वसई: वसई ते भाईंदर आणि भाईंदर ते वसई प्रवास करणाऱ्या नागरिकांना जलमार्गाने जोडणारी सेवा म्हणजे वसई भाईंदर रोरो सेवा. रोरो सेवेच्या फेऱ्यांमध्ये झालेली वाढ किंवा घट, घोडबंदर मार्गावर दुरुस्तीचे काम सुरु असताना रोरो सेवेने प्रवास करण्यासाठी वसई जेट्टीच्या परिसरात लागलेल्या गाड्यांच्या रांगा, तर काहीवेळा रोरो बोटीत चढताना उतरताना घडलेल्या घटना अशा विविध मुद्यांमुळे चर्चेत असणारा हा जलमार्ग पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे आणि याचं कारण म्हणजे या रोरो बोटीतून प्रवास करणाऱ्या बॉलिवूडच्या अभिनेत्याने केलेले कौतुक.
वसई -भाईंदर या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई- भाईंदर दरम्यान रोरो सेवा सुरू करण्यात आली आहे. सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्दीसेस प्रा. लि. यांच्य मार्फत ही चालविली जात असून या फेरीबोटीची क्षमता ३३ वाहने व १०० प्रवासी अशी आहे. लोकल गाडीमधील वाढती गर्दी, महामार्गावरील वाहतूक कोंडी अशा विविध प्रकारच्या कारणामुळे वसई भाईंदरमधील बहुतांश प्रवासी हे रोरो सेवेने प्रवास करू लागले आहेत. तर मिरारोड, भाईंदर, वसई या भागात चित्रपट आणि मालिकांसाठी केले जाणारे चित्रीकरण यामुळे अनेकदा अभिनेतेही रोरो बोटीने प्रवास करताना दिसतात.
रोरो बोटीने असाच प्रवास करणारे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते किरण कुमार यांची एक चित्रफीत सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होताना दिसत आहे. या चित्रफितीत ते वसई ते भाईंदर सुरु करण्यात आलेल्या या रोरो सेवेचे कौतुक करताना दिसत आहेत. या चित्रफितीत किरण कुमार म्हणतात कि, वसई किल्ल्यापासून भाईंदरपर्यंत ही जी रोरो सेवा सुरु करण्यात आली आहे. ती अत्यंत सोयीची आहे. या सेवेमुळे इथल्या पर्यटनालासुद्धा चालना मिळत आहे.
नेतेमंडळींचे मानले आभार
रोरो सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल वसई भाईंदरमधील नेतेमंडळींचे कौतुक करताना अभिनेते किरण कुमार म्हणाले कि, आपण नेहमीच सुविधांचा अभाव असल्याची तक्रार करत असतो. सरकारने हे नाही, ते नाही केलं. हे चुकीचं आहे. पण, सरकार नेहमीच विविध सुविधा उपलब्ध करून देतं. ज्याचा फायदा सर्वानाच होतो.
पर्यटकांना केले वसईत येण्याचे आवाहन
पुढे शहरातील पर्यटनाबद्दल बोलताना ते म्हणाले कि, वसई किल्ला हा अतिशय सुंदर आहे. त्यामुळे पर्यटकांनी येथे यायला हवे. वसईतून भाईंदरला जाणारी आणि भाईंदरहून वसईला सोडणारी अत्यंत सोयीची अशी रोरो सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे लोकांनी इथे यायला हवं.
