लेखिका मेघना जोशी यांचा ७ जुलै रोजी प्रसिद्ध झालेला ‘आणि मन जाग्यावर येतं..’ हा अनुभवपर लेख वाचला आणि वाचून खूप आनंद झाली. कारण ज्याप्रमाणे त्यांच्या आयुष्यातील आनंदाची, आपुलकीची घटना आठवल्यावर मन जाग्यावर येतं, अगदी तसंच काहीसं माझ्याही बाबतीत आहे आणि अनेकांच्याही बाबतीत असावं यात काही दुमत नाही. जीवन जगत असताना अनेक संकटे, दु:ख, वाईट प्रसंग येतात. पण भूतकाळातील आनंदाच्या गोष्टी, घटना आठवल्यावर माझंही मन जाग्यावर येतं. महाविद्यालयीन जीवनात मिळवलेले प्रावीण्य, कला सादर करण्यासाठी मिळालेले व्यासपीठ आणि अनेक ज्येष्ठ, प्रसिद्ध व्यक्तींच्या हस्ते झालेले सत्कार, थोरा-मोठय़ांचा लाभलेला सहवास आणि त्यांनी दिलेली शाबासकीची थाप, या सर्व सुखद गोष्टी, दु:ख, अपयश आणि नैराश्य आल्यावर आठवल्या की आपोआप दु:ख विसरता येतं आणि पुन्हा मनाला आनंदाची उभारी येते आणि मन जाग्यावर येतं..
-आकाश सानप, सायखेडा (नाशिक)

 

गरज पर्यायांच्या स्वागताची

डॉ. रोहिणी पटवर्धन यांचा ७ जुलै रोजी प्रसिद्ध झालेला ‘वृद्ध निवासाचे पर्याय’ हा लेख वाचला. त्यांनी दिलेले वृद्ध निवासाचे पर्याय खूप छान आहेत. हे पर्याय प्रत्यक्षात येण्यासाठी ज्येष्ठ व ज्येष्ठतेकडे झुकणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या मानसिकतेत बदल करणे आवश्यक असून काही पर्याय प्रत्यक्षात येण्यासाठी शासनाकडून अल्प किमतीत राखीव निवासी जागा ठेवण्यासाठी संबंधितांना सूचित करण्याची गरज आहे. बदलत्या परिस्थितीसाठीचे हे पर्याय प्रत्यक्षात आले तर समाजात सध्या आढळणाऱ्या वृद्धांच्या समस्यांत घट होईल हे निश्चित. त्यासाठी गरज आहे ती समाजातील वृद्ध मंडळींनी व अन्य मान्यवर विचारवंतांनी रोहिणीताईंनी मांडलेल्या पर्यायांचे स्वागत करण्याची व त्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करण्याची.
-अरुणा न. गोलटकर, प्रभादेवी

‘आनंद-आश्रम’ बांधावा

‘संहिता साठोत्तरी’मधील डॉ. रोहिणी पटवर्धन यांचे लेख फारच सुंदर असतात. या लेखमालेतील ७ जुलैचा ‘वृद्ध निवासाचे पर्याय’ हा लेख अतिशय चांगले पर्याय देणारा आहे. विशेषत: टाऊनशिपमधील राखीव जागेचा पर्याय तर सर्वोत्तमच. टाऊनशिप/बिल्डिंग बांधताना अशी राखीव जागा ठेवण्याचे नियम करावे. जेणेकरून वृद्धांची चांगली काळजी घेतली जाईल. उदाहरणार्थ १०० फ्लॅटची इमारत असल्यास १५० वृद्धांची सोय होईल, अशी राहण्याची जागा/हॉल अर्थात आनंद-आश्रम बांधावा. जशी क्लब-हाऊसची सोय असते तशीच ही ‘आनंद-आश्रमा’ची सोय आणि त्याचा खर्च अर्थातच इतर सुविधांप्रमाणे सर्व फ्लॅट्स वर सारखा विभागला जावा. त्यात वृद्धांना राहण्या-जेवण्याची सोय करावी. ही ‘आनंद-आश्रमा’ची सोय अर्थात सर्व फ्लॅट-धारकांना नि:शुल्क असेल. याप्रमाणे सरकारने लवकरात लवकर नियम करावेत. डॉ. रोहिणी पटवर्धन यांचे ‘संहिता साठोत्तरी’ या लेखमालेतील लेखांबद्दल मन:पूर्वक अभिनंदन.
-उदय जांभेकर, ठाणे</strong>

वृद्धांसाठी उत्तम पर्याय

‘चतुरंग’ पुरवणीतले सर्वच लेख आवडले, छानच आहेत. प्रतिमा कुलकर्णी, वंदना गुप्ते यांचे लेख तसेच चित्रा वैद्यांची ‘इवलीशी सहल’ आणि माधवी कुंटे यांचं ‘जगणं नव्हे विरघळणं’. आपल्या अपंग मुलांसाठी त्या घेत असलेल्या कष्टाला सलाम. डॉ. रोहिणी पटवर्धन यांनी ‘संहिता साठोत्तरी’मधे एक अतिशय उत्तम व सध्याच्या काळात गरजेचा, एक विचार मांडलाय, हल्ली मोठय़ा सोसायटय़ा/टाऊनशिप होताहेत, तिथे फक्त वृद्धांसाठीच तळमजल्यावर खोल्यांची व्यवस्था करणे, बिल्डरला सक्तीचे करणे.. ना. धो. महानोर, तर सर्वाचेच आवडते लेखक, कवी त्यांचा लेखही उत्तम, वाचनीय.
-माधव गोडबोले, सांगली</strong>

या पर्यायाचाही विचार व्हावा

रोहिणी पटवर्धन यांचा ‘वृद्ध निवासाचे पर्याय’ लेख वाचला. डॉ. रोहिणी पटवर्धन यांचे लेख मी आवर्जून वाचतोच. काही गोष्टी स्पष्ट व सकारात्मक मांडलेल्या असतात. वरील लेखांत ‘गृहसंकुल’ विभागांत अजून फारसे लोकांना माहीत नसलेले परंतु सर्व सोयींनीयुक्त असे कामशेत येथे हे गृहसंकुल आहे. मी (५९) व माझी पत्नी (५४) पुण्यातील औंध भागातील घर विकून या ठिकाणी कायमसाठी येथे स्वत:चे घर विकत घेऊन राहात आहोत. या ३-४ महिन्यांतच आम्हाला भरपूर मित्र, मैत्रिणी मिळाल्या. वेळ कसा जातो कळत नाही. गृहसंकुलाचं ठिकाण प्रसन्न असल्याने खूपच उत्साह वाटतो. ज्येष्ठांनी मजेत आयुष्य घालवण्यासाठी अशा पर्यायाचा विचार अवश्य करावा. त्यासाठीच हा पत्र प्रपंच!
-अविनाश देशपांडे, कामशेत, पुणे</strong>

तर त्यांना सुरक्षित वाटेल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘वृद्ध निवासाचे पर्याय’ हा रोहिणी पटवर्धन यांचा लेख वाचला. त्यांनी या लेखात सुचवलेले पर्याय मला पूर्णत: पटले. वृद्धांसाठी लहान लहान घरे, मोठय़ा गृहसंकुलात एक इमारत वृद्धांसाठी अशा सूचना पटण्यासारख्याच आहे. ज्या वृद्धांना वृद्धाश्रमांमध्ये राहण्याऐवजी त्यांच्या मुलांजवळ राहायचे असेल त्यांच्यासाठी काही पर्याय आहेत. एका गृहसंकुलात एक इमारत वृद्धांसाठी ठेवून त्यांना जेवणाचा डबा, वैद्यकीय सोयी-सुविधा, घरकामासाठी सेवावर्ग आदी सोयी दिल्या तर त्यांचे जीवन सुसह्य़ होईल. त्यांना एकटे न वाटता सुरक्षित वाटेल.
-अचला चिखलीकर