वसई : दिवाळीच्या निमित्ताने शहरात विविध ठिकाणी जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांवर पालिकेने कारवाई केली आहे. १६ जाहिरात फलक, ८२ पोस्टर फलकांवर कारवाई करण्यात आली आहे.वसई विरार शहरात नियमबाह्य पध्दतीने जाहिरात फलक लावण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. या प्रकारामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून अपघात होण्याची शक्यता आहे. असे असतानाही शहरात विविध ठिकाणी अनधिकृत व धोकादायक पद्धतीने जाहिरात फलक उभे केले जात आहेत.

मुख्य रस्ते, वळणाचे रस्ते आणि चौकात जाहिरात फलक लावताना कोणतीही काळजी घेतली जात नाही. आता दिवाळी सुरू झाली आहे दिवाळीच्या निमित्ताने विविध कंपन्यांचे जाहिरात करणारे मोठं मोठे जाहिरात फलक लावण्यात आले आहेत.काहींनी जाहिरात फलक लावताना पालिकेकडून कोणत्याच प्रकारची परवानगी घेतली नाही. अशा बेकायदेशीर जाहिरात फलकांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे.

नुकताच जाहिरात विभागकाच्या पथकाने नालासोपारा फाटा, म्हाडा रोड संकुल, उमेळा फाटा वसई, ओसवाल नगरी सर्कल,जुने विवा महाविद्यालय ते एव्हरशाईन पर्यँत अशा ठिकाणी बेकायदेशीर जाहिरात फलक व पोस्टर काढून टाकण्यात आले आहे. आता पर्यँत १६ मोठे जाहिरात फलक ८२ पोस्टर काढले असून पुढील कार्यवाही सुरू असल्याचे जाहिरात विभागाचे उपायुक्त अजित मुठे यांनी सांगितले आहे. या पूर्वी ४० बेकायदेशीर जाहिरात फलक लावणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.