पाकिस्तानी कलाकारांवरुन सुरु असलेल्या वादात आता एफटीआयआयचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनी उडी घेतली आहे. पाकिस्तानी कलाकारांवर कायमची बंदी घालण्यात यावी अशी मागणी गजेंद्र चौहान यांनी केली आहे. भारतात चित्रपटात काम करण्यासाठी १० हजार इच्छूक कलाकार धडपडत असताना पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घेण्याची गरज काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
पुण्यात गजेंद्र चौहान यांनी इंडियन एक्सप्रेसच्या प्रतिनिधींशी मनमोकळा संवाद साधला. यात चौहान यांनी एफटीआयआयच्या अध्यक्षपदावरील नियुक्तीपासून ते ऐ दिल है मुश्किल या चित्रपटातील वादावर त्यांची रोखठोख मत मांडली. एफटीआयआयच्या अध्यक्षपदावर गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्यास विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला होता. मला विरोध करुन दर्शवून मोदी सरकारला टार्गेट केले जात होते असा आरोपच चौहान यांनी केला आहे. अध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून चौहान यांनी आत्तापर्यंत एकच बैठक घेतली आहे. याविषयी विचारले असता चौहान म्हणाले, मी एफटीआयआय कॅम्पसमध्ये बैठक घेतल्यास वातावरण बिघडू शकते. त्यामुळे अन्यत्र बैठक घेण्याचे ठरवले आहे. इन्स्टिट्यूटच्या संचालकांशी मी बोललो असून लवकरच बैठक होईल असे ते म्हणालेत. मी पूण्यात येत नसलो तरी मी फोनवरुन सर्वांच्याच संपर्कात आहे असेही त्यांनी सांगितले. एफटीआयआयचे भगवेकरण करण्याचा डाव असल्याचा आरोपही चौहान यांनी फेटाळून लावला आहे. मी अध्यक्षपदी आल्यापासून एफटीआयआयच्या कॅम्पसमध्ये भगवे झेंडे लावले का, कॅम्पसमध्ये ड्रेसकोड लागू केला का असा प्रश्नच त्यांनी विरोधकांना विचारला आहे. सैन्यात भरती झालेल्या जवानाने युद्धाच्या वेळी पळ काढल्यास त्यांना देशद्रोही म्हटले जाते. मला कितीही विरोध झाला तरी सरकारने दिलेली जबाबदारी मी पूर्ण करीन असे त्यांनी आवर्जून सांगितले. आम्ही गेल्या काही महिन्यांमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये सुधारणा केल्या आहेत. नवीन फॅकल्टी मेंबर आणले असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांना झाला आहे. आगामी काही काळात आम्ही यामध्ये आणखी सुधारणा करु अशी ग्वाही त्यांनी दिली.
‘ऐ दिल है मुश्किल’च्या वादावरही त्यांनी भाष्य केले. पाकिस्तानी कलाकारांना घेण्यामागे निर्मात्यांचा आर्थिक फायदाही असू शकतो. त्यांना चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी एक देश मिळतो याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आपल्याच घरात घुसून आपल्याला मारणा-या लोकांना तुम्ही चहा-नाश्त्यासाठी विचारणार का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. एफटीआयआयच्या वादामुळे प्रसिद्धी मिळाली का असा प्रश्न विचारला असता चौहान म्हणाले, मी यापूर्वीही खूप काम केले आहे. सध्या माझ्याकडे जास्त चित्रपट नाहीत. तसेच पक्षासाठी कामात व्यस्त आहे.