‘नियोजनाचाच दुष्काळ’ (६ मे) हा मथितार्थ सरकारी दुष्काळी उपाययोजनांवर चांगल्या प्रकारे प्रकाशझोत टाकणारा होता. विदर्भातील कोरडा आणि कोकणातील ओला दुष्काळ हा महाराष्ट्राला दरवर्षी भेडसावणारा गंभीर प्रश्न आहे.  मराठवाडय़ात  आठ जिल्ह्यंत भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या पशुधनाचा प्रश्नही ऐरणीवर आहे.

राज्य सरकारचा बौद्धिक दुष्काळ मात्र महाराष्ट्राच्या जनतेला अनुभवायला मिळाला. मंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यातून नेमके काय फलित होते हा संशोधनाचा विषय ठरेल. दुष्काळी भागाची पाहणी आणि कर्जमाफी असे दोन मुद्दे विरोधकांना दाखवणे ही नित्याची बाब झाली आहे. पण दुष्काळाशी सामना करण्याची किंवा त्यावर ठोस उपाययोजना राबविण्याची जबाबदारी मात्र फारशी घेतली जात नाही. महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात आणि राजस्थान या दोन  राज्यांतील काही भागांत अत्यल्प पाऊस पडतो. पण तेथील सरकारने त्यासाठी चांगल्या उपाययोजना राबविल्या. शेती आणि पाण्याचे व्यवस्थित नियोजन केले. पाण्याचे नैसर्गिक स्रोत व्यवस्थित संरक्षित केले. जलसाक्षरता पटवून देण्यासाठी स्थानिक लोकांची मदत घेतली. पावसाच्या पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यात येते. तसेच धरण, कालव्यातील पाणी यांचे बाष्पीभवन होणार नाही याची योग्य ती काळजी घेतली जाते. काही ठिकाणी पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून तलाव, नदी, ओढय़ातील मासेमारीवरही बंदी आणली आहे. तसेच शेतकऱ्यांनाही कमी  पाण्यावर जास्त उत्पादन होणाऱ्या पिकांसाठी प्रोत्साहन दिले जाते. तशीच महाराष्ट्रातील काही भागांत आजही दुष्काळी परस्थितीशी सामना करणारी आदर्श गावे आहेत. पण त्यांचे कौतुक करण्यापलीकडे आपण काहीच करत नाही. अशा गावांचा आदर्श घेऊन जेव्हा सरकारी यंत्रणा खरोखरच नियोजन करायला सिद्ध होईल तो सुदिन समजण्यास हरकत नाही.
– सुहास बसणकर, दादर.

मार्गदर्शन करणारा संग्राह्य़ अंक
सा. लोकप्रभा (२७ मे २०१६) हा करिअर विशेष अंक सुशिक्षित बेरोजगारांना जिद्द व चिकाटी बाळगून आपल्या ध्येयाप्रत जाण्यासाठी उत्कृष्ट मार्गदर्शक तर आहेच, शिवाय विद्यार्थ्यांचे, युवकांचे व शिक्षितांचे बळ वाढविणारा अंक आहे.

या अंकातील पंखातील बळ, कॉपरेरेट कथा यापासून आजच्या हताश व निराश होणाऱ्यांनी निश्चित असा बोध घ्यावा. त्यातून आपल्या जीवनात, उद्योग व्यवसायात व करिअरमध्ये नवनवे बदल करून उंच भरारी घेण्याची मनी ठाम इच्छा बाळगावी. असे केले तरच यश तुमच्याकडे धावून येईल यात तीळमात्र शंका नाही. आजच्या तरुणांसाठी उत्कृष्ट मार्गदर्शक असा हा अंक खूप आवडला.

आज जग खूप छोटे झालेले आहे मात्र या छोटय़ा झालेल्या जगात विविध देशातील दळणवळणाचे महत्त्वाचे साधन म्हणजे भाषा होय. या करिअर विशेष अंकातील ‘भाषेच्या क्षेत्रातील करिअर’ मला भावले.

देशातील विविध युनिव्हर्सिटीतील विविध भाषांचे अभ्यासक्रम व त्यापासून मिळणारे लाभ व व्यवसाय याचीही छान माहिती आपण देऊन केलेले मार्गदर्शन अभिनंदनीय व संग्राह्य़ आहे. एक वाचनीय, संग्राह्य़ अंक व करिअरविषयक माहितीचा खजिना म्हणजे लोकप्रभाचा करिअर विशेषांक  म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
– धोंडीरामसिंह राजपूत, औरंगाबाद.

हे होणे अपरिहार्य
चैताली जोशी यांचा ‘निमित्त प्रत्युषाचे’ हा लेख वाचला.  पैसा, प्रसिद्धीच्या हव्यासापोटी रोज शेकडो मुले-मुली या क्षेत्रात दाखल होत असतात, पण बहुसंख्य मुला-मुलींच्या नशिबी एक्स्ट्राँ वा  अंधारच येतो, वा ते फसवले जातात! हे क्षेत्र अजिबातच सुरक्षित नसल्याचे वाचण्यास मिळते. या क्षेत्रातील मुली १३,१४ व्या वर्षांनंतर सुरक्षित(!) राहू शकतच नाहीत, इतके हे क्षेत्र अनैतिकतेने बरबटले असल्याचे मागे एका मुलाखतीत दिवंगत अभिनेत्री परवीन बाबी हिने उघड केले होते;  भले भले दिसणारे व वागणारे लोक डोळ्यांआड काही भलतेच असतात! या दिखाऊ दुनियेत असंख्य लोक तणावापायी येऊन व्यसनाधीन होतात, गैरमार्गाला लागतात, वा क्वचित कोणी जीवन संपवतात! अर्थात आजच्या जगातील वाढलेल्या गरजा, जीवघेण्या स्पर्धा, ताणतणाव, स्वैरता, आभासी सुखांना सर्व काही मानून, त्यात झोकून देण्याची वृत्ती-या पाठोपाठ हे येणे अपरिहार्य आहे!
– श्यामसुंदर गंधे, पुणे.

प्रक्षेपण रात्रौ बंद करावे
दि. २७ मे रोजी प्रकाशित झालेल्या अंकात पराग फाटक यांनी जो टी.व्ही.चा पंचनामा केला आहे तो आवश्यक आहे. चोवीस तास सर्व वाहिन्या होऊन काही काळ लोटला, पण सर्वच बाजूंनी त्याचा वस्तुनिष्ठ आढावा मात्र अजून घेतलाच गेला नव्हता. एक तर चोवीस तास पुरेल एवढं फुटेज कोणाकडेच नसतं, हे निखळ सत्य आहे. बातमी, मालिकांचे भाग, उपलब्ध असलेले पडेल चित्रपट पुन:पुन्हा तेच तेच दाखविले जातात, या रीपीटने डोकेदुखीच वाढते. शिवाय १२ ते ७ बंद नाहीचा तोरा मिरवतात हे योग्य नाही, कर्मचाऱ्यांचीही ससेहोलपट नित्याचीच!

त्यात रविवारी कोणते ना कोणते सोहळे रीपीट केले जातात, तर मनोरंजनाचा अधिक मासाच्या नावाखाली डेली सोपलाही रविवारचा अपवाद नाही. मग मालिकाही दुधात पाणी घालून वाढविण्यासारख्या सपक दिसतात. प्रक्षेपण फक्त १६ तासांचेच ठेवावे. वाचकांच्या मनातील विषयाला वाचा फोडल्याबद्दल आभार!
– आसावरी पालये, कुळगांव

स्वानुभवाचा ‘शेवट’ वेगळा
प्रभाकर बोकील यांची ‘शेवट’ कथा वाचली व विचारांचे काहूर माजले. स्वानुभवातून सांगते, घरातील मुलगा परदेशी गेल्यावर परत भारतात परतायची आशा करणे मूर्खपणाचे आहे. पती-पत्नी असताना व अधूनमधून मुलगा भेटून जायचा यातच समाधान मानावे लागे. परंतु पती गेल्यावर एकटेपणा जाणवणार, हे नक्की होते. परंतु रडत बसून मुला-सुनेला दु:खी करायचे नव्हते. मग मी ‘मीरा-घर’  (पंचतारांकित ज्येष्ठांची घरे आहेत) मध्ये आले. आणि जीवनच बदलून गेले.

जयवंत दळवी यांनी ‘संध्याछाया’मध्ये दाखवले आहे की म्हातारे जोडपे कोणीतरी बोलायला पाहिजे; म्हणून आलेल्या अनोळखी माणसांनापण बसवून, गप्पा मारून, कंटाळा येईपर्यंत बोलत राही. तेव्हा पटले नाही. एकटेपणा येणार; म्हणून आत्महत्या हा प्रकार तर मुळीच आवडला नाही. ‘छंद’ हा माणसाचा आधार असतो. दोघांचे छंद वेगवेगळे असले; तरी हरकत नाही. बराच वेळ पती-पत्नी वेगळे राहिले की एकटेपणाचा अनुभव मिळतो. तोच नंतर वाढवत जायचा.

सामान्य पती-पत्नी ‘नटसम्राट’सारखे जीवन जगत नाहीत. नुसत्या आठवणींवरही जगता येते. अगदी केविलवाणी स्थिती करून घ्यायची नाही. तब्येत व मनाने खचल्यावर ओढून-ताणून उत्साह आणायचा. आनंदी मंडळींमध्ये मिसळायचे. योगा, व्यायाम, फिरणे इ. आपल्यापाठी लावून घ्यायचे. ज्यांना खाण्याची आवड आहे; त्यांनी स्वयंपाकघर जवळ करावे. वेळ कसा जाईल, हे कळणार नाही. दोन/तीन तास पत्ते कुटायला जावे. विचारवंत लेखकांनी अनेक मार्ग सुचवायला तरी पाहिजे होते. शेवटी जो, तो आपल्या कुवतीप्रमाणे स्वीकारेल. पण एकटेपणाचे भांडवल करायचे नाही. लोकांकडून दया मागायची नाही. अध्यात्मात गेलात की आत्मविश्वास येईल व मन मजबूत होईल.

‘वृद्धाश्रमात’ सर्व वृद्ध दिसतात; जरी ते वयाने वृद्ध असले; तरी मनाने तरुण असतात- स्वानुभवाचे बोल आहेत. बाहेर जायला उत्सुक असतात. आल्यावर आनंदी दिसतात. सर्वजण समदु:खी; पण समसुखी असतात. त्यामुळे एकमेकांना भावनिक सहारापण देतात. घरातल्या मंडळींपेक्षा वेगळाच अनुभव मिळतो.

मुंबईत ‘नृप’ (Non Resident Parents Associan) संस्था होती. त्यातील खूपसे एकेकटे पालक परदेशात राहून आनंदाने दिवस काढत  आहेत. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. कुठे राहण्यात कुणाला आनंद मिळतो हे व्यक्तिसापेक्ष असते. ज्याने- त्याने आपल्या मनाप्रमाणे एकटेपणा घालवावा.

आज २०१६ मध्ये एकटय़ा पालकाला खूप पर्याय आहेत. पालक व पाल्य मिळून विचार करून निर्णय घेऊ शकतात. कोणीही कोणावर बळजबरी करू नये. प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे जीवन जगायचा हक्क आहे. त्याने केले म्हणून मी करावे, असे नाही.
– रेखा केळकर, कामशेत, पुणे.

अंत:प्रवाह समजले
४ मार्चच्या ‘लोकप्रभा’मधील कव्हर स्टोरीचा विषय भावला. आधुनिक व संगणक क्रांतीमध्ये मराठी साहित्य आगेकूच करीत असल्याचे समाधान वाटले.

सध्या धावपळीच्या युगात बाजारातून व ग्रंथालयातून पुस्तके घेणे खूपच जिकिरीचे  आहे. त्यामुळे संगणकावर किंवा मोबाइलमध्ये जर का ‘ई-पुस्तक’ घेतले  तर सवडीप्रमाणे निश्चितपणे वाचन होत राहील. त्यानंतर ‘अमेरिका, एड्स आणि कला’ हा संपादकांचा लेख तर लाजवाबच. या अंकातील लेखामुळे विद्यापीठाच्या राजकारणातील अंत:प्रवाह समजले. अर्थसंकल्पातील सविस्तर स्पष्टीकरण व स्टार्टअप बिझनेसबाबत मार्गर्शन झाले.
– मुनीर सुलताने, सांगली.

असुनि खास मालक घरचा…
मोदी सरकारमधील मंत्री, हरयाणा, महाराष्ट्र अशा प्रगत राज्यांचे मुख्यमंत्री, निरनिराळय़ा स्तरांवरील भाजपाचे पदाधिकारी आणि इतरही स्वघोषित देशप्रेमी सगळे मिळून कमालीच्या गोंधळाचे वातावरण निर्माण करत आहेत. गरिबी, बेरोजगारी, असल्या वाढत्या समस्या, तद्वतच वारंवार येणारा दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, यावर कडी म्हणून राष्ट्रवादी म्हणवून घेणाऱ्या निरनिराळय़ा सम्राटांची वर्षांनुवर्षे चालत आलेली भ्रष्टाचारी करणी हे कुठे थांबतच नाहीय.

परिणामी शेकडो पीडितांच्या होणाऱ्या आत्महत्या समाज सुन्न होऊन पाहतो आहे. अशा संकटांना एकदिलाने भिडण्यासाठी समाजातील सर्व वर्गाना आवाहन करून बरोबर नेण्याचे सोडून केवळ सरकार आणि संबंधित लोक प्रतीकात्मक गोष्टीवर हटवादी भूमिका घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करताहेत, असं चित्र दिसते आहे.

‘सब का साथ सब का विश्वास’ हा मोदी सरकारचा मंत्र आता ‘गरिबी हटाव बेकारी हटाव’ या काँॅग्रेसच्या गाजलेल्या घोषणेप्रमाणेच एक घोषणा होऊन राहिला आहे. दर महिन्याला ‘मन की बात’ करणाऱ्या पंतप्रधानांनी जनता की आवाज म्हणून असंख्य दयनीय कहाण्या ऐकण्याची कृपा करावी. स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे होताहेत. तरीदेखील या देशातील हरेक नागरिकाला आपण या देशाचे  मालक आहे, ही जाण अजून सर्वमान्य झालेली नाही, हीच मोठी खंत आहे.
– अरविंद किणीकर, ठाणे.