मुंबई : शैक्षणिक संस्थांमधील शैक्षणिक आणि भौतिक सुविधा तपासून त्यांचा दर्जा ठरविणारी ‘नॅक’ मानांकने मिळविण्यात महाराष्ट्रातील सरकारी विद्यापीठांपेक्षा अभिमत विद्यापीठे आघाडीवर आहेत.
राज्यातील ६४ पैकी केवळ ३० विद्यापीठांकडे नॅकचे मानांकन आहे. त्यातही अभिमत विद्यापीठे अधिक म्हणजे १८ आहेत. ११ राज्य विद्यापीठे आहेत, तर एक केंद्रीय विद्यापीठ आहे. तसेच मानांकन मिळविणाऱ्यांपैकी ९० टक्के विद्यापीठे ही शहरातील किंवा निमशहरातील आहेत. नॅकच्या भौतिक सुविधा, शैक्षणिक संसाधनांची उपलब्धता, अभ्यासक्रमाचा दर्जा, नवनवीन संकल्पना रुजविणे आदी सातही निकषांमध्ये अभिमत विद्यापीठांची कामगिरी उच्चतम असल्याचेही निरीक्षण महाराष्ट्रातील उच्चशिक्षण संस्थांचे विश्लेषण करून नॅकने तयार केलेल्या अहवालात हे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मंगळवारी बेंगळूरु येथे ‘राष्ट्रीय मूल्यांकन परिषदे’ने (नॅक) तयार केलेल्या महाराष्ट्र राज्याच्या अहवालाचे प्रकाशन केले. यात महाराष्ट्रातील उच्चशिक्षणाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेऊन भविष्यात करावयाच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाला नॅकचे संचालक प्रा. एस. सी. शर्मा उपस्थित होते.
नॅकने आतापर्यंत १६ राज्यांचे अहवाल तयार केले असून हा १७वा अहवाल आहे. तज्ज्ञ समितीने तयार केलेल्या या अहवालामध्ये महाराष्ट्र राज्याचा परिचय, राज्यातील उच्चशिक्षण संस्थांच्या मूल्यांकनाचा आढावा, गुणवत्ता विश्लेषण, संख्यात्मक विश्लेषण, निष्कर्ष व निरीक्षणे तसेच भावी दृष्टिक्षेप व शिफारसींचा समावेश आहे.
सर्वाधिक शैक्षणिक संस्था महाराष्ट्रातील
देशभरातून नॅकचे मूल्यांकन मिळविणाऱ्या ८,५६९ शैक्षणिक संस्थापैकी एकपंचमांश म्हणजे १,७४३ संस्था महाराष्ट्रातील आहेत.