मागील काही महिन्यांपासून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विविध प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. महामार्गावर पडलेले खड्डे, वाहतूक नियोजन न करता घेतले जाणारे निर्णय, व अन्य कारणामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आता नागरिकांच्या जीवावर बेतू लागली आहे. नुकताच वाहतूक कोंडीत अडकून दीड वर्षीय बालकाला जीव गमवावा लागला. त्यामुळे महामार्गावरील समस्या कमी होण्याऐवजी त्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे.

वसई विरारच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. मुंबई, ठाणे, वसई विरार, पालघर, मीरा भाईंदर, यासह गुजरात राज्याला जोडणारा  महत्वाचा महामार्ग आहे. एका अर्थाने हा महामार्ग म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या दळणवळणासाठीची जीवनवाहिनी आहे. परंतु आताच्या गतिमानतेच्या युगात या महामार्गाचा हव्या त्या प्रमाणात विकास झाला नाही तर दुसरीकडे निर्माण होत असलेल्या समस्यांकडे ही दुर्लक्ष केले जाऊ लागले आहे. त्याचाच भीषण परिणाम आता महामार्गावर दिसू लागला आहे.

खड्डे मुक्त महामार्ग व्हावा यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून काँक्रिटिकरण करण्यात आले. मात्र ते काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे असा आरोप आता वाहनचालक करू लागले आहेत. त्याचा मोठा परिणाम हा वाहतूकीवर होताना दिसून येत आहे. तर काही वेळा महामार्गावरील वाहनांमध्ये बिघाड होऊन ती  विविध ठिकाणच्या भागात रस्त्यातच बंद पडतात. बंद पडलेली वाहने ही वेळीच रस्त्यातून बाजूला करणे गरजेचे आहे. परंतु अशी वाहने बाजूला करण्यासाठी महामार्गावर तातडीने यंत्रणा उपलब्ध होत नाही. त्यामुळे महामार्गावर विविध कारणांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस जटिल बनू लागली आहे. 

नुकताच महामार्गावर वर्सोवा पूल ते नायगाव फाटा या दरम्यान मुंबई वाहिनीवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून राहिल्याने उपचाराअभावी दीड वर्षाच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच काही महिन्यांपूर्वी वाहतूककोंडीचा फटका बसल्याने पालघर तालुक्यातील छाया पुरव यांचाही रुग्णवाहिकेत मृत्यू झाला होता. पुरव यांना मुंबईला उपचारासाठी नेत असताना वसई ते घोडबंदर येथे असलेल्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने त्यांच्यावर पुढील उपचार होऊ शकले नाहीत. ही समस्या आता गंभीर होत चालली असून यामुळे मुंबईत उपचारासाठी जाणाऱ्या पालघर, वसई विरार येथील रुग्णांना याचा फटका बसत आहे. 

तर दुसरीकडे प्रवासी वर्गाची सुद्धा मोठी कोंडी होऊ लागली आहे. सद्यस्थितीत नवीमुंबई, ठाणे, ऐरोली, घणसोली अशा विविध ठिकाणच्या भागात विविध प्रसिद्ध कंपन्या व त्यांची कार्यालये आहेत. त्यामुळे तरुणांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत. परंतु महामार्ग व घोडबंदर ठाणे मार्गावर सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीत प्रवासी आणि नोकरदारवर्ग तासनतास अडकून पडत आहेत. प्रवास विलंबामुळे हातची नोकरी जाण्याची वेळ आली असल्याची चिंता नोकरदार वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.

….अशा कारणामुळे होते कोंडी 

वाहतूक नियोजन करण्यासाठीचे सुनिश्चित असे धोरण नाही. वसई पालघर भागातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरून दररोज ४० ते ५० हजार वाहनांचा प्रवास होतो. यातील बहुतांश वाहने ही अवजड मालाची वाहतूक करणारी आहे. असे असतानाही  पालघर पासून ते वर्सोवा पूल या दरम्यान वाहने उभी करण्यासाठी शासन स्तरावरून ट्रक टर्मिनल चे नियोजन असणे गरजेचे होते. मात्र तसे कोणतेच नियोजन नसल्याने मुख्य रस्त्यासह जागा मिळेल त्याठिकाणी वाहने उभी केली जातात. त्यातच सेवा रस्त्यांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. आपत्कालीन परिस्थितीत व विश्रांतीच्या दृष्टीने सेवा रस्ते अत्यंत महत्वाचे आहेत. वर्सोवा ते पालघर दरम्यान अवघ्या काही ठिकाणचे सेवा रस्ते सोडले तर बाकी अन्य ठिकाणी सेवा रस्तेच उपलब्ध नाहीत. तर काही ठिकाणी सेवा रस्त्यावर अतिक्रमण करून ते सेवा रस्ते खासगी स्वरूपाच्या वाहन तळासाठी वापरले जात आहेत. तर काही ठिकाणी सेवा रस्त्यावरच राडारोडा टाकून ते ही बंद करण्यात आले आहेत.

तर दुसरीकडे अलीकडच्या काळात महामार्गालगत मोठ्या संख्येने आरएमसी प्रकल्प उभे राहिले आहेत. त्या ठिकाणच्या वाहनांची सुद्धा विरुद्ध दिशेने वाहतूक सुरू असते. मात्र त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने धोकादायक पध्दतीने वाहतूक सुरूच आहे. तर काही वेळा ही वाहने छेद रस्त्यांतून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात यामुळे अपघातांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. असे प्रकार वेळीच रोखले नाहीत तर ही समस्या आणखीनच बिकट होण्याची शक्यता आहे. 

वाहतूक नियोजन असायला हवे 

अवजड वाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे कोंडी होत असल्याने त्यावर वेळेची मर्यादा घातली जात आहे.  मात्र वेळेची मर्यादा घालत असताना त्याचा अन्य भागावर तर परिणाम होणार नाही ना याचा विचारच होत नसल्याचे मागील आठवड्यात निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीतून स्पष्ट झाले आहे. प्रशासनाकडून

केवळ अधिसूचना काढून चालणार नाही तर त्याचे योग्य ते नियोजन असायला हवे तरच वाहतूक कोंडीची समस्या नियंत्रणासाठी मोठी मदत होईल. तसेच पोलीस यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था, महामार्ग प्राधिकरण यांच्यातही समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 

खड्ड्यांचा जाच 

एकीकडे काँक्रीटीकरणाचे काम सुरु आहे तर दुसरीकडे आधीपासून अस्तित्वात असणारा रस्ता खड्डेमय झाला आहे. घोडबंदरच्या प्रवेशद्वारावरच खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळेही अनेकदा वाहनांचा वेग मंदावतो आणि त्याची परिणीती ही वाहतूक कोंडीत होते. यामुळे अनेकदा अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. त्यामुळे घोडबंदर रस्ता अजूनही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे यावर ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. 

महामार्गावर पाणी साचण्याची समस्या कायम

महामार्गाच्या लगत मोठ्या प्रमाणात माती भराव झाल्यामुळे पाणी जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी प्राधिकरणाने कोणत्याही प्रकारचे नियोजन न केल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे. विशेषतः महामार्गावरील मालजीपाडा, किनारा हॉटेल, ससूनवघर जवळील जेके टायर समोर, वसई फाटा, सन शाईन हॉटेल समोर, नालासोपारा फाटा,यासह विविध ठिकाणच्या भागात पाणी तुंबते आणि वाहतूक सेवा विस्कळीत होत आहे.