BVA Protests Over Road Issue वसई:- वसई विरार शहरातील मुख्य रस्ते यासह अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या खड्ड्यांच्या समस्येवर बहुजन विकास आघाडीने पालिकेच्या मुख्यालयावर धडक मोर्चा काढत रविवारी आंदोलन केले. येत्या काही दिवसांत रस्ते दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्यास पुढील आंदोलन यापेक्षा अधिक तीव्र असेल असा इशारा माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिला आहे.
पावसामुळे वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे. या खड्ड्यामुळे वाहनचालकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. तर काही वेळा या खड्ड्यामुळे अपघाताच्या घटना ही घडत आहेत. खड्डे बुजविण्याची मागणी सातत्याने नागरिकांमधून करण्यात येत आहे. विशेषतः गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील, अशी घोषणा पालिकेकडून करण्यात आली.त्यानुसार पालिकेने विविध ठिकाणी खडीकरण, डांबरीकरण करून खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र नवरात्री उत्सव संपला तरी सुद्धा रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती योग्य रित्या झाली नसल्याने अपघाताच्या घटना ही घडू लागल्या आहेत. याबाबत बहुजन विकास आघाडी पक्षही आक्रमक होत रविवारी सायंकाळी महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केले.
रस्त्यावरील खड्डे जीवघेणे ठरत आहेत असे असतानाही पालिका त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. तर दुसरीकडे केवळ निविदा काढल्या जातात प्रत्यक्षात काम ही दिसून येत नसल्याचा आरोप नालासोपाऱ्याचे माजी आमदार क्षितीज ठाकूर यांनी केला आहे. गणेशोत्सवापासून खड्डे दुरूस्त करा असे सांगत आहोत मात्र अधिकारी त्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत असेही ठाकूर म्हणाले. या आंदोलनात मोठ्या संख्येने बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते व माजी नगरसेवक सहभागी झाले होते.
पालिकेचे प्रभारी शहरअभियंता प्रदीप पाचंगे यांनी आंदोलन स्थळी येऊन निवेदन स्वीकारले. लवकरच याबाबत बैठक घेऊन रस्त्यांची दुरुस्तीची कामे पूर्ण केली जातील असे आश्वासन देण्यात आले.
पुढचा मोर्चा शांततेत नसेल – हितेंद्र ठाकूर
मागील ३५ वर्षात इतकी वाईट परिस्थिती नव्हती. रस्त्यांची अवस्था पाहता अवघ्या दहा महिन्यातच परिवर्तन केले असा अप्रत्यक्ष टोला माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भाजपाला लगावला. रस्त्यावर खड्डे मोठ्या प्रमाणात आहेत. त्याबाबतचा आजचा मोर्चा आहे. आता निवेदन दिले आहे. मात्र काहीच उपाययोजना झाल्या नाहीत तर यापुढचा मोर्चा शांततेत नसेल असा इशारा ही त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिला.