News Flash

पुरोगामी महाराष्ट्रासाठी हे वास्तव लज्जास्पदच..

सुहास सरदेशमुख लिखित ‘शिक्षणाचा तमाशा’ हा ५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेला लेख वाचला.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

सुहास सरदेशमुख लिखित ‘शिक्षणाचा तमाशा’ हा ५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेला लेख वाचला. ‘पितं बाळ आपल्या आईबापाजवळ सोडून, त्यांच्या संसाराला ठिगळ लावण्यासाठी ती गावोगाव नाचायला जाते. ती आपल्या मुलाला बरोबर नेत नाही, त्या नाचणारीणमधील आईचं हृदय मेलेलं असतं का? की समाजानं मारून टाकलेलं असतं? या समाजात कित्येक अशा मुलांना हलाखीचं जीवन जगावं लागतं.’ या हृदय पिळवटून टाकणाऱ्या शब्दांची आठवण करून देणाराच असा हा लेख आहे, किंबहुना किशोर काळे या एका तमाशात नाचणाऱ्या आईच्या मुलाने या शब्दांतून मांडलेली आपली व्यथा ही आजही कशा प्रकारे कायमच आहे आणि किशोर काळे यांच्याप्रमाणे परिस्थितीशी झुंज न देऊ  शकणाऱ्या मुलांचे भविष्य कशा प्रकारे टांगले गेले आहे हेच या लेखामधून वाचावयास मिळाले.

४ ऑगस्ट २००९ ला राज्यघटनेतील ‘कलम २१ अ’ नुसार अमलात आलेला सर्व शिक्षा अभियानाचा कायदा हा तमाशा व्यवसायातील स्त्रियांच्या मुलांसाठी नव्हता का? असाच प्रश्न पडावा असे विदारक चित्र या लेखाच्या माध्यमातून समोर आले. आरटीईचा कायदा तर झाला, परंतु प्रभावी अंमलबजावणी करणार कोण? म्हणूनच आज समाजातील या दुर्लक्षित घटकांसमोर जगण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. या मुलांना शिक्षणाशी जोडणार तरी कोण? आर्थिक काटकसरीच्या नावाखाली शाळा बंद करणे, शिक्षक भरतीवर बंधने आणणे व अशा भटक्यांसाठी कुणी आवाजच उठवत नाही म्हणून त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करणे अशा प्रकारचा शिक्षणाबाबतचा सरकारचा नकारात्मक दृष्टिकोन कुठे तरी या विद्यार्थ्यांच्या या अवस्थेला जबाबदार आहे. ही परिस्थिती आता तरी बदलायलाच हवी. सरकारसोबतच एनजीओनीसुद्धा अशा भटक्यांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी पुढाकार घ्यावा. फक्त तमाशा कामगारच नाही तर मजूर व इतर तत्सम भटके व्यवसाय करणाऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी. शाळाबाह्य़ मुलांचा शोध हा उपक्रम तात्पुरता असू नये, कायमस्वरूपी असावा. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, धोंडो केशव कर्वे अशा असंख्य व्यक्तींनी महाराष्ट्रात शिक्षणप्रसाराचे जे कार्य सरकारच्या मदतीशिवाय केले ते आज आपण कुठे तरी विसरतो आहोत. पुरोगामी महाराष्ट्रासाठी हे वास्तव अगदी लज्जास्पद आहे आणि याची दखल ही सरकारने किंबहुना समाजातील प्रत्येक जबाबदार घटकाने घ्यायलाच हवी!

अश्विनी लेंभे, औरंगाबाद

 

..तरच नात्यातलं सामंजस्य टिकून राहील

‘नवरा : स्वामी की साथीदार’ तसेच ‘नात्यातलं सामंजस्य’ हे १९ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेले डॉ. नीलम गोऱ्हे आणि डॉ. सविता पानट यांचे दोनही लेख वाचले. आजही आपण स्वत:ला कितीही सुसंस्कृत, आधुनिक समजत असलो, तरी आपला स्त्रीविषयी सामाजिक, वैवाहिक आणि कौटुंबिक या तीनही परिघांमध्ये बघण्याचा दृष्टिकोन हा एक ‘भोगवस्तू’ या मानसिकतेपलीकडे गेलेला नाही. ‘विवाहांतर्गत बलात्कार’ याविषयी सर्वोच्च न्यायालय, ‘१५ वर्षांवरील पत्नीच्या मर्जीविरोधात पतीने शारीरिक संबंध ठेवणे, हा बलात्कार म्हणता येणार नाही,’ असे भाष्य करते. न्यायालयाच्या या भाष्यामुळे आपल्या स्त्रीविषयी ‘भोगवस्तू’ या दृष्टिकोनाला बळच मिळणार आहे. पतीला हवे तेव्हा, स्त्रीची मर्जी असो किंवा नसो, तिने पतीच्या शरीरसुखासाठी ‘सादर’ असावे, असा याचा अर्थ होतो. प्रसारमाध्यमांतूनही स्त्रीविषयी फिरणारे विविध बीभत्स विनोद आपला स्त्रियांविषयी असलेला दृष्टिकोन हा ‘रानटी’ स्वरूपाचा आहे, हेच अधोरेखित करतात.

पुरुषप्रधान समाजात, वैवाहिक जीवनात शरीरसंबंधासाठी पुरुषांकडून स्त्रीची मर्जी ही ‘गृहीत’च धरली जाते. त्यातही शरीरसंबंध  म्हणजेच ‘प्रजनन’ अशी काहीशी विचित्र धारणा असल्यामुळे शरीरसंबंधित खऱ्या सुखाचा शोध स्त्रियांसाठी अजून सुरूच आहे. यासंबंधात प्रख्यात हॉलीवूड अभिनेत्री इसा गाबर म्हणते, ‘सेक्सविषयी मला काहीही माहीत नाही, कारण मी विवाहित आहे.’

शरीरसंबंधासाठी स्त्रीची मर्जी, संमती आणि शारीरिक अवस्था महत्त्वाची आहेच. स्त्रीने शरीरसंबंधासाठी ‘नकार’ दिला तर पुरुषानेही तो ‘नकार’ नम्रपणे, संयम दाखवून स्वीकारावा. पुरुषांनी स्त्रीचे ‘एक माणूस’ म्हणून असलेले महत्त्व आणि अस्तित्व मान्य करावे तरच नात्यातले सामंजस्य टिकून राहील आणि अशा दृढ, समंजस आणि एकमेकांप्रति समर्पित नात्यात कायद्याचे कोणतेही कलम, भाष्य आडवे येणार नाही.

बाळकृष्ण शिंदे, बिबवेवाडी, पुणे

 

स्पेस देणं महत्त्वाचं

२६ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेला अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी यांच्या जीवनावरील ‘प्रगल्भता नात्याची’ हा निमा पाटील यांचा लेख अतिशय आवडला. समाजामध्ये अशी एक संस्कृती आहे की, लग्न झाल्यानंतर स्त्रीने आपल्या आवडीनिवडी, छंद, व्यवसाय हा त्या घरातील परंपरेनुसार, घराला गरज असेल तरच करायचा. छंद आणि आवडीनिवडी तर जपणं दूरच राहतं; परंतु व्यवसायातही जेवढी गरज आहे तेवढंच करणं, स्त्रीला वेगळा अवकाश देणं राहूनच जातं किंवा जाणूनबुजून दिलीही जात नाही. विशेषत: संसारात स्त्रीलाच आपल्या भावनांना मुरड घालावी लागते आणि तरच संसाराचा ताळमेळ बसतो.

संदेश कुलकर्णीने अमृताला दिलेली ‘स्पेस’ खूप मोठी आहे. संदेशवर त्याच्या आईने केलेले संस्कार खूप महत्त्वाचे आहेत. म्हणूनच आज आपणास अमृता सुभाषसारख्या अभिनेत्रीचे कौशल्य पाहायला मिळते. एक कलाकार म्हणून संदेशने अमृताला दिलेले प्रोत्साहन खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच आज ती स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू शकली.

अशा पद्धतीचे लेख वाचून पुरुषही आपल्या सहचारिणीला, बहिणीला, मुलीला योग्य पद्धतीने ‘स्पेस’ देतील, अशी आशा.

प्रा. डॉ. विजया कदम, सातारा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 1:42 am

Web Title: loksatta reader response 8
Next Stories
1 सैनिकच उद्विग्न होत असेल
2 ..तर ‘ती’ची साथ कशी मिळेल?
3 राजाबाई टॉवरची जन्मकथा
Just Now!
X