महात्मा गांधी : महात्मा गांधींचा जन्म गुजरातमधील पोरबंदर या गावी २ ऑक्टोबर १८६९ रोजी झाला. गांधींवर जॉन रस्किन यांच्या ‘अनटू द लास्ट’ या पुस्तकाचा मोठा प्रभाव होता. रशियन विचारवंत टॉलस्टॉय यांच्या विचारांचाही त्यांच्यावर प्रभाव होता. २१ वर्षे आफ्रिकेत वास्तव्य करून वयाच्या ४५ वर्षी गांधी हिंदुस्थानात परतले.
महात्मा गांधींचे कार्य :
चंपारण्य सत्याग्रह (१९१७) : बिहारमधील चंपारण्य येथील निळीच्या युरोपीय मळेवाल्याकडून तीन काठिया पद्धतीमार्फत गरीब शेतकऱ्यांवर अत्याचार होत असे. एप्रिल १९१७ मध्ये गांधीजींना राजकुमार शुक्ल नावाच्या स्थानिक नेत्याने शेतकऱ्यांची परिस्थिती बघण्यासाठी आमंत्रित केले. या सत्याग्रहामुळे शासनाने चंपारण्यातील अन्याय दूर करणारा कायदा १९१८ मध्ये संमत केला आणि तीन काठिया पद्धत रद्द करण्यात आली.
खेडा सत्याग्रह (१९१८) : १९१८ मध्ये गुजरातमधील खेडा जिल्ह्यमध्ये दुष्काळ पडला होता. दुष्काळामुळे पिके बुडाली असताना शासकीय अधिकारी शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करत असत. मोहनलाल पांडे नावाच्या नेत्याने गांधीजींना आमंत्रित केले. गांधीजींनी साराबंदी चळवळ सुरू केली. शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळी कालावधीत जमीन महसूल वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. खेडा येथील सत्याग्रहामध्ये गांधींजींना सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, विठ्ठलभाई पटेल इत्यादींचे सहकार्य लाभले.
रौलेट अॅक्ट (१९१९) : भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरता ब्रिटिश शासनाला नवीन कायद्याची आवश्यकता भासत होती. या कायद्याचा अहवाल तयार करण्याकरता एक समिती नेमण्यात आली. या समितीने तयार केलेला अहवाल एप्रिल १९१८ मध्ये संमत करण्यात आला. या कायद्यातील तरतुदींनुसार कोणत्याही व्यक्तीला विनाचौकशी अटक करण्याचा अधिकार शासनास मिळणार होता. यान्वये अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची तीन न्यायाधीशांच्या चौकशी मंडळापुढे चौकशी करून शिक्षा करण्याचा अधिकार शासनास मिळाला.
गांधीजींनी १९१९ मध्ये रौलेट कायद्याच्या निषेर्धात सभा घेतली. गांधीजींच्या अनुयायांनी ठिकठिकाणी सभा घेतली. ६ एप्रिल १९१९ हा संपूर्ण भारतभर ‘सत्याग्रहाचा दिवस’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिवशी हरताळ, उपोषण, निषेध मिरवणुकी आणि निषेध सभा असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. ६ एप्रिल १९१९ रोजी सत्याग्रहाला मोठा प्रतिसाद मिळून तो यशस्वीरीत्या पार पडला.
जालियनवाला बाग हत्याकांड (१९१९) : सरकारने स्थानिक नेते डॉ. सफुद्दीन किचलू व सत्यपाल या दोन नेत्यांना अटक केल्यामुळे पंजाबमधील अमृतसर शहरात एक निषेधार्ह सभा बोलाविण्यात आली. लोक संतापलेले होते. लोकांमधील असंतोष लक्षात घेऊन सरकारने जमावबंदी व सभाबंदी आदेश लागू केला; परंतु सरकारी आदेशाला न जुमानता स्थानिक लोकांनी १३ एप्रिल १९१९ रोजी जालियनवाला बागेत निषेध सभा बोलावली. या सभेला मोठय़ा संख्येने लोक जमले. सरकारच्या आदेशाविरुद्ध इतके सारे लोक एकत्र आल्याचे बघून तिथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेला जनरल डायर हा इंग्रज अधिकारी संतप्त झाला. त्याने नि:शस्त्र लोकांना चहूबाजूंनी घेरले आणि जमावाला कोणतीही पूर्वसूचना न देता गोळीबार करण्याचा आदेश आपल्या सनिकांना दिला. जालियनवाला बाग हत्याकांडावेळी पंजाबचा गव्र्हनर मायकेल ओडवायर होता. या हत्याकांडाच्या चौकशीसाठी सरकारने हंटर कमिटी १ ऑक्टो. १९१९ रोजी नेमली. या घटनेच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोरांनी- सर व गांधीजींनी- कैसर-ए-हिंद या पदव्यांचा त्याग केला.
संग्रहित लेख, दिनांक 18th Mar 2016 रोजी प्रकाशित
यूपीएससी : (१९२० ते १९४७)- कालखंड गांधी युग
महात्मा गांधींचा जन्म गुजरातमधील पोरबंदर या गावी २ ऑक्टोबर १८६९ रोजी झाला.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 18-03-2016 at 08:07 IST
मराठीतील सर्व स्पर्धा परीक्षा गुरू बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahatma gandhi upsc exam