भाईंदर :- नव्या इमारतीचे बांधकाम करत असताना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी न घेतल्यामुळे रस्ता खचून नुकसान झाल्याप्रकरणी मिरा-भाईंदर महापालिकेने विकासकाला तब्बल ४६ लाखांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय, एमएमआरडीएच्या देखरेखीखाली रस्ता दुरुस्त करण्याचेही निर्देश दिले गेले आहेत.
भाईंदर पूर्वेतील इंद्रलोक परिसरात १७ मे रोजी रस्ता खचल्याची घटना घडली होती. याठिकाणी आरएनए डेव्हलपर्सतर्फे नव्या इमारतीच्या पायलिंगचे काम सुरू होते. या घटनेच्या चौकशीनंतर महापालिकेने विकासकाला दोषी ठरवले असून, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल ४६ लाखांचा दंड भरण्याचे आदेश आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी दिले आहेत.
तसेच, खचलेला रस्ता दुरुस्त करताना मुंबई आयआयटीमार्फत रचनेची मंजुरी घेऊन एमएमआरडीएच्या देखरेखीखाली नव्याने रस्त्याचे बांधकाम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर नाला, जलवाहिनी, मलवाहिनी आणि इतर नागरी सुविधा पुन्हा उभारण्याचेही सक्त आदेश विकासकाला देण्यात आले आहेत.
निष्कृष्ट दर्जाचे काम
सदर रस्त्याचे काम करताना सोलिंगऐवजी मोठ्या प्रमाणात रॅबिटचा वापर करण्यात आला होता, त्यामुळे जमिनीखालील भाग पोकळ राहिला. शिवाय, बांधकाम नियमांकडे दुर्लक्ष करून पायलिंगचे काम हाती घेतल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.