29 November 2020

News Flash

जुळल्या सगळ्या त्या आठवणी..

‘‘बबनराव नावडीकरांनी केलेली पुत्रवत माया, त्यांनी दिलेला आधार ही माझी पहिली वळणवाट..

प्रभाकर जोग

प्रभाकर जोग

‘‘बबनराव नावडीकरांनी केलेली पुत्रवत माया, त्यांनी दिलेला आधार ही माझी पहिली वळणवाट, त्यानंतर सुधीर फडकेंनी अपघाताने माझं व्हायोलिनवादन ऐकणं आणि नंतर मला काम करायला बोलावणं ही दुसरी वळणवाट! मराठीबरोबर हिंदीतही काम केलं, नामवंत संगीतकार, गायकांसोबत काम केलं. गाण्याच्या प्रवासातील या वळणवाटांमुळे माझी वाटचाल सुरेल झाली ..’’

माझं बालपण गेलं ते नगर जिल्ह्य़ातल्या हरेगावमध्ये. आमचे वडील साखर कारखान्यांच्या तंत्रज्ञानातील मोठे जाणकार. साखर कारखान्यात ते मोठय़ा हुद्दय़ावर असल्याने आम्ही अहमदनगरमध्ये स्थायिक झालो होतो. आमचा गोतावळा खूपच मोठा होता. १६ जणांचा कुटुंबकबिला होता तेव्हा. मला पाच भाऊ आणि दोन बहिणी. आई-वडिलांपकी कोणी कलेच्या प्रांतात नव्हतं, मात्र वडिलांना संगीत नाटकांची पहिल्यापासून आवड. तेव्हा वडील पुण्याजवळ मांजरा फार्म येथे उमेदवारी करीत होते. बालगंधर्वाचं नाटक पुण्यात आलं की वडील सायकलवरून बारा किलोमीटरची रपेट करून पुण्यात येत असत, रात्रभर नाटक पाहून, परतीची सायकलवारी करून पुन्हा दुसऱ्या दिवशी कामावर हजर! संगीतकलेची ही आवड आमच्यात उतरली असावी.

माझे मोठे बंधू वामनराव चांगले व्हायोलिनवादक होते. मी तेव्हा फार लहान होतो, मात्र पं. गजाननबुवा जोशी यांच्याकडे मी गायनकलेतील श्रीगणेशा केला होता. कालांतराने ते कोल्हापूरला गेले आणि मी नारायणबुवा मारुलकरांकडे गायनाचे धडे गिरवू लागलो. त्याच सुमारास मला व्हायोलिनही खुणावत होतं. त्या वाद्याशी माझी सुरेल झटापट चालत असे. ही गोष्ट लक्षात आली ती माझ्या आजीच्या. या वाद्यात मला गती आहे, हे तिनं ओळखलं. सर्वसाधारण आकाराचं व्हायोलिन माझ्या शरीराच्या मानाने फार मोठं आहे, ही समस्याही तिच्या लक्षात आली. मी तिचा लाडका असल्यानं तिनं भावाला विचारलं, काय रे, लहान आकाराचं व्हायोलिन मिळत नाही का.. त्याच्याकडून होकारार्थी उत्तर मिळाल्यानंतर तिने ताबडतोब अडीचशे रुपये काढून दिले व माझ्यासाठी एक लहान व्हायोलिन आणायला सांगितलं. ही गोष्ट आहे १९४२ची. तेव्हाच्या अडीचशे रुपयांना किती किंमत होती याचा आता केवळ विचारच करावा.

माझ्या कलेला प्रोत्साहन मिळालं. या वाद्यावर मी हळूहळू प्रभुत्व मिळवत होतो. आमचं घर आनंदानं भरलं होतं. कशाचीही चिंता नव्हती. परंतु नियतीची गणितं काही वेगळीच असतात. वडिलांना विशाखापट्टणम इथल्या एका साखर कारखान्यात बोलावणं आलं. ते तेथे गेल्यानंतर आम्ही पुण्यात स्थायिक झालो. ते दिवस होते दुसऱ्या महायुद्धाचे. ब्रिटिशांच्या एका भरधाव गाडीनं वडिलांना उडवलं. दिवाळीच्या तोंडावर तो अपघात झाला. दोन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वडील गेले. ही घटना १९४४ ची. त्यावेळी मी केवळ बारा वर्षांचा होतो. आमच्या कुटुंबावर आघातच होता तो. आमच्या एवढय़ा मोठय़ा कुटुंबाचे पालक, कत्रे-करविते ते एकटेच होते. त्यांच्या जाण्यानं एका रात्रीत आमचं दैव फिरलं. नाही म्हणायला वामनराव जी शिकवणी घेत असत, तिचं थोडंफार उत्पन्न होतं, मात्र एवढय़ा जणांना ते कसं पुरणार?

यानंतर जगण्यासाठी लढाई सुरू झाली. संघर्ष म्हणजे काय, ते आम्हाला समजलं. हरेगावमधून पुण्यात जायचा निर्णय झाला. घर चालवण्यासाठी प्रत्येक जण हातपाय मारू लागला. माझ्या एका भावाने भाजीचं दुकान टाकलं. मी त्याला मदत करू लागलो. दुसरीकडे मला व आमच्या सगळ्यात लहान भावाला भावे विद्यालयात घालण्यात आलं. तेव्हाची माझी दिनचर्या अतिशय धावपळीची व कष्टाची होती. सकाळी लवकर उठून भावाला त्याच्या भाजीच्या दुकानात मदत करणं, दुधाचा रतीब घालणं, त्यानंतर शाळेत जाणे आणि अधूनमधून संभाजी पार्कात काकडय़ा विकणं एवढे उद्योग मी करीत होतो. याशिवाय पुण्यात तेव्हा मुदलियार यांचा एक छापखाना होता, तिथल्या कागदांपासून वह्य़ा करून विकायचे उद्योगही मी केले. एवढं सगळं करून परीक्षेत पहिल्या पाचांत माझा नंबर हमखास असे. बरं, या गडबडीत संगीतसाधनेत खंड पडला का, तर तेही नाही. व्हायोलिनवादन सुरूच होतं. आता या वाद्यावर माझा हात बसू लागला. मधल्या काळात वामनराव नागपूर आकाशवाणी केंद्रावर ज्येष्ठ व्हायोलिनवादक म्हणून रुजू झाले. पुण्यातली त्यांची शिकवणी मी सांभाळू लागलो. बबनराव नावडीकर हे तेव्हाचे प्रसिद्ध व लोकप्रिय भावगीत गायक. एवढय़ा मोठय़ा गायकाला त्यांच्या कार्यक्रमांत मी साथ करीत असे. केवळ त्यांनाच नाही तर रोहिणी भाटे, मालती पांडे यांच्या कार्यक्रमांतही माझंच व्हायोलिन असे. एकीकडे साथीचा वादक म्हणून काम करताना मी माझे एकल कार्यक्रमही सुरू होते. ‘गाणारं व्हायोलिन’ या माझ्या सध्याच्या लोकप्रिय कार्यक्रमाची ती कदाचित नांदी असेल.

हा काळ होता १९४८-४९चा. माझं शालेय शिक्षण पूर्ण झालं. मला पुढे महाविद्यालयात शिकायचं होतं. मात्र घरखर्च भागवून महाविद्यालयाच्या फीसाठी पसे खर्च करणं ही चनीचीच बाब होती. यावर वामनरावांनी तोडगा काढला. नागपूर आकाशवाणीत त्यांचा चांगलाच जम बसला होता. स्टाफ आर्टस्टि म्हणून त्यांचा लौकिक झाला होता. त्यांनी माझ्यासमोर नागपूरला येण्याचा प्रस्ताव ठेवला. इकडे एक जागा रिकामी आहे, एका चांगल्या व्हायोलिनवादकाची गरज आहे. तू ये आणि परीक्षा दे, तू नक्की उत्तीर्ण होशील.. असा निरोप त्यांनी मला धाडला. मला त्यांचं म्हणणं पटलं. मी तिकडे जायचा निर्णय घेतला. माझ्यावर पुत्रवत माया करणारे बबनराव मात्र अस्वस्थ झाले. त्यांनी तसं लगेच बोलून दाखवलं नाही. मात्र ते माझ्यासह नागपूरला आले. नागपूर आकाशवाणीवर माझी ऑडिशन झाली. त्यात मी उत्तीर्ण होणं क्रमप्राप्तच होतं. त्यानुसार मला चांगली श्रेणी मिळाली. यानंतरची पायरी म्हणजे आकाशवाणीची नोकरी आणि त्यासाठीचा बाँड लिहून देणं. आता बबनरावांना रहावलं नाही, त्या सरकारी नोकरीत मी अडकणार, ही कल्पनाच त्यांना सहन झाली नाही. त्यांनी माझ्या भावाला स्पष्टपणे सांगितलं, वामनराव, प्रभाकर हा खूप वेगळा कलाकार आहे. तो इथे राहिला तर साचेबद्ध काम करीत राहील व त्याची कला बहरणार नाही. त्याला पुण्याला परत येऊ दे.. या प्रस्तावाला वामनरावांची ना नव्हतीच. त्याचं कारण म्हणजे माझ्यातील वेगळेपण त्यांनाही ठाऊक होतं. आमच्या लहानपणी ना नोटेशन काढण्याची पद्धत होती, ना आम्हाला कोणी ते शिकवलं. तरीही मला पहिल्यापासून नोटेशन सहज काढता येत असे. वामनरावांना याचं फार कौतुक होतं, ते मला विचारत, अरे, हा प्रकार आपल्याला कोणीही शिकवला नाही, तरीही तुला ते कसं येतं.. यावर मी काय बोलणार, ती तर दैवी देणगी होती.

तर, वामनरावांना माझं कौतुक असलं तरी काळजीही होती. त्यामुळेच पुण्याला परत गेल्यास याच्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या खर्चाचं काय, असा प्रश्न त्यांनी बबनरावांना केला. यावर बबनरावांनी दिलेलं उत्तर हे माझ्या भावी कारकीर्दीची पहिली वळणवाट ठरली. ते त्वरित उत्तरले, प्रभाकरची काळजी करू नका. सध्या माझे कार्यक्रम जोरात सुरू आहेत. दर शनिवारी, रविवारी माझे कुठे ना कुठे कार्यक्रम असतातच. त्यात प्रभाकर मला साथ करेल, त्याचं मानधन त्याला मिळत राहील, आणि याहून अधिक हमी मी देतो ती म्हणजे प्रभाकर बी.ए. होईपर्यंत त्याच्या शिक्षणखर्चासाठी मी दरमहा पन्नास रुपये देत जाईन.. बबनरावांच्या या आश्वासनामुळे मला भरून आलं, वामनरावही आश्वस्थ झाले.

माझ्या महाविद्यालयीन शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. मी ‘एसपी’मध्ये प्रवेश घेतला. एक हुशार विद्यार्थी आणि उगवता कलाकार अशी माझी ख्याती होती. वार्षकि स्नेहसंमेलनाची प्रथा तेव्हापासूनची. त्यातील विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात माझं व्हायोलिनवादन ठरलं. मात्र जोगचं वादन सगळ्यांना आवडत असल्याने त्याचा कार्यक्रम सगळ्यात शेवटी ठेवा, अशी सूचना खुद्द प्राचार्यानी केली.

तो दिवस मला आजही आठवतोय. ‘वुई वाँट जोग’ या घोषणेनं एसपीचं सभागृह दणाणून गेलं होतं. ‘आयेगा आनेवाला,’ ‘कृष्णा मिळाली कोयने’ला अशी तेव्हाची लोकप्रिय गाणी मी वाजवली. मुलामुलींनी मदान अक्षरश: डोक्यावर घेतलं. हे सूर केवळ त्या सभागृहापुरते मर्यादित न राहता पार रस्त्यापलीकडे गेले जिथे माझ्या कारकिर्दीतली दुसरी वळणवाट माझी वाट बघत होती..

रात्रीची वेळ, मोकळा रस्ता आणि मोठाले स्पीकर्स यामुळे माझं व्हायोलिनवादन रस्त्यापलीकडच्या एका महान संगीतकाराच्या थेट कानी पडलं. हा महान संगीतकार म्हणजे सुधीर फडके. बाबूजींचं पुण्यातलं घर एसपीच्या मदानाच्या पलीकडेच होतं. तर, बाबूजींना ते वादन आवडल्याचं मला माझ्या कुमठेकर या मित्राकडून समजलं. कुमठेकरचं त्यांच्याकडे जाणं-येणं होतं. या कार्यक्रमानंतर दोन दिवसांनी तो त्यांच्याकडे गेला असता बाबूजींनी चौकशी केली. परवा तुमच्या कॉलेजच्या कार्यक्रमात व्हायोलिन कोण वाजवत होतं रे, फार गोड आणि सुरेल हात आहे त्याचा. कुमठेकरने त्यांना माझ्याविषयी जुजबी माहिती दिली. बाबूजी म्हणाले, त्याला पाठव की माझ्याकडे..

ही सारी हकीकत कुमठेकरकडून समजल्यानंतर मला खूपच आनंद झाला. बाबूजींचा मी आधीपासूनच चाहता होतो. त्यांना भेटायचं ठरवलं. मात्र दैनंदिन व्यापांमुळे दोन-तीन दिवस जमलं नाही. अखेर बाबूजींच्या घरी मी दाखल झालो. माझा परिचय दिल्यानंतर बाबूजींनी माझं खूप कौतुक केलं. तो कौतुकसोहळा आटोपल्यावर त्यांनी मला थेट विचारलं, ‘‘माझ्याकडे वाजवाल का..’’ दुसरी वळणवाट तयार होत होती. मी बाबूजींना म्हटलं, ‘‘अहो मला चित्रपटगीतांच्या तंत्राविषयी काहीच ठाऊक नाही, मला कसं जमेल ते.’’ यावर ते म्हणाले, ‘‘त्यात काहीच अवघड नाही, ते तंत्र मी शिकवेन तुम्हाला. यापुढे पुण्यात माझं ध्वनिमुद्रण असेल तेव्हा तुम्हाला मी बोलावेन.’’

याच काळात प्रभात संस्था बंद पडू नये यासाठी काही कलाकार मंडळींनी एकत्र येऊन ‘श्री गुरुदेवदत्त’ या चित्रपटाचा घाट घातला होता. त्याला स्नेहल भाटकरांचं संगीत होतं. मी त्यांच्याकडे गेलो ते व्हायोलिनवादक या नात्याने. मात्र नोटेशन काढण्याचं माझं कौशल्य पाहून त्यांनी माझ्यावर ते कामही सोपवलं. या चित्रपटात बाबूजींच्या पत्नी म्हणजे ललिताबाईंचीही गाणी होती. माझं काम त्या जवळून पाहात होत्या. त्यामुळे ‘प्रतापगड’ या चित्रपटाच्या वेळी त्यांनी बाबूजींना माझं नाव सुचवलं. बाबूजी त्यांना म्हणाले, ‘‘अगं मी ओळखतो यांना..’’ आणि माझ्याकडे वळून म्हणाले, ‘‘काय हो, नंतर आलातच नाहीत..’’ बाबूजींकडे माझं जाणं हे असं जणू विधिलिखितच असावं. नोटेशन व संपूर्ण खाचाखोचांसकट कोणतंही नवं गाणं मी चटकन आत्मसात करतो, हे त्या चित्रपटादरम्यान बाबूजींच्या लक्षात आलं. माझ्यावर साहाय्यकपदाची जबाबदारी सोपवण्याचं त्यांनी मनोमन ठरवलं, मात्र त्यांनी माझी परीक्षाही घेतली. एखादं नवं गाणं त्यांनी स्वरबद्ध केलं की त्याची चाल गायकांना समजावण्याची जबाबदारी ते माझ्यावर सोपवत आणि बाहेर जाऊन उभे रहात. मी गायकांशी व वादकांशी कसं वागतो, माझं वर्तन, सांगण्याची पद्धत कशी आहे, याचं ते निरीक्षण करीत असत. अर्थात, हे सगळं मला नंतर समजलं. तर, त्यांच्या परीक्षेत मी उत्तीर्ण झालो. ‘ऊन पाऊस’च्या वेळेची गोष्ट आहे. बाबूजी व मी टिळक पुलावरून चालत येत होतो. बाबूजी अचानक मला म्हणाले, ‘‘जोग, आजपासून तुम्ही माझ्या साहाय्यकाचं काम करायचं.’’ माझ्यासाठी तो आश्चर्याचा धक्काच होता. मात्र, ‘‘रामभाऊ कदम तुमचे साहाय्यक असताना मी ते काम कसं करू,’’ असा प्रश्न विचारला. त्यावर बाबूजी म्हणाले, ‘‘काळजी करू नका, तेही कायम राहतील आणि तुम्हीही काम करायचं.’’ त्याच सुमारास रामभाऊंनी स्वतंत्रपणे काम करायला सुरुवात केली आणि मी बाबूजींचा साहाय्यक झालो.

ज्या गीतरामायणानं संगीतविश्वावर मोहिनी घातली त्याचा मी साक्षीदार आहे. पुण्यातल्या माझ्या घरात गीतरामायणाच्या गाण्यांच्या तालमी होत असत. ‘चला राघवा चला’ या गाण्याच्या वेळी एका न्यायालयीन खटल्यामुळे बाबूजी मुंबईत अडकले. त्यांचं पुण्यात येणं अशक्य होतं. ते गीत मी संगीतबद्ध करावं अशी सूचना त्यांनी मला केली. त्यानुसार मी त्याला चाल लावली व चंद्रकांत गोखलेंकडून गाऊन घेतलं. बाबूजींसह सर्वाना ते गाणं आवडलं याचा फार आनंद झाला. असंच एकदा त्यांच्या घरी गेलो असता टेबलवर ‘ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा’ या गीताचा कागद दिसला. बाबूजी आंघोळीला गेले होते. मी पेटी घेऊन बसलो. काही मिनिटांतच अस्ताईला चाल लावलीही. तेवढय़ात बाबूजी बाहेर आले. ‘काय, काही सुचतंय का?’ त्यांनी विचारलं. त्यावर मी त्यांना चाल ऐकवली, ती चाल त्यांना कमालीची आवडली. ‘फर्स्ट क्लास हीच चाल ठेव,’ अशी पावती त्यांनी दिली. बाबूजींनी गीतरामायणाचे अनेक कार्यक्रम केले, त्यातल्या पाचशे कार्यक्रमांत मी त्यांना साथ केली. मराठीत बाबूजी टॉपलाच होते, मात्र झालं काय की साठच्या दशकात मराठी चित्रपटांची संख्या काहीशी रोडावू लागली.

१९५२ मध्ये माझं लग्न झालं, प्रपंचही वाढत होता, त्यामुळे बाबूजींकडे साहाय्यक म्हणून काम करण्याव्यतिरिक्त काहीतरी करण्याची गरज निर्माण झाली आणि एका भल्या सकाळी मी मुंबईत दाखल झालो. िहदी चित्रपटसृष्टीत साँग व्हायोलिनिस्ट म्हणून मी काम करू लागलो आणि रोशन, मदनमोहन यांच्यापासून लक्ष्मी-प्यारे, राहुलदेव बर्मन अशा सगळ्यांकडून मला बोलावणं येत गेलं.

त्यापूर्वी मी स्वतंत्रपणे संगीत देण्यासही सुरुवात केली. ‘लपविलास तू हिरवा चाफा’, ‘सत्यात नाही आले’, ‘लक्ष्मी तू या नव्या घराची’, ‘वृंदावनात माझ्या’, ‘स्वर आले दुरुनी’, ‘प्रिया आज माझी’, ‘कोटी कोटी रूपे तुझी’, ‘तेच स्वप्न लोचनांत’ आदी गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. २२ मराठी चित्रपटांनाही मी संगीत दिलं. ‘सतीची पुण्याई’, ‘कैवारी’ आणि ‘चांदणे िशपीत जा’ या माझ्या चित्रपटांना मानाचा सूरसिंगार पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटगीतांतला एक किस्सा माझ्या कायम लक्षात राहिलाय. ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’ यातली ‘शुभंकरोती म्हणा मुलांनो’ आणि ‘घेऊ कसा उखाणा’ ही दोन गाणी मला लता मंगेशकरांकडून गाऊन घ्यायची होती. त्यांच्याकडून होकार तर आला होता, मात्र ठरल्या दिवशी सकाळी आमचे वादक दुसऱ्याच ध्वनिमुद्रणाला जाणार होते. काय करावं सुचेना, कारण केवळ सकाळी ध्वनिमुद्रण करायचं असा लतादीदींचा दंडक होता. हे सगळं सांगण्यासाठी मी त्यांना फोन केला, त्यावर, ‘त्यात काय एवढं, आपण दुपारी करू रेकाँìडग,’ असं त्या सहज बोलून गेल्या. कोणासाठीही आपला नियम न मोडणाऱ्या या गायिकेने माझ्यासाठी अपवाद केला. ‘शुभंकरोती’चं रेकॉìडग झालं, त्यात कोरसमध्ये माझी मुलंही होती. दीदींनी चॉकलेट वगरे देऊन बाळगोपाळांचं कौतुक केलं. आणखी एक गाणं आहे ना, दीदींनी विचारलं. मी ‘हो’ म्हटलं, त्यावर त्यांनी मला दुसरा धक्का दिला. ‘मग करून टाका की आत्ताच रेकॉìडग.’ माझा माझ्या कानांवर विश्वासच बसला नाही. तेही गाणं लगेच रेकॉर्ड झालं, पण खरी गंमत पुढेच आहे. मी त्यांना मानधनाविषयी विचारलं असता, ‘‘अहो, एवढय़ा चांगल्या गाण्यांचे कोणी पसे घेतं का..’’ असं म्हणून त्या बाहेर पडल्याही. माझ्यावर त्यांचा एवढा विश्वास की जगजित सिंह यांच्यासह त्यांनी ‘सजदा’ हा अल्बम केला तेव्हा रेकॉìडग कंपनीला त्यांनी निक्षून सांगितलं की, मला साँग व्हायोलिनिस्ट म्हणून जोगच हवेत. आता त्यांच्याच नावाने दिला जाणारा पुरस्कार मला घोषित झाला आहे, याचा विशेष आनंद आहे. आशा भोसले यांनीही माझ्याकडे अनेक गाणी गायली. गाणं आवडलं की रेकॉर्डिगचा कागद पर्समध्ये टाकायचा ही त्यांची विशेष सवय. माझ्या अनेक गाण्यांचे कागद त्यांनी पर्समध्ये टाकल्येत, यातच सारं आलं!

साधारण पंधरा वर्षांपूर्वी मी ‘गाणारं व्हायोलिन’ आणि ‘गाता रहे मेरा व्हायोलिन’ हे कार्यक्रम सुरू केले, त्याच्या ध्वनिमुद्रिकाही निघाल्या, त्यांना आजही प्रचंड मागणी आहे. माझ्या मुलांमध्ये श्रीनिवास गाणं शिकलाय, तर मिलिंद गिटार वाजवतो. अमेय व दीपिका ही नातवंडंही माझा वारसा पुढे नेत आहेत. अमेयची पत्नी दर्शनाही चांगली वादक आहे. मन कृतार्थतेच्या भावनेने भरलं आहे..

 – अनिरुद्ध भातखंडे
aniruddha.bhatkhande@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2015 12:01 am

Web Title: article on prabhakar jog
Next Stories
1 अनियोजित प्रवाही जीवन
2 ‘बात कहने का अपना अपना तरीका!’
3 लिव्ह अ‍ॅज इफ यू आर डेड!
Just Now!
X