पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील हडपसर-जेजुरी रस्त्याचे चौपदरीकरण सुरू आहे. या रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम खात्याने बेसुमार वृक्षतोड केल्याने रस्त्याचा सारा परिसर उजाड झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू आहे.परंतु या ठिकाणी नव्याने झाडे लावण्यात आलेली नाहीत.
संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरकडे जात आहे. पुणे हडपसरचा शहरी भाग सोडल्यानंतर खऱ्या अर्थाने निसर्गाने सुख समृद्ध असलेलेल्या पुरंदर तालुक्यातून वारी करण्याचा वेगळा अनुभव वारकरी घेत असत. परंतु आता रस्ताकडेचे वृक्ष तोडले गेल्याने सावली दिसणे मुश्किल झाले आहे.
‘‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे आळवीती..’’
हा संत तुकारामांची अभंग मानवाचे व निसर्गाचे अतूट नाते दर्शवितो. या वेळी दिवे घाट चढून आल्यावर दमलेल्या व घामाघूम झालेल्या अनेक वारकऱ्यांच्या नजरा सावली शोधत होत्या. परंतु या मार्गावरील वड, िपपळ, आंबा, िलब, चिंच असे मोठ-मोठे वृक्ष तोडल्याने सावलीसाठी वणवण करावी लागते आहे. रस्ताकडेच्या शेतातील सीताफळ, अंजीर-डािळबाच्या बागा या ठिकाणी तोकडय़ा सावलीत वारकऱ्यांना विश्रांती घ्यावी लागली. रस्ता रुंदीकरणात शेकडो जुने वृक्ष भुईसपाट झाले. परंतु, नव्याने वृक्ष लागवड मात्र झालेली दिसत नाही. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच लहानशी झाडे काही ठिकाणी रस्त्याकडेला उभी दिसत आहेत. त्याही झाडांचे संगोपन नीट झाले तरच ती जगतील. मात्र, सध्या त्यांच्या टिकण्याबाबत शंकाच आहेत. राज्य शासनातर्फे वारीमध्ये पर्यावरणाबाबत जनतेचे प्रबोधन करण्यासाठी मोठा खर्च करून यंत्रणा राबवण्यात येते. परंतु, वारीच्या वाटेवर वृक्षलागवड करण्याबाबत कोणीच गांभीर्याने विचार करीत नाहीत. याबाबत अनेक वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
रस्त्याचे काम करणारी कंपनी, संबंधित शेतकरी व सार्वजनिक बांधकाम खाते यांनी एकत्र येऊन पुन्हा झाडे लावल्यास दहा वर्षांनी का होईना पुन्हा वारकरी बांधवांना सावलीचा आधार होईल. उन्हाळ्यात पाय भाजले, ऊन खूप लागले व पावसाळ्यात आडोशासाठी हे वृक्षच उपयोगी येणार आहेत. येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी येथे वृक्षलागवड करून पर्यावरणाचा समतोल साधावा, अशी मागणी वृक्षप्रेमी संघटनांनी केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jun 2014 रोजी प्रकाशित
पालखीमार्गावरील बेसुमार वृक्षतोडीने वारकऱ्यांची हक्काची सावली हरवली
संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरकडे जात आहे. बेसुमार वृक्षतोड केल्याने सावली दिसणे मुश्किल झाले आहे. दिवे घाट चढून आल्यावर अनेक वारकऱ्यांच्या नजरा सावली शोधत होत्या.
First published on: 25-06-2014 at 03:30 IST
मराठीतील सर्व उपक्रम बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unlimited tree cutting makes palanquin way shadeless