विरार : नालासोपाऱ्याच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर कार चालवून स्टंटबाजी करणे एका पर्यटकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कार भरतीच्या पाण्यात तरंगत असून स्थानिक नागरिक दोराच्या साहाय्याने कार वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे.
नालासोपारा पश्चिमेला प्रसिद्ध कळंब समुद्रकिनारा आहे. या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर पर्यटक फिरायला येत असतात. रविवारी कळंब समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आलेल्या काही अतिहौशी पर्यटकांनी स्टंटबाजी करण्यासाठी आपली कार थेट समुद्र किनाऱ्यावर उतरवत आतपर्यंत नेली होती. मात्र ती कार काही वेळातच वाळूत रुतून बसली. खूप प्रयत्न करूनही कार वाळूतून बाहेर आली नाही.
दुपारी भरतीची वेळ असल्याने हळूहळू भरतीचे पाणी वाढू लागले तशी कार समुद्राच्या विळख्यात सापडली. काही वेळातच कार थेट समुद्रात वाहून जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली मात्र कळंब गावातील स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळे मोठ्या प्रयत्नांनी कार किनाऱ्यावर आणण्यास यश आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही कारचे मोठे नुकसान झाले असल्याचे दिसून येत आहे. . प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही समुद्रावर कार घेऊन जाण्याचे प्रकार आता धोकादायक ठरताना दिसत आहेत.
वसई विरारमध्ये राजोडी, नवापूर, कळंब, भुईगाव, सुरुची आणि अर्नाळा असे प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. अनेकदा प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून काही अतिहौशी पर्यटक आपली कार थेट समुद्रकिनाऱ्यावर आतपर्यंत घेऊन जातात. मात्र काही ठिकाणी गाड्या वाळूत रुतून बसतात. त्यामुळे किनाऱ्यावर उतरवलेल्या गाड्या पुन्हा पक्क्या रस्त्यावर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. याआधीही असे प्रकार घडले असून पर्यटकांनी स्टंटबाजी करण्यासाठी स्वतःचे आणि इतर नागरिकांचे जीव धोक्यात घालू नये. समुद्रकिनाऱ्यावर नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे .
