भाईंदर : काशिमीरा येथील ग्रीन व्हिलेज इमारतीच्या तळमजल्यावर सिलेंडर स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे.
बुधवारी ग्रीन व्हिलेज इमारत क्रमांक १४ मधील तळमजल्यावरील खोली क्रमांक ४ मध्ये गॅस गळती झाली होती. बंद खोलीत बराच वेळ वायू साचलेला होता. दरम्यान, सायंकाळी निधी कानोजिया (२५) ही तरुणी घरात परतल्यानंतर दिवा लावण्याचा प्रयत्न करत असताना मोठा स्फोट झाला. या स्फोटात निधी जखमी झाली स्थानिक नागरिकांनी तिला तात्काळ जवळील खाजगी रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे.
या स्फोटामुळे आजूबाजूचा परीसर हादरला यात घरातील काचा आणि दरवाजे फुटून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी वेळेत धाव घेतल्यामुळे परिस्थिती आटोक्यात आल्याची माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली आहे.