमध्ये, तेही स्वातंत्र्योत्तर काळातल्या काँग्रेसमध्ये होते. स्वातंत्र्यानंतर ‘काँग्रेस विसर्जित करा’ हा गांधीजींचा सल्ला न मानता ते पंतप्रधानही बनले होते. पंडित जवाहरलाल नेहरू त्यांचे नाव. ते राष्ट्रपुरुष असल्याची नोंद सरकारदप्तरी आजही आढळेल. मात्र वरुण यांनी उगाळलेला इतिहास त्याहीपूर्वीचा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात नेहरू साडेपंधरा वर्षे तुरुंगात होते, हा त्यागच आहे आणि त्यांनी देशासाठी घाव झेलले आहेत, असे वरुण यांचे म्हणणे. नेहरू राजासारखे विलासी जीवन जगले असे आजकाल काही जणांना वाटते, पण त्यांचा त्यागही पाहा, असा काही तरी इतिहासात बुडून गेलेला उपदेश वरुण यांनी त्यांच्या सुलतानपूर लोकसभा मतदारसंघातल्या तरुणांच्या सभेत केला. हे सारेच किती नकारात्मक! ‘सकारात्मक असाल, तरच भविष्य आहे’ हे सूत्र २०१४ च्या उन्हाळ्यापासून १२५ कोटींच्या जनतेने इतके स्वीकारले की, वर्तमान कसा आहे याचीही चिकित्सा आता नको वाटते.. काय उपयोग असल्या चिकित्सेचा? थोडय़ा वेळाने जुनीच होणार ना ती? इतिहास हवाच, पण तोही सकारात्मक हवा! क्लोनिंग आणि जनुकीय अभियांत्रिकीत आपल्याच पूर्वजांनी जगाला दिली, हे सकारात्मक इतिहासाचे अजरामर उदाहरण वरुण विसरले आणि जे सकारात्मक इतिहास विसरतात, त्यांना भविष्यकाळ कधीच माफ करणार नाही. पणजोबा साडेपंधरा वर्षे तुरुंगात होते, हे उगाळण्याऐवजी वरुण यांनी, आपण स्वत: २००९ सालात २० दिवस पिलिभीतच्या कोठडीत काढले, हे सांगितले असते तर त्यांच्या भविष्यकाळाने त्यांना माफी दिलीही असती.. ती आता मिळणे कठीण आहे.