वसई : वसई विरारच्या औद्योगिक वसाहतीत सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा मोठा परिणाम उद्योगांवर होत असल्याने येथील उद्योग आता गुजरात सह अन्य ठिकाणी स्थलांतरणाच्या मार्गावर आहेत. नुकताच वसई पूर्वेच्या कामण भागातील तीन उद्योजक वापी येथे स्थलांतरित झाल्याने अन्य उद्योग ही विजेअभावी स्थलांतरित होतील अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
वसई विरार शहरात गोलानी, रेंज ऑफिस, गावराईपाडा, नवघर, वालीव, पेल्हार,कामण, चिंचोटी, पोमण, सागपाडा, वसई फाटा, नालासोपारा फाटा, विरार फाटा, बापाणे या भागात जवळपास ३० हजाराहून अधिक लघु व मध्यम स्वरूपाचे उद्योग कारखाने आहेत. या कारखान्यांमुळे येथील जवळपास सात ते आठ लाख नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या औद्योगिक क्षेत्राला महावितरणकडून वीज पुरवठा केला जात आहे. वसईत वितरण होणाऱ्या विजेपैकी ७० टक्के वीज ही औद्योगिक क्षेत्राला लागते.
सद्यस्थितीत ५४० मेगा व्हॅट इतक्या विजेचा पुरवठा केला जात आहे.मात्र मागील काही महिन्यांपासून विविध ठिकाणच्या भागात वीज समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. त्याचा फटका उद्योग क्षेत्राला बसू लागला आहे. विशेषतः आता नव्याने औद्योगिक क्षेत्र म्हणून विकसित होणाऱ्या कामण पोमण या भागात विजेच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.
मागील काही महिन्यांपासून सतत वीज पुरवठा खंडित होत आहेत. दिवसातून दररोज चार ते पाच वेळा कोणत्या न कोणत्या कारणामुळे तरी वीज जाते. यामुळे कारखान्यातील कामकाज ठप्प होत असल्याचे उद्योजक हेमंत कोठारी यांनी सांगितले. तर कमी अधिक दाबाने वीज पुरवठा झाल्यास महागड्या यंत्रात ही बिघाड होत असल्याचे उद्योजकांनी सांगितले आहे. याबाबत महावितरणकडे पाठपुरावा करूनही आम्हाला न्याय मिळत नसल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे. सर्वाधिक महसूल वीज देयकांच्या मार्फत औद्योगिक भागातूनच जातो तरीसुद्धा येथील समस्या सोडविल्या जात नसल्याची तक्रार ही उद्योजकांनी केली आहे.
मंगळवारी महावितरण व उद्योजक यांची गोवालीस इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या सभागृहात बैठक पार पडली तेथेही या वीज समस्येमुळे उद्योजकांना अन्य ठिकाणी स्थलांतर होण्याची वेळ आली आहे. वीज समस्येला कंटाळून नुकताच कामण येथील पॅकिंग मटेरील, प्लास्टिक, सॅनिटायझर तयार करणाऱ्या तीन कारखाने वापी गुजरात येथे स्थलांतरित झाले असल्याचे उद्योजक संजीव राणा सांगितले आहे. विजेची समस्या जर अशीच राहिली तर अन्य उद्योजक ही आता स्थलांतरणाच्या मार्गावर असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांमध्येही चिंता
मागील काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. त्याचा परिणाम उद्योग क्षेत्रावर होत असल्याने उद्योग अन्य ठिकाणी जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र उद्योग कारखान्यावर येथील स्थानकाचा रोजगार अवलंबून आहे. आज जवळच्या जवळ खेड्यापाड्यातील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्र टिकून राहणे गरजेचे असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. उद्योजकांनी कोणत्याही ठिकाणी जाऊ नका वीज समस्येच्या विरोधात गावकरी मिळून सर्व लढा उभारू असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते दिनेश म्हात्रे यांनी बैठकीत सांगितले आहे. आज ग्रामीण भागाचे अर्थचक्र येथील उद्योगावर आहे त्यामुळे सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी कमळाकर जाधव यांनी केली आहे.
महावितरणकडून सुरळीत वीज पुरवठ्याचे आश्वासन
वीज समस्यांच्या संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत उद्योजक आक्रमक झाले होते. विजेच्या समस्या आहेत ही वस्तूस्थिती असून त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे महावितरणच्या कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी सांगितले आहे. तसेच वीज वाहिन्यांमधील अडचणी, नवीन उपकेंद्र, खांब उभारणे अशी सर्व कामे मार्गी लावली जातील त्या कामाला गती देण्यात येईल असे सांगत मिश्रा यांनी सुरळीत वीज पुरवठ्याचे आश्वासन उद्योजकांना दिले आहे.