वसई: वसई विरार शहरात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी खाड्यांच्या प्रवेशद्वारावर पालिकेकडून झडपा बसविल्या जाणार आहेत. जेणेकरून समुद्राच्या भरतीचे पाणी शहरात येणार नाही यासाठी ही उपाययोजना केली जाणार आहे. तसा आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
वसई विरार शहरात मागील काही वर्षांपासून पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ लागली आहे. नैसर्गिक नाल्यावर करण्यात आलेले अतिक्रमण, बेकायदा माती भराव व नियोजन शून्य पद्धतीने बांधण्यात आलेली बांधकामे यामुळे शहरात मागील पाच ते सहा वर्षांपासून शहरातील विविध ठिकाणच्या भागात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होऊ लागली आहे. यामुळे अनेकांच्या घरात पाणी जाऊन नुकसान होते तसेच वाहतूक ठप्प होणे, जनजीवन विस्कळीत होणे अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत. याचा मोठा फटका हा वसईच्या जनतेला बसत आहे.
ही पूरस्थितीची समस्या सुटावी व यापुढेही पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पालिकेने राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी), भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) या सत्यशोधन समित्यांची नेमणूक केली होती. यासाठी १२ कोटींचा निधी खर्च केला होता. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार शहरातील पाण्याचा निचरा सुयोग्य पद्धतीने होण्यासाठी व पावसाचे पडणारे पाणी शहरात साठून राहू नये व पाणी जाण्यासाठी जागा मिळावी यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. याच अनुषंगाने पालिकेने पावले उचलली आहे. यात धारण तलाव (होल्डिंग पोन्ड्स ) विकसित करणे, रस्त्यांची उंची वाढविणे व आवश्यकते नुसार कलव्हर्ट व पूल तयार करणे, नाल्यांचे रुंदीकरण , स्वयंचलित कालवा गेट, स्वयंचलित हवामान आणि पर्जन्यमान मापन यंत्रणा, पाणलोटासाठी खुले नाले तयार करणे आदी कामांचा समावेश आहे.
अनेकदा पावसाळ्यात समुद्रात भरती येते. या भरतीचे पाणी खाडी मार्गाने शहरात घुसते. त्यातच मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असेल तर खाडी मार्गाने पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होतात. यामुळे नागरिकांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहे. यासाठी आता खाडीच्या प्रवेशद्वारावर झडपा बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम ही सुरू करण्यात आले असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. जर भरतीचे पाणी शहरात येण्यापासून रोखले तर शहरातील पूरस्थिती नियंत्रणात राहील असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.
खाडी मार्गातील कांदळवन अडथळे दूर करणार.
शहरात पाणी निचरा होण्यासाठी नैसर्गिक खाड्या व नाले आहेत. याच नाल्यातून पावसाचे पाणी व शहरातील सांडपाणी याचा निचरा होत असतो. मात्र सद्यस्थितीत या नैसर्गिक खाड्यांमध्ये असलेल्या कांदळवनांची वाढ झाली आहे.त्यामुळे पाणी जाण्याचा मुख्य मार्गच अरुंद होऊ लागले आहेत.
अनेकदा कांदळवनात पावसाच्या पाण्यात विविध ठिकाणांहून वाहून येणारा कचरा अडकून राहतो त्यामुळे पुढे पाण्याचा निचरा सुरळीत होत नाही. याचाच फटका पावसाळ्यात बसून पूरस्थिती सारख्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. हे अडथळे दूर करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी कांदळवनांतील अढथळा ठरणारे वृक्ष हटविण्यासाठी मुंबई उच्चन्यायालयातून परवानगी घेतली जाणार आहे असे महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
शहरातील पूरस्थिती नियंत्रणाच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचा एक भाग म्हणून खाड्यांच्या प्रवेशद्वारावर झडपा. बसविल्या जाणार आहेत. त्याचा आरखडा तयार करण्याचे काम आहे.- मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त, वसई विरार महापालिका
अशा ठिकाणी लागणार झडपा
शहरातील पाण्याचा निचरा खाड्यांच्या मार्फत होत असतो. नायगाव सोपारा खाडी, चिखलडोंगरे, चुळणे गाव, नारंगी खाडी, नालासोपारा कळंब यासह अन्य ठिकाणी अशा नऊ ठिकाणी या झडपा लावल्या जाणार आहेत. यानुसार नियोजन सुरू आहे.