कुंबळेच्या नावाला कार्यकारिणीचाही विरोध
नवी दिल्ली : ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर रवी शास्त्री यांचे मुख्य प्रशिक्षकाचे पद रिक्त झाल्यावर अनिल कुंबळेचे पुनरागमन हे बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांना रुचणारे नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) परदेशी प्रशिक्षकाच्या शोधात आहे.
‘‘मुख्य प्रशिक्षकपदावर कुंबळेला परतण्याची इच्छा नाही. तसेच अध्यक्ष सौरव गांगुली वगळता ‘बीसीसीआय’च्या कार्यकारिणी समितीमधील कुणालाही त्याच्या नावात रस नाही. त्यामुळे मंडळाकडून परदेशी प्रशिक्षकाबाबत चाचपणी केली जात आहे. संघातील त्याच खेळाडूंचा (विराट कोहली आणि अन्य खेळाडू) पुन्हा सामना करावा लागेल, काहीच नवे नाही, याची कुंबळेला जाणीव आहे,’’ अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी दिली आहे.
‘‘व्हीव्हीएस लक्ष्मणसुद्धा कार्यकारिणीला प्रशिक्षकपदासाठी योग्य उमेदवार वाटत नाही. त्यामुळे उपलब्ध असलेल्या कालावधीत ‘बीसीसीआय’कडून शोध जारी आहे. कुंबळे प्रशिक्षक म्हणून प्रभाव पाडू शकलेला नाही. भारताप्रमाणेच पंजाब किंग्ज संघासाठीही तो फारसा यशदायी ठरलेला नाही,’’ असे सूत्रांनी सांगितले. भारताचे फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोडसुद्धा मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणार असल्याची माहिती मिळत आहे.
शास्त्री यांचा कार्यकाळ ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर संपत असल्याच्या वृत्तानंतर कुंबळे हा मुख्य प्रशिक्षकपदाचा दावेदार मानला जात होता; परंतु कुंबळे या पदासाठी अनुत्सुक आहे. कर्णधार कोहलीशी मतभेदांमुळे २०१७ मध्ये कुंबळेला पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून पराभवानंतर कुबळेने पद सोडले होते. त्यानंतर कोहलीने विनोद राय यांच्या नेतृत्वाखालील समितीला शास्त्री यांची नियुक्ती करण्याची सूचना केली होती. त्या वेळी कुंबळेने पदावर कायम राहावे, असे ‘बीसीसीआय’च्या क्रिकेट सुधारणा समितीचा सदस्य गांगुलीचे मत होते.
कुंबळे सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) पंजाब किंग्ज संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि कार्यकारी क्रिकेट संचालक म्हणून कार्यरत आहे.
अनिल कुंबळे
