भाईंदर: मिरा-भाईंदर मेट्रो मार्गिकेमध्ये बाधित झालेल्या ९४ टक्के झाडे वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. केवळ ६ झाडांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.मिरा-भाईंदर शहरासाठी एमएमआरडीएमार्फत मेट्रो मार्गिका-९ ची उभारणी केली जात आहे. शहराच्या मुख्य मार्गांवरून ही मार्गिका जात आहे. या प्रकल्पांतर्गत मेट्रो मार्गिका व उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. हा प्रकल्प उभारताना प्रशासनाने काशिमीरा ते गोल्डन नेस्ट मार्गावरील दुभाजकांवर असलेली १०२ झाडे स्थलांतरित केली होती.
साधारण पाच वर्षांपूर्वी ही झाडे हलवण्यात आली होती. सध्या यातील ९६ झाडे चांगल्या स्थितीत असल्याचा दावा एमएमआरडीए प्राधिकरणाने केला आहे. उर्वरित ६ झाडांचा मृत्यू स्थलांतर प्रक्रियेतील अडचणी व नैसर्गिक कारणांमुळे झाला आहे.
याशिवाय मार्गिकेसाठी भाईंदर पश्चिमेकडील राधास्वामी सत्संग परिसरातील खाजगी जागेवरील २१३ झाडे तोडण्यात आली होती. यापैकी १७५ झाडे सध्या चांगल्या अवस्थेत आहेत, २५ झाडे निरीक्षणाखाली असून, १३ झाडांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पर्यावरणप्रेमी प्रवीण परमार यांनी एमएमआरडीएकडून मागितलेल्या माहिती अधिकारात उघड झाले आहे.
एकूण १,२६२ झाडे प्रकल्पात बाधित
दहिसर-मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका ९ प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पात आतापर्यंत एकूण १,२६२ झाडे बाधित झाली आहेत. यापैकी ९५३ झाडांचे स्थलांतर करण्यात आले असून, २८६ झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. एकूण ४७ झाडांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.