‘हेच का सक्षमीकरण’ हा ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेला मनीषा लाखे यांचा लेख वाचला. ‘पिंक’, ‘पाच्र्ड’, ‘सैराट’ या चित्रपटांवर अतिशय वेगळ्या दृष्टिकोनातून छान समीक्षा केली आहे. चित्रपटात जे दाखविले आहे त्यास स्त्री सक्षमीकरण म्हणावे का, असा त्यांचा सवाल आहे. ‘पिंक’ हा चित्रपट मल्टिप्लेक्समधे बसणाऱ्या ठरावीक वर्गासाठी आहे असे मत मांडले आहे. पण प्रत्येक सिनेमाचा प्रेक्षकवर्ग वेगळा असतो हे लक्षात घ्यायला हवे. हा सिनेमा पाहून ‘हाय सोसायटी’ लोकांना जरी आपला दृष्टिकोन बदलावासा वाटला तरीसुद्धा सिनेमाचा हेतू साध्य झाला असे म्हणता येईल. कारण ‘नो मिन्स नो’ हे वाक्य कोणत्या परिप्रेक्ष्यातून बोलले गेले आहे हे गावातल्या माणसांना खरेच कळणार नाही.

आजपर्यंत स्त्री सक्षमीकरणाच्या नावाखाली चावून चोथा झालेल्या पण अजून ‘पूर्णपणे’ कृतीत न उतरणाऱ्या स्त्रियांच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक हक्कांबद्दल आपण बोलतो. ‘पिंक’ आणि ‘पाच्र्ड’मध्ये स्त्रीच्या लैंगिक हक्कांचा मुद्दा समोर आला आहे. ‘पाच्र्ड’मध्ये अजूनच स्पष्टपणे हे अधोरेखित झाले आहे. खरं तर स्त्रियांचे लैंगिक हक्क अशी संकल्पनाच आम्हाला सवयीची नसताना अशा विषयावर भाष्य करणारे चित्रपट आले आणि आमच्या समाजरूपी मेंदूला ते झेपले नाही.

‘पिंक’मध्ये कपडय़ांवरून आणि घडय़ाळ्याच्या काटय़ावरून स्त्रीचे चारित्र्य ठरविण्याच्या मानसिकतेचा समाचार घेतला आहे. स्त्री असूनही महिला इन्स्पेक्टरने मुलींना मदत केली नाही. आता ‘अमिताभ’च्या जागी एखादी नायिका असती तर स्त्रियाच सक्षमीकरणाचा टेंभा मिरवतात. पुरुषांना कधी कळणार, अशी टीका झालीच असती. हा चित्रपटातील लेडी इन्स्पेक्टरला पाहून स्त्रियांनीच स्त्रियांचे शत्रू बनू नये, असा संदेश तथाकथित समाजाने घेतला तरी खूप झाले.

‘पाच्र्ड’मध्ये त्या तीन नायिकांचे पळून जाणे हे ‘प्रतीकात्मक’ आहे. पण म्हणून, पळून जाणे म्हणजे सक्षमीकरण आहे हा संदेश हे चित्रपट देतात असं मुळीच नाही. ‘पिंक’ असो किंवा ‘पाच्र्ड’ असो, हे चित्रपट पाहून आपल्याला नको असणाऱ्या लैंगिक संबंधांना ‘नाही’ म्हणायला जरी स्त्री शिकली तरीही ते सक्षमीकरणच असेल.

– शर्मिला शेंडे, पुणे</strong>

पाच्र्ड एक अस्वस्थ अनुभव

हा सिनेमा राजस्थानच्या एका अगदी छोटय़ा खेडेगावात राहणाऱ्या या तीन मैत्रिणी व त्यांच्या दररोजच्या जीवनात घडणारे प्रसंग, जगण्यासाठीचा लढा, गावातील पंचायतने दिलेले पुरुषी वर्चस्व प्रस्थापित करणारे निकाल बघताना अंगावर काटा उभा राहतो. शहरातील आमच्यासारख्या सुशिक्षित स्त्रियांना हे वास्तव होरपळून काढते. स्त्रियांना भोगवस्तू, मुलं जन्माला घालणारे यंत्र व वेळी-अवेळी मनाला येईल तेव्हा त्यांच्यावर अत्याचार करण्याचा जन्मसिद्ध हक्क समजणारे घरातील पुरुष पाहून स्त्री असण्याची लाज वाटते. या सगळ्या गावातील स्त्रिया हे अत्याचार कसे सहन करीत असतील याची जाणीव अस्वस्थ करते. पौगंडावस्थेत असलेल्या मुलांच्या हातात मिळालेले मोबाइलचे खेळणे व नको त्या कामवासना चेतवणाऱ्या साईट व ‘ते’ अनुभव घेण्याची ओढ, भारतात बलात्कार वाढण्याचे निर्देशक कसे आहे ते हा सिनेमा दाखवून देतो. हा सिनेमा प्रत्येक प्रसंगातून आपल्या देशातील अशिक्षित, सामाजिक मागासलेपण जिवंतपणे उभे करतो. स्त्रियांच्या दबलेल्या प्रेमाच्या भावना, स्वातंत्र्याची ओढ या तिन्ही पात्र रंगवलेल्या नटय़ांनी आपल्या जिवंत अभिनयाने उभ्या केल्या आहेत. आता खरी गरज आहे ती पुरुषांनी अशा अत्याचार करणाऱ्या पुरुषांविरोधात आवाज उठवण्याची. तरच आपण हे भयंकर वास्तव व असा समाज बदलू शकू.

– शीला राऊत, पुणे

 

विचार करायला लावणारी कथा 

‘तुला म्हैतीये’ या मंगला गोडबोले यांनी लिहिलेल्या कथेतील आजी आणि नातवंड  हय़ा नात्यातील गोडवा अवर्णनीय आहे.

बोबडय़ा बोलांचेच तर किती कौतुक असते! आता तर ही पिढी अथांग ज्ञानाच्या सागरात लीलया पोहतेय. स्पर्धा आणि रोज स्वत:ला सिद्ध करणे या धावपळीत. सामान्य जीवन जगणे विसरले

जाते. वरवर समृद्ध दिसणाऱ्या पिढीची होरपळ दिसूनही जुनी पिढी फक्त प्रेक्षक होते. खूप ज्ञान नसले तरी अनुभव आणि माया ही पिढी देऊ

शकते पण या गोष्टींना खरंच मोल असेल का? कथा वरवर विनोदी वाटली तरी खूप विचार करावयास लावते.

–  शोभा राजे, नागपूर</strong>

तणावमुक्त जीवन जगू या

मृणालिनी ओक यांनी १५ ऑक्टोबरला लिहिलेल्या त्यांना ‘ऐकायला’ हवं या लेखात उत्तम आणि विचार करायला प्रवृत्त करणारी माहिती सादर केली. मनाचा समतोल ढासळल्यामुळे घडलेले अनेक अपघात आपण वारंवार बघतो.

वैयक्तिक आयुष्यात अशा एकटेपणामुळे बऱ्याच लोकांना मानसिक व्याधी जडतात आणि त्यामुळे बरीच माणसं आपलं आयुष्य गमावून बसतात. अशा वेळी घरातील व्यक्तींनी सावरून अशा व्यक्तींना मानसिक आधार द्यायला हवा. कारण या अवस्थेत मानसिक आधार हाच एक उपचार असतो.

अंतर्मुख व्यक्ती आपलं दु:ख कुणासमोरही व्यक्त करत नाही. मनातल्या मनात अशा दु:खांचा डोंगर उभा करून ते अस्वस्थ होतात व त्यांची वाटचाल ही मनोरुग्णाकडे सुरू होते. बरेच अपघात हे लज्जा-संकोच आघात सहन न करण्याची शक्ती यामुळे होतात. प्रत्येक माणसाची मानसिक अवस्था ही प्रामुख्याने भिन्न असते. त्यांच्या विचारांची ठेवण त्याची जडणघडण, सामाजिक परिस्थिती यावर अवलंबून असते.

तसं पाहिलं तर प्रत्येक माणूस हा काही अंशी मनोरुग्ण असतो. आधुनिक काळातील वाढते ताणतणाव जीवघेण्या समस्या, उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ न बसणं, वाढलेल्या गरजा त्यामुळे होणारी ओढाताण यामुळे मानवी जीवन अस्थिर झालं आहे. ते टाळायचे असेल तर आपणच आपल्या आयुष्याकडे तटस्थपणे बघून  तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगू या!

– संदीप वरकड, खिर्डी, ता खुलताबाद

अन्यथा स्त्री आरोग्य धोक्यात

५ नोव्हेंबरच्या चतुरंगमध्ये प्रियदर्शिनी हिंगे यांचा ‘माझं शरीर माझा हक्क’ हा लेख वाचला. लेख अतिशय चांगला लिहिला आहे. या निमित्ताने आपल्या देशातील मुली व स्त्रिया यांच्याविषयीचे अनेक मुद्दे समजून घेता आले आहेत. लहान वयापासून मुलींना त्यांच्या शरीराविषयी जागरूक केले पाहिजे. वयात येताना त्यांना, शरीरातील बदलांची शास्त्रीय माहिती दिली पाहिजे. आपल्या शरीराला, आपली परवानगी नसेल तर कोणतीही व्यक्ती हात लावू शकत नाही, असे काही घडत असेल तर त्याविषयी घाबरून गप्प न बसता त्याला विरोध केला पाहिजे. त्याविषयी इतरांशी बोलले पाहिजे.

तरुण वयात, लग्नानंतर, मुले कधी हवीत, किती हवीत याचा निर्णय तिला घेता आला पाहिजे. मूल नको असेल तर काय प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत हे तिला माहीत पाहिजे. त्याच्या निवडीचे तिला स्वातंत्र्य पाहिजे. दुर्दैवानं आजही आपल्या समाजात, लग्न कधी करायचे, कोणाशी करायचे याचा निर्णय मुलींना घेऊ  दिला जात नाही. लग्नानंतर कुटुंबाविषयीचे सर्व निर्णय नवरा किंवा सासरची मंडळी घेतात. आपल्याकडे शिकलेल्या मुलीही याबाबतीत जागरूक नाहीत.

देशातील पीसीपीएनडीटी व एमटीपी या दोन कायद्यांची गल्लत करीत, स्त्रीचे आरोग्य धोक्यात येत आहे. स्त्रीचा गर्भपात करण्याचा हक्कअबाधित ठेवत असतानाच गर्भलिंग निदान न होऊ  देणे, स्त्री गर्भाचा गर्भपात न होऊ  देणे, हे फार आवश्यक आहे अन्यथा आपण असुरक्षित गर्भपाताच्या दिशेने परत एकदा वाटचाल करू व स्त्री आरोग्य धोक्यात घालू असे वाटते.

– डॉ. रश्मी बोरीकर, औरंगाबाद</strong>