हवाई पाहणीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
तामिळनाडूतील पूरग्रस्त भागांची गुरुवारी हवाई पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत व पुनर्वसन कामांसाठी तातडीने एक हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली.
मदतकार्य सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे एक हजार कोटी रुपयांची रक्कम तत्काळ जारी करण्यात येईल. केंद्राने यापूर्वी जाहीर केलेल्या ९४० कोटींच्या रकमेव्यतिरिक्त
ही रक्कम असेल, असे मोदी यांनी येथील ‘आयएनएस अडय़ार’ या नौदल तळावर सांगितले. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली.
‘मी तुमच्या मदतीसाठी तत्पर राहीन,’ असे एक वाक्य तामिळमध्ये बोलून मोदी यांनी त्यांच्या संक्षिप्त निवेदनाची सुरुवात केली. मान्सूनच्या तडाख्यामुळे झालेले नुकसान व दुर्दशा यांची मी पाहणी केली आहे. या आपत्तीच्या काळात देशाचे लोक तामिळनाडूसोबत राहतील, असे तामिळनाडूतील केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन यांच्या सोबतीने केलेल्या
हवाई पाहणीनंतर त्यांनी सांगितले.
या वेळी राज्यपाल के. रोसैया व मुख्यमंत्री जे. जयललिता हेही त्यांच्यासोबत होते.