News Flash

मैत्री – श्वासापलीकडची

हा प्रसंग आहे १९८८ मधला..कॉलेजची परीक्षा जवळ आल्याने मला अभ्यासाकरिता सुट्टी होती.

हा प्रसंग आहे १९८८ मधला..कॉलेजची परीक्षा जवळ आल्याने मला अभ्यासाकरिता सुट्टी होती. दुपारच्या जेवणानंतरची आवराआवर सुरू होती. मी आजीला (आईची आई) मदत करत होते. तेवढय़ात एका बाईंचा आवाज कानावर आला. “विभा आहे का?”  काळजात एकदम चर्र झाले. बाहेर जाऊन बघितले तर तीन मध्यम वयाच्या स्त्रिया दारात उभ्या होत्या. मला अनोळखीच होत्या. पण त्यांच्या प्रश्नातील विभा माझ्या ओळखीची होती. माझी आई विभा. पण तिला जाऊन दोन वर्षे होत आली. मग आता यांचे काय काम असेल?

मी त्यांना आत घेऊन आले. पाणी दिले. आणि मी विभाची मुलगी आहे हेही सांगितले. त्यांनी मला त्यांची ओळख करून दिली. त्या आईच्या मैत्रिणी होत्या. कॉलेजमधल्या. त्यांना आईच्या जाण्याबद्दल माहिती नसावे.

एवढय़ात आजी बाहेर आली. आणि तिच्याने राहवले नाही. आईविषयी कोणीतरी बोलतेय म्हटल्यावर तिचा बांध फुटला आणि मग मलाही अश्रू आवरता नाही आले. आईला जाऊन दोन वर्षे लोटली तरी आमच्या मनाच्या जखमा अजून ताज्याच होत्या. त्या तिघी प्रथम गोंधळल्या. मग काय समजयाचे ते समजल्या. आणि त्यांनापण भरून आले. अचानक बसलेला हा धक्का त्यांनी कसाबसा पचवला. आजीला समजून घेतले. माझे सांत्वन केले आणि आईच्या बऱ्याच आठवणी सांगितल्या.

आजीने त्यांच्या येण्याचे प्रयोजन विचारले आणि ते ऐकून मी खूप हळहळले.

या चार-पाच मैत्रिणी अगदी जिवाभावाच्या. एकत्र कॉलेजमध्ये होत्या. एकाच खोलीत राहून अभ्यास केला होता. एकमेकींची सुखदु:खं वाटून घेतली होती. एकमेकींना आधार देत भविष्याची स्वप्ने रंगवली होती. नंतर सर्वाची लग्ने झाली आणि सासरी त्या संसारात रमल्या.

कोणी पुणे, कोणी सातारा, कोणी मुंबई तर कोणी सांगली-कोल्हापूर अशा ठिकाणी विखुरल्या गेल्या. त्या वेळी फोनची सुविधा घराघरात नसल्याने त्यांचा संवाद खुंटला. पण मैत्री संपली नव्हती.

लग्नाला २५-३० वर्षे झाली. सगळ्यांची मुलेबाळे आता मोठी – करतीसवरती झाली असतील. संसारातल्या जबाबदाऱ्या कमी झाल्या असतील असा विचार करून पुण्यातील मैत्रिणीने इतर मैत्रिणींचे पत्ते आणि फोन वगैरे शोधायला सुरुवात केली. पुण्यातील मैत्रिणी एकमेकींना भेटल्या आणि सातारा येथे गेल्या. आणि मग तिघी मिळून आता विभाला भेटायचे असा बेत करून आल्या होत्या. विभाला घेऊन त्या चार-पाच जणी मस्त फिरणार होत्या. आपल्या जुन्या आठवणी परत एकदा ताज्या करणार होत्या. मिरजला जाऊन कॉलेज परिसराला भेट देणार होत्या. खूप धमाल करायची होती. पण..पण विभाने चकवले.

त्या तिघीही नोकरदार होत्या. प्रसंग पाहून स्वत:ला सावरले आणि आमची परिस्थिती समजावून घेतली. माझी आणि भावांची चौकशी करून खूप धीर दिला. वडील आल्यावर त्यांच्याशी बोलून त्या परत निघाल्या.

पण हे सगळे इथेच थांबले नाही. अधूनमधून फोन करून त्या आमच्याशी संपर्कात होत्याच. पुढे चार-पाच वर्षांनी आम्ही सगळेच पुण्याला नोकरीसाठी स्थायिक झालो आणि त्या आईच्या मैत्रिणी आता आमच्या अगदी जवळच्या मावश्या झाल्या. प्रत्येक समारंभाला येऊ लागल्या आणि आम्हीपण त्यांच्याकडे जाऊ  लागलो. काही अडचणी आल्या तर आपुलकीने मार्गदर्शन करायच्या.

आज विचार केला तर असे वाटते की मैत्रीचे हे धागे त्यांना मैत्रीण गेल्यावर सहज तोडता आले असते, पण तसे न करता त्यांनी तेच मैत्रीचे धागे मैत्रिणीच्या मुलांसाठी परत घट्ट विणले आणि त्या मैत्रीला अक्षरश: जागल्या.

त्या सर्व मैत्रिणींना माझा सलाम..

प्रज्ञा रामतीर्थकर response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2016 3:15 am

Web Title: article by lokprabha reader
Next Stories
1 अध्र्या तासात लग्न!
2 इडियट बॉक्सचा येडपटपणा
3 मुलांचे भावविश्व!
Just Now!
X