भाईंदर :- मिरा-भाईंदर महापालिकेच्या उत्तन येथील घनकचरा प्रकल्पस्थळी २५ हजार चौरस फूट जागेत तब्बल ८ हजार ६०० झाडे लावून मियावॉकी पद्धतीचे कृत्रिम जंगल उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. हे काम सामाजिक दायित्व निधीतून करण्यात येणार आहे.

उत्तन येथील धावगी डोंगरावर मिरा-भाईंदर महापालिकेचा घनकचरा प्रकल्प आहे. येथे ओल्या आणि सुक्या कचऱ्याची प्रक्रिया केली जाते. शहरातून दररोज सुमारे ४५० टन कचरा निर्माण होतो. मात्र काही वर्षांपासून या ठिकाणी कचरा प्रक्रियेचे काम ठप्प झाले होते. परिणामी येथे कचऱ्याचा प्रचंड डोंगर उभा राहिला असून, त्यामुळे दुर्गंधी आणि प्रदूषणाचा त्रास वाढला आहे.हा कचरा कमी करण्यासाठी प्रशासनाने बायोमायनिंग प्रक्रिया सुरू केली आहे, मात्र या कामास वारंवार अडथळे येत आहेत. त्यामुळे या परिसरातील दुर्गंधी कमी करून वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी मियावॉकी पद्धतीने कृत्रिम जंगल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.येत्या ११ ऑक्टोबर, शनिवारी याबाबतचा  कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हे काम केशवसृष्टि संस्था आणि एचडीएफसी बँक यांच्या सामाजिक दायित्व निधीतून केले जाणार असून, महापालिकेकडून सुमारे २५ हजार ६०० चौरस फूट जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात ४९ विविध प्रजातींची एकूण ८ हजार ६०० झाडे लावली जाणार आहेत. या उपक्रमामुळे परिसरात पर्यावरणीय सुधारणा होण्यास मदत होईल, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

बांबूची भिंत उभारण्याचे काम

मिरा-भाईंदरच्या घनकचरा प्रकल्पस्थळी प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने बांबूची लागवड करून कुंपण स्वरूपात भिंत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत सुमारे साडेसहा हजार बांबूंची लागवड केली जाणार असून, त्यासाठी आवश्यक खर्चास नुकतीच प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत या कामाला सुरुवात झाली असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.