भाईंदर: मिरा भाईंदर शहरात १७ ठिकाणी आरोग्य वर्धिनी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी पुरेशी जागा उपलब्ध न झाल्यामुळे पोर्टेबल (तात्पुरत्या स्वरूपातील) केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी लागणाऱ्या साडेतीन कोटी रुपयांच्या खर्चास नुकतीच प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
मिरा भाईंदर शहरासाठी शासनाकडून एकूण ३५ आरोग्य वर्धिनी केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. या केंद्रांसाठी लागणारा सर्व खर्च शासनाकडूनच उपलब्ध करून दिला जात आहे. यापैकी महापालिकेने आतापर्यंत जवळपास १० केंद्रांची उभारणी पूर्ण केली आहे. मात्र, उर्वरित केंद्रांची उभारणी रखडल्याचे दिसून येत होते. मुख्यतः जागेअभावी ही केंद्रे रखडली होती.
या अडचणीवर उपाय म्हणून प्रशासनाने पोर्टेबल केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १७ ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. एका केंद्रासाठी सुमारे २१ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, एकूण खर्चासाठी ३ कोटी ६५ लाख रुपये अंदाजित करण्यात आले आहेत. या कामासाठीची निविदा देखील प्रसिद्ध करण्यात आली असून, लवकरच कामास सुरुवात होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकारी आदिती वसईकर यांनी दिली आहे.
उदिष्ट पूर्ण करण्याचा दावा
मिरा भाईंदर शहरासाठी शासनाकडून ३५ आरोग्य वर्धिनी केंद्रे मंजूर करण्यात आली असून, मागील तीन वर्षांत केवळ १० केंद्रांचीच प्रत्यक्ष उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या संथ कारभारावर राष्ट्रीय आरोग्य अभियानाने नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात अभियानाने महापालिकेला पत्र पाठवून आयुक्त, आरोग्य सेवा आणि अभियान संचालक यांच्यावर समाधानकारक काम न केल्याचा ठपका ठेवला आहे.या पार्श्वभूमीवर, प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले असून, उर्वरित १७ पोर्टेबल केंद्रे आणि ८ केंद्रे महापालिकेच्या विविध वास्तूंमध्ये प्रस्तावित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे निश्चितच हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.