कल्याण– कल्याण रेल्वे स्थानकातून एका अडीच वर्षाच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या दोन जणांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यानंतर सहा तासात अटक केली. अमित शिंदे, पुजा मुंडे अशी अटक आरोपींची नावे आहेत.

कल्याण रेल्वे स्थानकात एक मागतेकरी महिला संजू राजवंशी ही मिळालेल्या पैशातून रेल्वे स्थानकातील फलाटावरील नाष्टागृहात मुलाला वडापाव आणण्यासाठी गेली. मुलाला आपल्या बोजक्या जवळ तिने बसून ठेवले होते. वडापाव घेऊन परत आल्यावर तिला मुलगा अक्षय बोजक्या जवळ नसल्याचे दिसले. तिने फलाटावर सर्वत्र त्याचा शोध घेतला. तो आढळून आला नाही. घडला प्रकार तिने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात जाऊन सांगितला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश आंधळे, पोलीस निरीक्षक अर्चना दुसाणे, प्रमोद अधिकारी यांनी घटना घडला त्या ठिकाणचे फलाटावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. ते चित्रीकरण पाहून पोलीस चक्रावले. बोजक्या जवळ बसलेल्या मुलाला एक महिला, पुरुष जबरदस्तीने घेऊन जाताना आढळले. या मुलाचे अपहरण झाले असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने चित्रीकरणातील आरोपींची ओळख पटवून त्या दिशेने तपास सुरू केला. सहा तासाच्या अवधीत पोलिसांनी पुजा, अमित यांना तांत्रिक माहितीच्या आधारे उल्हासनगर शहरातून अटक केली. मुले पळविणाऱ्या टोळीशी या दोघांचा संबंध आहे का याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. आपण किरकोळ कामे करत असतो, अशी साचेबध्द उत्तरे आरोपी पोलिसांना देत आहेत, असे वरिष्ठ निरीक्षक आंधळे यांनी सांगितले.