वसई: पावसाळा सुरू झाला असून नदी, नाले, धबधबे हे ओसंडून वाहू लागले आहेत. निर्बंध शिथिल होताच पर्यटकांची पावलेही पर्यटनस्थळी वळू लागली आहेत. शनिवार, रविवार पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले.

शनिवार व रविवारी वसईतील तुंगारेश्वर धबधबा, चिंचोटी, कामण देवकुंडी अशा विविध ठिकाणच्या पर्यटन स्थळी गर्दी केली होती. शनिवारी वसईतील प्रसिद्ध तुंगारेश्वर येथे पर्यटकांचा अक्षरश: मळा फुलला होता. येथील धबधब्यावर  आलेल्या अनेक पर्यटकांनी करोनाचे नियम न पाळताच धबधब्यावर प्रवेश केला. तर दुसरीकडे वसई पूर्वेतील कामण देवकुंडी येथील नदीवरही मोठय़ा संख्येने पर्यटकांची रेलचेल सुरू  होती.  वसईतील तुंगारेश्वर आणि चिंचोटी धबधबा हे पर्यटनासाठी काही वर्षांपासून धोकादायक ठरले आहेत. अनेक पर्यटकांचा ओढय़ाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.  मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण—डोंबिवली व वसई परिसरातील पर्यटक मोठय़ा संख्येने या ठिकाणी गर्दी करतात. मद्यपान करून धबधब्यात अंघोळीला उतरल्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर दोन वर्षांंपूर्वी पावसाचा वेग वाढल्याने चिंचोटी धबधब्याच्या ठिकाणी पर्यटक अडकून पडल्याची घटना घडली होती.तर पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात वाहत जाणे यासारख्ये प्रकारही घडले आहेत. शनिवारी येथील धबधब्यावर मौजमजा करण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी केली होती. यात लहान मुलांचा समावेशदेखील होता. वसईतील धोकादायक पर्यटनस्थळांवर पर्यटनाला सध्या बंदी नसल्याने सरार्सपणे पर्यटकांच्या गाडय़ा या पर्यटनाच्या दिशेने निघाल्या होत्या. मात्र या वाढत्या गर्दीमुळे पुन्हा करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

करोनाचे संकट हळूहळू कमी होऊ लागल्याने पर्यटकांचा ओढा हा पर्यटनस्थळी वाढू लागला होता. त्यातच शनिवारी पर्यटन स्थळाच्या ठिकाणी मोठी गर्दी जमली होती. यामुळे करोना संसर्गाचा प्रादुर्भाव व इतर दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत होती. याला रोखण्यासाठी आता पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे.  रविवारी पोलिसांनी तुंगारेश्वर, कामण देवकुंडी अशा पर्यटनस्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. यामुळे पर्यटनासाठी दाखल झालेल्या पर्यटकांना प्रवेशद्वारावरूनच माघारी परतावे लागले आहे.