भाईंदर :- मिरा भाईंदर महापालिकेच्या क्रीडा संकुलात ९ वर्षीय ग्रंथ मुथा या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याच्या प्रकरणात प्रशासनाने निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन केली होती. मात्र, या समितीने आपला अहवाल दिल्याला २० दिवस झाले असूनही प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही, असे समोर आले आहे.
गेल्या महिन्यात, २० एप्रिल रोजी, भाईंदर येथील महापालिकेच्या क्रीडा संकुलातील तरणतलावात ९ वर्षीय ग्रंथ मुथा या मुलाचा बुडून मृत्यू झाला होता. क्रीडा संकुलातील व्यवस्थापकांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप मुलाच्या पालकांनी केला असून, त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने क्रीडा संकुलाचे कंत्राट तात्पुरते रद्द करून संबंधितांकडून खुलासा मागवला होता. तसेच, पोलीस तपासासोबतच स्वतंत्र चौकशी करण्यासाठी पालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी त्रिसदस्यीय समिती नेमली होती. दरम्यान, कंत्राटदाराने ही घटना मुलाच्याच चुकीमुळे घडल्याचा खुलासा दिला आहे.
तर समितीने ३ मे रोजी आपला अहवाल आयुक्तांकडे सादर केला असूनही, २० दिवस उलटून गेले तरी प्रशासनाकडून यावर कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. क्रीडा संकुलाचे कंत्राट ‘साहस चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेला दिले असले, तरी प्रत्यक्ष येथील कामकाज स्थानिक भाजप पदाधिकारी हाताळत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कठोर निर्णय टाळले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यापूर्वी कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून, त्याच्याकडून घेतलेली अनामत रक्कम जप्त करण्याची मागणी आंदोलकांनी केली होती. मात्र, प्रशासनाकडून अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून प्रकरण शांत होण्याची वाट पाहिली जात आहे का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
क्रीडा संकुल सुरु करण्याची मागणी?
महापालिकेच्या क्रीडा संकुलात ही दुर्घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे सदस्यांकडून कंत्राटदारावर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली जात आहे. त्याचबरोबर, क्रीडा संकुल महापालिकेने स्वतःच्या ताब्यात घेऊन चालवावे, अशी मागणीही जोर धरत आहे. क्रीडा संकुलात व्यायाम व इतर शारीरिक क्रियाकलापांमुळे अनेक नागरिकांचे आरोग्य सुधारत आहे. त्यामुळे संकुल बंद ठेवल्यास त्याचा मोठा फटका सामान्यांना बसू शकतो. म्हणून प्रशासनाने दूरदृष्टी ठेवून लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
“तरणतलावात घडलेल्या घटनेप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. याशिवाय पालिका प्रशासनातर्फे देखील आपण यात तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. लवकरच सर्वांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतला जाईल.” :- राधा बिनोद शर्मा – आयुक्त ( मिरा भाईंदर महानगरपालिका )