मराठी कलाक्षेत्रातला चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर. त्याने छोट्या पडद्यावरून त्याच्या अभिनयाची सुरवात केली. नंतर हळूहळू मोठ्या पडद्यावर आणि मग वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ललित प्रभाकर त्याच्या सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. त्याने शेअर केलेला प्रत्येक फोटो आणि व्हिडीओ नेहमीच इंटरेस्टिंग असतात. नुकताच ललितने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला असून सध्या तो तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
ललितने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओत तो बराच झगडताना दिसत आहे. तो एका वॉशबेसिन समोर उभा राहिला असून त्याला कळत नाही आहे की नळ कसा सुरू करावा. तसंच जर त्याने एका नळा खाली हात धरला असेल तर पलीकडच्या नळातून पाणी यायला सुरुवात होते असे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. ललितने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की,”हाथ भी नही आया और मूॅंह भी नही लगा”. या परिस्थितीला साजेल असं गाणं देखील या व्हिडीओमध्ये ऐकायला येत आहे.
View this post on Instagram
ललितने हा व्हिडीओ शेअर करताच कलाक्षेत्रातील त्याच्या मित्रमंडळींनी त्यावर कमेंट्स केल्याचे दिसून आले. अभिनेता अमय वाघने लिहिले,”नळ स्टॉपच्या टॉयलेटमध्ये असंच असतं…” यावर ललितने त्याला उत्तर देत लिहिले की, “अरे पण या नळामुळे माझा दमयंती झाला…” कॉमेडियन, अभिनेत्री श्रेया बुगडेने हसण्याच्या इमोजी शेअर करत, प्रेमाने ललितला ‘लाल्या’ अशी कमेंट केली आहे.

ललितच्या या पोस्टवर अभिनेत्री स्पृहा जोशी, मृण्मयी गोडबोले, अमृता खानविलकर आणि हेमंत ढोमे याने देखील कमेंट केल्याचे दिसून आले. तसच फॅन्सना पण त्याची ही पोस्ट प्रचंड विनोदी वाटली आहे. त्यांनी त्या पोस्टवर लाईक्सचा आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ललितच्या कामा बाबत बोलायचे झाले तर त्याने ‘जुळून येती रेशीमगाठी’या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने बऱ्याच चित्रपट काम केले असून त्याच्या ‘आनंदी गोपाळ’या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसंच लवकरच तो ‘शांतीत क्रांती’या नवीन वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.