भाईंदर : भाईंदरच्या राई येथील गावकऱ्यांनी महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन करून नैसर्गिक तलावात दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यंदा गणेशोत्सवात सहा फूटाखालील गणेशमूर्तींचे विसर्जन सक्तीने कृत्रिम तलावात करण्याचा निर्णय मिरा-भाईंदर महानगरपालिकेने घेतला होता. त्यासाठी शहरातील विविध ठिकाणी तब्बल ३५ कृत्रिम तलाव उभारण्यात आले. त्यानुसार गुरुवारी दीड दिवसांच्या मूर्तींचे विसर्जन या तलावांमध्ये पार पडले. मात्र, भाईंदरमधील जुने राई, मोर्वा व मुर्धा गावातील नागरिकांनी कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास नकार दिला आहे.
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, प्रशासनाच्या या निर्णयामुळे त्यांच्या जुन्या संस्कृती व परंपरेला धक्का बसणार आहे. तसेच पालिका स्वतःच सांडपाणी थेट समुद्रात सोडते आणि त्यामुळे मिठागर व शेतजमीन प्रदूषित होते. म्हणून यंदाही मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक तलावातच करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी सुरुवातीपासून व्यक्त केला होता.
दरम्यान, गुरुवारी दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन सुरू असताना राई गावात मोठा गोंधळ झाल्याचे दिसून आले. प्रशासनाने रोखण्याचा प्रयत्न करूनही गावकऱ्यांनी नैसर्गिक तलावातच मूर्तींचे विसर्जन केले.त्यामुळे महापालिका प्रशासनाने संबंधित गावकऱ्यांविरुद्ध भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून या प्रकरणी २५ ते ३० गावकऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२,१९०,१९१(२), १९२,१९५(१),३२४(३), २२३ आणि ११५ (२) सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४,३ पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ कलम १५(१) प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याची माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी दिली आहे.