भाईंदर :- दहिसर पथकर नाका वर्सोवा येथे स्थलांतरित करण्याची घोषणा शिंदेच्या शिवसेनेकडून  करण्यात आली आहे. मात्र ही जागा वन विभागाच्या अखत्यारीत येत असून याठिकाणी पथकर नाका होऊ देणार नसल्याची स्पष्ट भूमिका वन मंत्री गणेश नाईक यांनी घेतली आहे. त्यामुळे भाजप- शिवसेना यांच्यातील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर येत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. 

मुंबईकरांना दिलासा देण्याच्या दृष्टीने दहिसर पथकर नाका मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा येथे स्थलांतरित करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तर या अनुषंगाने प्रत्यक्ष कामकाज केले जात असल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून करण्यात येत आहे. यामुळे मुंबईच्या वेशीवरील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे. असे जरी असले तरी यावर मिरा भाईंदर आणि वसई विरारच्या नागरिकांकडून आक्षेप नोंदवला जात आहे.

प्रामुख्याने वर्सोवा येथील रस्ता अरुंद आहे. त्यामुळे याठिकाणी पथकर नाका स्थालांतरित झाल्यास त्याचा मोठा ताण घोडबंदर गावावर पडण्याची शक्यता आहे. तसेच याठिकाणी पथकर नाका आल्यास यामुळे अवजड वाहनांवर शुल्क आकारणी होणार असून ती मिरा-भाईंदरकरांच्या माथी मारली जाण्याची शक्यता आहे. तर सदर पथकर नाका वर्सोवा येथे आल्यास ठाण्याला जाण्यासाठी देखील मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार असल्याची भीती वसई विरारकरांकडून व्यक्त केली जात आहे. यामुळे हा पथकर नाका स्थलांतरित होऊ नये म्हणून वातावरण पेटले आहे.

दरम्यान नुकताच वाशी येथे वनमंत्री गणेश नाईक यांच्या लोकदरबारात देखील भूमिपुत्र संघटनेकडून नुकताच हा प्रश्न उपस्थितीत करण्यात आला होता. वर्सोवा येथील जागा ही वन विभागाच्या अधिपत्याखाली येते. तसेच राष्ट्रीय महामार्गावर एमएसआरडीसीचा टोल नाका बेकायदेशीरपणे उभारला जात असल्याची तक्रार भूमिपुत्र संघटनेचे सुशांत पाटील यांनी केली होती. यावर वर्सोवा येथील रस्ता अरुंद आहे.आणि ही जागा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची आहे. त्यामुळे या ठिकाणी असे कोणतेही काम करण्यास आमचा स्पष्ट नकार असल्याचे गणेश नाईक यांनी सांगितले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिंदेंच्या महत्त्वकांशी घोषणेला गोत्यात अडकवण्याची रणनीती भाजपने केली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

टोलनाका बेकायदेशीर 

दहिसर पथकर नाका वर्सोवा येथे स्थलांतरणाच्या मुद्दावरून भूमिपुत्र संघटना आक्रमक झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावर एमएसआरडीसी  पथकर नाका बेकायदेशीर असल्याचे संघटनेचे सुशांत पाटील यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार २०२७ सप्टेंबर पर्यंत दहिसर पथकर नाका बंद करण्यात यावा असे सांगण्यात आले आहे.  तसेच जर हा नाका वर्सोव्याला झाला तर मुंबई-अहमदाबाद महामार्ग, ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गांवर कोंडी होईल.

हा पथकर नाका म्हणजे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. पण तो जर वर्सोव्याला  स्थलांतरित झाला तर दहिसर न जाणाऱ्यांनाही विनाकारण टोल भरावा लागेल अशी तक्रार पाटील यांनी केली आहे.