देशभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव राज्यात झपाट्याने वाढत आहे. सामान्य माणसाबरोबर करोना विरोधातील लढाईत महत्वपूर्ण भूमिका निभवणाऱ्या, राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना देखील दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग होत असून, करोना पॉझिटिव्ह असलेल्या पोलिसांच्या संख्येने आता 2 हजाराचा टप्पा ओलांडला आहे.
मागील चोवीस तासांत राज्यभरातील 131 पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. तर, यामुळे राज्यातील करोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या आता 2 हजार 095 वर पोहचली आहे.
महाराष्ट्र पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, करोनाबाधित 2 हजार 095 पोलीसांमध्ये 236 अधिकारी व 1 हजार 859 पोलीस शिपायांचा समावेश आहे. तर आतापर्यंत उपचारानंतर बरे झालेल्या एकूण 897 पोलीसांमध्ये 75 अधिकारी व 822 पोलीस शिपाई आहेत. करोनामुळे 22 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे.राज्यातील जवळपास 57 हजार करोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत करोना पॉझिटिव्ह पोलिसांचे प्रमाण 3.6 टक्के आहे.
पोलीस विभाकडून वेळोवेळी मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यातील पोलिसांमध्ये करोनाचे रुग्ण आढळणे सुरू झाली. 6 मे रोजी करोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या 500 वर पोहचली होती. तर 14 मे रोजी करोनाबाधित पोलिसांच्या संख्येने एक हजाराचा टप्पा ओलांडला होता.
दिवसेंदिवस पोलिसांमध्ये करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत, दक्षतेचा उपाय म्हणून 50 ते 55 वर्षे वयोगटातील तब्बल 23 हजार पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाचा धोका कमी असलेल्या ठिकाणी नियुक्त करण्यात आले. तर 55 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 12 हजार पोलीस कर्मचाऱ्यांना घरी राहण्यास सांगण्यात आले.