वसई: विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी परीसरात रविवारी ‘वचनपूर्ती जल उत्सव’ या कार्यक्रमादरम्यान गोंधळ निर्माण झाला होता. याच प्रकरणावरून माजी आमदार क्षितीज ठाकूर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह बोळींज पोलीस ठाण्याबाहेर जमून घोषणाबाजी केली होती. त्यामुळे नालासोपाऱ्याचे माजी आमदार क्षितीज ठाकूर यांच्यासह बविआच्या १२५ हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रविवारी सायंकाळी ग्लोबलसिटी वचनपूर्ती जलउत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रस्त्यावरच हा कार्यक्रम ठेवण्यात आल्याने काही काळ रस्ते बंद होते. या रस्ते अडवणूकीच्या मुद्द्यावरून नागरिक आणि आयोजक यांच्या वाद निर्माण झाला होता. यावेळी वाद घालणाऱ्यांना बोळींज पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. यात काही बविआच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. या घटनेनंतर बविआचे माजी आमदार क्षितिज ठाकूर, शिवसेना (ठाकरे गट) पालघर लोकसभा संघटक जनार्दन पाटील व त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या बाहेर तणाव निर्माण झाला होता.
या प्रकरणी बोळींज ठाण्यात सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमवून घोषणाबाजी करणे, सरकारी कामात अडथळा , मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सोमवारी माजी आमदार क्षितीज ठाकूर,निशांत चोरघे, धवलेश ठाकूर, प्रशांत राऊत, रिटा सरवैया ,विवेक पवार, ब्रिजेश शुक्ला तसेच शिवसेना ठाकरे गटाचे जनार्दन पाटील यांच्यासह इतर १०० ते १२५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बी एन एस कलम १८९(२), १९०,२२१ सह महाराष्ट्र पोलीस कलम ११२, ११७ १३५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.