भाईंदर :-मिरा रोड येथील नया नगर भागात दुकानाचा स्लॅब कोसळल्याने एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.तर आणखी एक जण यात गंभीर जखमी झाले असून खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
अकील कुरेशी (६८) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.ते मिरा रोडच्या साहिल इमारतीच्या दुकानात राहत होते.दरम्यान शुक्रवारी सायंकाळी अचानकपणे या दुकानाच्या छताचा स्लॅब कोसळला. हा स्लॅब थेट अंगावर कोसळल्याने त्यात अकील कुरेशी आणि त्यांचा सहकारी अडकून पडला. या घडलेल्या घटनेमुळे आजूबाजूच्या परीसरात खळबळ उडाली होती.
स्थानिकांनी याची माहिती पालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. या घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला मिळताच बचावकार्य राबववून दोघांना बाहेर काढण्यात आले. मात्र यात अकील कुरेशी यांचा मृत्यू झाला होता.तर दुसरा इसम गंभीर जखमी झाला होता.त्यामुळे त्याला जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे. या घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील जीर्ण झालेल्या इमारतींचा प्रश्न निर्माण झाला आहे.