एकुणात काय, तर सांप्रतकाळी हवामान खात्यातील हवा फारशी चांगली नाही किंवा हवामान खात्याविषयीची सामान्यांमधील हवा फारशी चांगली नाही, असे म्हणू या हवे तर. खरे तर ही परिस्थिती वर्षांनुवर्षांची आहे; पण ती अधिक लक्षात येते ती पावसाळ्यात. आता हवा चांगली नाही म्हणजे काय? तर हे खाते, त्यातील माणसे, त्याची यंत्रणा, त्यांचे अंदाज हे सारे कुचेष्टेचे विषय ठरतायत सध्या. पण आता हवामान खात्याने आपल्या कारभाराबाबत थोडा चौकटीबाहेरचा विचार करायला हवा आणि हा विचार करण्यासाठी सरकारने, या खात्यातील मंडळींनी जरा आपल्या संस्कृतीकडे, पुरातन ज्ञानाकडे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे निसर्गाकडे डोळे उघडून बघायला हवे. आपल्याकडे पावसाची कुंडली मांडणारी किती तरी निष्णात मंडळी आहेत. पर्जन्यराजाच्या कुंडलीत कुठला ग्रह कुठल्या स्थानी आहे, कुठल्या ग्रहाचे भ्रमण कुठल्या स्थानातून होत आहे, कुठला ग्रह लाभप्रद वा वक्री आहे हे त्यांना चांगले ठाऊक असते. त्यावरून ते पावसाचा अंदाज बांधू शकतात. आता कधी कधी चुकतात त्यांचे अंदाज ती गोष्ट वेगळी; पण अब्जावधी किलोमीटरवरील ग्रहांवर त्यांचे नियंत्रण कुठले असायला? त्यांना न सांगता एखादा ग्रह एक शतांश मिलिमीटरने इकडेतिकडे झाला तरी त्यांचा अंदाज चुकणार. अशा वेळी त्यांना समजून घेणे गरजेचे आहे. पक्ष्यांच्या हालचालींवरून, वर्तनावरूनही अंदाज बांधता येतात अचूक. कुठला पक्षी झाडावर किती उंचावर घरटे बांधतो आहे, किती आतवर बांधतो आहे यावरून येतोच अंदाज पावसाचा. त्यामुळे हवामान खात्याने एक करावे.. आपल्या कार्यालयांच्या आवारात अशी झाडे लावावीत. अनायासे त्यातून सामाजिक वनीकरणदेखील साधेल. त्या झाडांवर सीसीटीव्ही कॅमेरे रोखून ठेवावेत आणि पक्ष्यांच्या हालचालींवरून पावसाचा अंदाज बांधावा. आपल्या घरांमधील साध्या मुंग्यांच्या वर्तनावरूनही पावसाचा होरा वर्तविता येतो म्हणे. हे तर फारच सोपे. लोकांनी घरी पेस्ट कंट्रोल न करता थोडय़ा मुंग्या येऊ द्याव्यात व त्यांच्या हालचाली हवामान खात्याला कळवाव्यात. अशी माहिती संकलित करून पावसाचा अंदाज बांधता येईल हवामान खात्याला. त्याशिवाय कौल लावून पावसाची भविष्यवाणी मांडणारे तज्ज्ञ लोक गावोगावी आहेतच. हा असा इतका विपुल खजिना हाती असताना कशाला हवी ती महागडी यंत्रणा आणि लक्षावधी रुपयांची डॉपलर की काय ती रडारे? स्वत:ची आणखी चेष्टा टाळण्यासाठी हवामान खात्याने आता या खजिन्याची मदत घ्यावीच. त्याशिवाय तरणोपाय नाही.